ऐकता ही येईल असा एक सिनेमा!
तर काय ना आज सकाळी ऑफिसला जाताना गाणी ऐकायचा मूड नव्हता गाणी ऐकायचा मूड नसला की मी कथाकथन ऐकतो, पूलं/वपु वगैरे पण आज तो पण मूड नव्हता. एक कल्पना सुचली, काही हिंदी चित्रपट आहेत आवडते ज्याचे संवाद न संवाद पाठ आहेत. त्यातलाच एक म्हणजे 'आनंद' ( Anand movie ) आपल्या सर्वांच्या आवडत्या गुलज़ारांचा, ऋषिकेश मुखर्जी साहेबांचा... एक न एक सीन प्युअर गोल्ड राव! तर मी काय केलं... ब्लूटूथ ला लावला फोन न सुरु केला मूवी... टायटल पासून राजेश खन्ना - रमेश देव च्या घरी राहायला येई पर्यंतचे संवाद ऐकले.. ऑफिस ला पोहोचे पर्यंत. सगळे प्रसंग रस्त्यावर ... सिग्नलवर जणू प्रोजेक्ट होत होते! अगदी जेव्हा पहिल्यांदा १९९० च्या आसपास पाहिलेला हा चित्रपट, मावशी कडे राहायचो मी तेव्हा, दूरदर्शन वर लागलेला दुपारी, जेवणाची वेळ होती, माझी मावशी स्वभावाला जामच कडक, तिने रागावून बघीतलं तरी तळहाताला घाम येईल असली कडक! जाम घाबरायचो मी तीला... हा पिक्चर लागला आहे हे बघताच तिने रिमोट बाजूला ठेवला आणि म्हणाली समीर हा सिनेमा बघ... आयुष्यात कुठल्याही बाईला रडताना पाहिलं नव्हतं, त्यात माझ्या मावशी सारखी...