निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया

निवांत गरीब स्वच्छ जॉर्जिया - भाग १ माझ्या बाबतीत सिनेमा नाटक असो किंवा कुठला काँसर्ट... तिकिटं घ्यायची आणि प्रत्यक्षात टायटल / सुरुवात आल्याशिवाय जे तिकीट घेतलय त्या इव्हेन्टचा विचारच करायचा नाही, कारण काय!? वेळच नाही... असं काहीसं ह्या जॉर्जिया ट्रिप बद्दल पण घडलं. बायकोने अचानक मित्रांशी बोलता बोलता ईद सुट्ट्यांना दर वर्षी प्रमाणे दुबईतच बसण्या पेक्षा कुठेतरी जाऊ ह्यावर चर्चा झाली आणि मी आणि नीलम सुरश्री पण "हो हो जाऊ की" चा 'मिले सूर मेरा तुम्हारा' सारखं केलं न लगेच आणि बघता बघता जॉर्जियाचा प्लान झाला पण... तिकिटं, रहायचे प्लॅनिंग... कुठे फिरायचं काय बघायचं सगळं काही बायको न सुरश्री नीलम ने ठरवलं, मी आपला हं हं करत संभाषण / काहीही निर्णय घ्यायचे टाळत होतो... आणि मग तो दिवस आला! आता उद्या जायचं आहे, मला कधीची फ्लाइट आहे हे पण माहीत नव्हतं, लाज वाटली म्हणून गूगल वर 'माय नेक्स्ट फ्लाइट' असे शोधले तेव्हा कळलं सकाळी ९:५०ला उड्डाण आहे आणि त्यासाठी लवकर उठून शार्जाला निघायचं आहे, ह्या विचाराने झोप येईना, मग काय सकाळी उठायच्या वेळेला झोपायची स्वप्न...