आम्ही ९०साली बोरिवलीच्या श्रीगणेश इमारतीत राहायचो तेव्हाची गोष्ट, मला प्रसंग आठवतो पण विषय आणि त्याची गांभीर्यता नव्हती माहीत. आज आईशी गप्पा मारताना जुन्या दिवसांच्या गप्पा रंगल्या, त्यातून काही गोष्टी *रंगीत* झाल्या... आमच्या इमारतीत अर्धे गुजराती आणि अर्धे मराठी होते, गणपती यायचे दिवस होते, त्यामुळे मराठी घरांतुन साफसफाई वगैरे करायची वेळ, घरातून काय अगदी अख्खी इमारातच मस्त छान स्वच्छ असावी हा स्वच्छ हेतू. तर झालं काय, माझी आई नेहमीप्रमाणे संध्याकाळची दळण आणायला गेलेली, इमारतीच्या फाटकात शिरतानाच भिडे काका ( आईच्या लहानपणीपासून ओळखीचा, आक्षीचा शेजारी, आमचा विष्णू भिडे, पण म्हणायचे सगळे मधू ) ... तर मधू भिडे एका माणसाकडे तावातावाने गेला, पायातली चप्पल हातात घेऊन त्या इसमाच्या श्रीमुखात खेचली, आई पळत पळत डबा बाजूला ठेऊन काय झालं काय विचारताना मधू भिडे म्हणाला, सोड... अजून दहा वेळा मारीन त्याला कानाखाली! गर्दी वाढली, एका बाजूला गुजराती एका बाजूला मराठी... नंतर कळाला प्रकार. तो गांधी म्हणून एक होता, आमच्या इमारतीचा कार्याध्यक्ष (सेक्रेटरी) आणि त्याच्या घरी चालू होते घराचे काम...