आठवणीच भारी!
माझ्या कडे लिहायला काही नाहीये सध्या, सीरियल्स, चित्रपट, गाणी आणि अन्वयाचे छोटे किस्से सोडले तर काहीच लिहिले नाहीये गेले वर्ष, दीड वर्ष... आणि तितक्यात एक लेख वाचला, लेखाची सुरुवात काहीशी अशी - 'तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.' आणि शेवट असा - 'दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं.' ह्या लेखावरून मी परत गेलो ना... नाकात बोट, नवीन असून फाटलेला बनियन, आंबे खाऊन खाऊन पिवळा झालेला... चड्डी नाही, हातात माती - ह्या अवतारापासून पाय ना पोचणाऱ्या परिस्थितीतही सायकल चालवण्याचा वाकडा तीकडा प्रयत्न! झाली सुरुवात झिप फाईल उघडली न गोष्टी सुरु अनझिप व्हायला... सुरुवात दूरदर्शनने! त्याचं प्रचंड आकर्षण, बातम्या - क्रिकेट मॅच साठी अख्या गावात मिळून एक दूरदर्शन, मग काही घरं वाढली, कौलांवर अँटिना दिसू लागले, नंतर रंगीत दूरदर्शन... काही वर्षांनी अँटिनांची जागा डीशेस नी घेतली! शहर प्रगती करतं त्या झपाट्याने नाही पण गावातही हे बदल घडतात, वडिलोपार्जित १००-१५० वर्ष जुनी घरं डागडुजी करूनही तरुण असल्यासारखी दि...