पायऱ्या, लिफ्ट मजले आणि मी...

॥श्री॥

पायऱ्या, लिफ्ट मजले आणि मी...

पहिल्या दोन्ही तितक्याच महत्वाच्या... जितका मजला!
फरक इतकाच की मजले जिथे जास्त तिथे लिफ्ट पायऱ्यांना मागे टाकते आणि जिथे मजले कमी तिथे लिफ्ट 'खालीच' राहते.

सुदैवाने लिफ्ट बद्दल एकदाच वाईट अनुभव आला... तो ही इतका गंभीर नाही, पण तरी विसरलो नाहीये, काही प्रसंग अगदी घडलेत तसे फ्रेम बाय फ्रेम आठवतात त्यातला हा एक..

खुप लहान होतो... नक्की आठवत नाही पण नक्कीच शाळेत जाण्या आधी इतका लहान... डोहा कतारच्या शेरेटन हॉटेल मधली लिफ्ट असावी, मी घाई घाई करत पटकन लिफ्ट मध्ये घुसलो... वळून बघतो तर आई बाबा बाहेर आणि लिफ्टचे ते काचेचे दरवाजे बंद!... मी बघतोय... वरती अकरा वगैरे मजले गेले...गंगा जमुना...त्या २-३मिनिटांत बादल्या भरून रडत होतो... ते पांढरे बगळे (कंदूरा घातलेले शेख लोक) बघुन तर अजुनच भीती वाटत होती, मधलं काही आठवत नाही लिफ्ट चा दरवाजा अचानक उघडला आणि बाबा दिसले समोर... आणि मी फेरारीसारखा पिकअप घेत त्यांना जी काही धडक दिल्ये!... जीव मुठीतून थेट मिठीत!

त्यानंतर लिफ्ट हा विषय जरा नाजुक पद्धतीनं पाहिला मी...
घुसलो की बाहेर पडायचे ह्याची घाई!
कित्येक वेळा चुकीच्या मजल्यावरच उतरतो मी..
अगदी अजुन ही!

लिफ्ट मध्ये एकमेकांकड़े बघुन हसणे,
त्यात मूड नसेल तर बघुन न बघितल्यासारखे करणे,
लिफ्ट मध्ये शिरलेल्या मोबाइल वर बीझी असलेल्या इसमास आपुलकीने 'कुठल्या मजल्यावर जायचे आहे?' असा मौलिक टोचरा प्रश्न विचारणे, मग त्या इसमाचा पाहिजे तो मजला सांगून न बघता 'थैंक्स' म्हणणे,
लिफ्ट मध्ये ओव्हरलोड किंवा जास्त माणसे झाल्यास प्रत्येक मजल्यावरती थांबून बाहेरच्या आत घुसू पाहणाऱ्या जीवांकडे निर्जीवप्रमाणे लिफ्टचे दरवाजे बंद होईपर्यंत बघत उभे रहाणे,
त्यात एखादी सुंदरी असेल तर त्या मजल्यावर आत असलेल्या कोणाचा बळी का देता येत नाहीये याचा विचार करणे,
वडापाव/पिझा/बर्गर वगैरे डिलिवरी बॉय आल्यास त्या १०×१०च्या लिफ्टचे रूपांतर हॉटेल मध्ये होणे,
कोणी पठाण घुसल्यास नॉर्मल ऑक्सिजन मिळवण्या साठी जो येईल तो मजला ला 'आपला मजला' बनवणे...
एखादं छान बाळ/मूल आले की त्याकडे बघुन चेहरे सर्कशीत नोकरीला असल्यासारखे करणे,
बॉसबरोबर असल्यास आपण जे 'नाही' आहोत असे वागणे,
मित्रांबरोबर असल्यास २-३जोक मारून/ऐकून फिदीफिदी हसणे,
कोणी आजी आजोबा टाईप्स मंडळी असल्यास लिफ्टचे दार धरून ठेवणे,
इत्यादी प्रकार आपल्या रोजच्या जीवनात घडत असतातच म्हणा!

