पायऱ्या, लिफ्ट मजले आणि मी...
॥श्री॥ पायऱ्या, लिफ्ट मजले आणि मी... पहिल्या दोन्ही तितक्याच महत्वाच्या... जितका मजला! फरक इतकाच की मजले जिथे जास्त तिथे लिफ्ट पायऱ्यांना मागे टाकते आणि जिथे मजले कमी तिथे लिफ्ट 'खालीच' राहते. सुदैवाने लिफ्ट बद्दल एकदाच वाईट अनुभव आला... तो ही इतका गंभीर नाही, पण तरी विसरलो नाहीये, काही प्रसंग अगदी घडलेत तसे फ्रेम बाय फ्रेम आठवतात त्यातला हा एक.. खुप लहान होतो... नक्की आठवत नाही पण नक्कीच शाळेत जाण्या आधी इतका लहान... डोहा कतारच्या शेरेटन हॉटेल मधली लिफ्ट असावी, मी घाई घाई करत पटकन लिफ्ट मध्ये घुसलो... वळून बघतो तर आई बाबा बाहेर आणि लिफ्टचे ते काचेचे दरवाजे बंद!... मी बघतोय... वरती अकरा वगैरे मजले गेले...गंगा जमुना...त्या २-३मिनिटांत बादल्या भरून रडत होतो... ते पांढरे बगळे (कंदूरा घातलेले शेख लोक) बघुन तर अजुनच भीती वाटत होती, मधलं काही आठवत नाही लिफ्ट चा दरवाजा अचानक उघडला आणि बाबा दिसले समोर... आणि मी फेरारीसारखा पिकअप घेत त्यांना जी काही धडक दिल्ये!... जीव मुठीतून थेट मिठीत! त्यानंतर लिफ्ट हा विषय जरा नाजुक पद्धतीनं पाहिला मी... घुसलो की बाहेर पडायचे ...