आठवणीच भारी!

माझ्या कडे लिहायला काही नाहीये सध्या, सीरियल्स, चित्रपट, गाणी आणि अन्वयाचे छोटे किस्से सोडले तर काहीच लिहिले नाहीये गेले वर्ष, दीड वर्ष... आणि तितक्यात एक लेख वाचला, लेखाची सुरुवात काहीशी अशी - 'तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.' आणि शेवट असा - 'दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही. गावपण हरवायला नको होतं.'

ह्या लेखावरून मी परत गेलो ना... नाकात बोट, नवीन असून फाटलेला बनियन, आंबे खाऊन खाऊन पिवळा झालेला... चड्डी नाही, हातात माती - ह्या अवतारापासून पाय ना पोचणाऱ्या परिस्थितीतही सायकल चालवण्याचा वाकडा तीकडा प्रयत्न!

झाली सुरुवात झिप फाईल उघडली न गोष्टी सुरु अनझिप व्हायला... सुरुवात दूरदर्शनने! त्याचं प्रचंड आकर्षण, बातम्या - क्रिकेट मॅच साठी अख्या गावात मिळून एक दूरदर्शन, मग काही घरं वाढली, कौलांवर अँटिना दिसू लागले, नंतर रंगीत दूरदर्शन... काही वर्षांनी अँटिनांची जागा डीशेस नी घेतली! शहर प्रगती करतं त्या झपाट्याने नाही पण गावातही हे बदल घडतात, वडिलोपार्जित १००-१५० वर्ष जुनी घरं डागडुजी करूनही तरुण असल्यासारखी दिसतात, अर्थात खर्च होतो रंगरंगोटी आणि इतर... पण खरं ते सांगतो, पूर्वी मेहनत होती म्ह्णून लोकांचे आयुष्य निरोगी असायचे, शेण सारवणे, वाडीत कामे करणे, सायकल किंवा पायतोड करत लांब लांब अंतर झापझाप कापणे, विहिरीतून पाणी काढणे, गाई-म्हंशीची देखभाल त्यांसाठी पेंढा-पाणी सोय, सावली साठी झापा तयार करणे, आंबे नारळ पोफळी वगैरे झाडांची निगा राखणे हे सर्व करून काही जण नोकरी ही करायचे!

या उलट आपण शहरी जीवनात इतके आळशी झालोय की गावातल्या त्या मेहनतीचे ५%ही आपल्याकडून होत नाही, जिम-गार्डन मध्ये जाऊन धावायचे, घरी आल्यावर नाश्ता/चहा, टीवी वर किंवा पेपरात देशाच्या-जगाच्या घडामोडींवर राग-लाईक-शेर-कॉमेंट करत, बम्पर-२-बम्पर वाहतुकीत मुलांना शाळेत, स्वतःलहान ऑफिसात सोडून रात्रीच्या ट्राफिकचा विचार करून तो पार करून घरी येऊन ढुंगण सोफ्याला टेकवायचे, आज जाम कंटाळा आलाय / थकलोय सांगून ग्लास भरायचा. आणि परत सुरु  राग-लाईक-शेर-कॉमेंट!

सगळेच शहरी लोकं असेच वागत असतील असं नाही पण ६०-७०%लोकं हेच करतात ह्यात शंका नाही! माझ्या सुदैवाने आजोळ कोकणात होते, अगदी ६-७वी पर्यंत दिवाळी / गणपती / मी महिन्याच्या सुट्टीत गावात वर्षभराचं जगून घ्यायचो, त्या गावातल्या मातीत भूक हरवायची, तिथल्या सावलीत एसी ची हवा झक्क मारेल अशी वाऱ्याची झुळूक घामाला हाक मारून जायची... वाडीत धप्प धप्प असा आवाज करत देव जणू आंबे नारळ पाठवतोय असे ते दिवस! नशीब किती मस्त असतं एकाचं ह्याचं उत्तम उदाहरण, ते काही जास्त नाही टिकलं म्हणा. पण आठवणी श्रीमंत असतात ह्यात वाद नाही, मी श्रीमंत राहणार आयुष्यभर ह्यात वादच नाही, फक्त एकाच सांगायचंय मित्रानो, कोणाचं गावी घर असेल तर ते जपा. आई-वडलांना जो मान देता तोच त्या जमिनीला द्या, जमीन काय, जुनी कुठलीही वास्तू / वस्तू!

आठवण काढणं / येणं आपल्या हातात नसतं, कधी काय आठवेल सांगता येत नाही, त्या आठवणी मात्र छान असल्या तर लाईक-शेर-कमेंट कराच!

आठवणीच भारी, आणि आता जे काय आहे ते उद्या-पर्वा भारी होईलच परत!





#सशुश्रीके । ३० एप्रिल २०१७

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!