असो... पण पायऱ्या त्या पायऱ्या!
त्या कठड्याचा गळा आवळून पोटऱ्यांचा पुरेपूर वापर करत एकावेळी २ते३ अश्या पायऱ्यांचा समाचार घेत जायचो... आणि खाली उतरताना... तळ पायात मुंग्यांची जाहीर सभा बोलवत कधी कधी अक्खा मजला एका उडीत (चेष्टा नव्हे) पार करत जायचो! कडक मजा यायची... अजुन ही सोडत नाही एकावेळी २पायऱ्या म्हणजे जन्मसिद्ध हक्क् असल्या सारख्या 'बजावतो'... त्यात पोपट ही होतो कधीकधी...धडपड... चालायचच! अजुन किती वर्ष असा वागेन माहीत नाही, उतरताना मात्र शांत उतरतो... उगाच ते धड़ाधड़ करत पायाला मुंग्या आणायला माझं वजन आता ३०-४०किलोचं उरलेले नाही ह्याचा विचार करत गपचुप सावकाश उतरतो, नाहीतर पायात मुंग्यांऐवजी डोंगळे यायचे!

जुन्या इमारतींच्या पायऱ्या तर जाम यूनिक, आयुष्यभर लाखो लोकांच्या पायांचा इतका प्रभाव की खालच्या मजल्याच्या पायऱ्या दिसायचा वरच्या पायऱ्यांच्या लाकडातून... इतके झिजलेले असायचे! गुळगुळीत कठडे... अंधार, एक वेगळाच 'एटमोस्फीअर' असायचा...

पायऱ्यांची सर लिफ्टला नाही... मी तर लिफ्ट मध्ये खचाखच भरलेले लोक पाहिले की पायऱ्यांना 'पर्याय' करतो... दम लागतो पण परत लहानपण येतं रक्तात... तो ऑफ्फिसचा/घरच्या बिल्डिंगचा जीना माझ्या बोरिवलीच्या जीन्यात ट्रांसफॉर्म होतो! ते फीलिंग आलं की टाइम ट्रैवल घडतं... ट्राय करा तुम्ही पण! सॉलिड फीलिंग!!!

आता मजल्यांबद्ददल बोलायचं तर हल्ली काय गगनचुंबी इमारती इज लाइक नॉर्मल थींग! मजला कितवा/कुठला पेक्षा कोणाचा ह्याला महत्व! ह्या स्टेटमेंटचा 'निचांक' म्हणजे मॉडेल कॉलनीमध्ये राहत होतो तेव्हा समोरच्याच बिल्डिंग मध्ये सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे रहायचे! ह्यांच प्रचंड आकर्षण! अजुन एक मजलायुक्त किस्सा म्हणजे बोरिवालीच्या 'श्री गणेश' अपार्टमेंट मधुन जेव्हा पुण्याच्या मॉडल कॉलनीतल्या 'राधा नगरी'अपार्टमेंट मध्ये राहायला आलो तेव्हा ह्या दोन जागांमधले कंपेरिझन ऐकलत तर विश्वासच बसत नाही...
• दोन्हीचा मजला ३रा
• दोन्हीचा फ्लैट नम्बर ९
• ज्यांचाकडून आम्ही फ्लैट विकत घेतला त्यांचे नाव भगवान, माझ्या वडलांचं नाव श्रीकृष्ण
• त्यांच्या मुलाचं नाव समीर माझंही नाव समीर!
• एंड लास्ट बट नॉट द लीस्ट... त्यांच्या बायकोचं नाव शुभदा आणि माझ्या आईचं नाव ही शुभदा!!!
अश्या गमती जमती... ऐकावं ते नवलच!

मजले मजले
पहिले दूसरे तीसरे...
मजले मजले
हसले मजले
रुसले मजले
कधी बरोबर कधी...
चुकले मजले
हुकले मजले
मजले मजले
नंबरी मजले
काही लिफ्ट...
काही पायऱ्यांवाले
मजले मजले
असले मजले
तसले मजले
आठवणींत मजले


#सशुश्रीके | १४/०३/२०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!