'सुका मेवा'
पंधरा वर्ष झाली असतील... हो आरामात पंधरा वर्ष !
तेव्हा परदेशी 'काका' होते, मस्त पिळदार मिश्या आणि शरीरही,
वय साठ असून तरुणाला लाजवेल असे,
त्यांनी नक्कीच त्यांची 'जवानी' गाजवली असणार ह्यात वाद नाही!
राहायचे.. राहायचे कशाला, अजूनही राहतात,
सहकार नगर २ मध्ये, चंद्रकांत गानू. (माझ्या वडलांच्या बालमित्र आनंद गानू ह्यांचे चुलत बंधू) त्यांच्या घरी भाड्याने एका खोलीत राहतात.
घरात, घरात म्हणजे त्या एका खोलीत त्यांची बायको, पलंगावरच... म्हणजे त्यांना चालता फिरता यायचं नाही, जे काही करायचं ते सर्व बेड वरच.
त्या दोघांना जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा लहान होतो... त्यामुळे त्यांच्या ह्या परिस्थितीचा फारसा 'सीरियसनेस' नव्हता.
मला ते आठवतात ते त्यांच्या 'सुका मेवा' साठी! मी जेव्हा जेव्हा गानू कुटुंबीयांकडे जायचो, तेव्हा तेव्हा परदेशी काकांच्या दरवाज्या पाशी आलो की, "समीर, ये बेटा..." असा आवाज यायचा, माझे चपला/बूट काढून झाले की पाय थेट त्यांच्या घराच्या फरशीवर, मला बघून 'जिलेबी' मधल्या त्या जाहिरातीतल्या मुलाच्या चेहऱ्यावर जसे हावभाव असतात अगदी तसे काकांच्या चेहऱ्यावर! मग पुढला पडाव जवळच असलेल्या कपाटावर, तो गोल डबा त्यात पाच भाग, एकात बदाम, एकात काजू, एकात खजूर, एकात मनुका आणि एकात पिस्ते! माझे डोळे त्या पवनचक्कीच्या चक्रा प्रमाणे भरभर फिरायचे, काका म्हणायचे "अरे घे ना, तुला काय हवं ते पाहिजे तितके घे!" पहिल्यांदा अगदी संकोच करत एक-दोन काजू बदाम घेत आणि मग हावरटपणा करत अक्खी मूठ तुडुंब भरायची, परदेशी काकू स्माईल द्यायच्या. तिथून मग मी वरच्या मजल्यावर गानू काकांकडे जायचो, मग परत घरी जाताना त्वरित 'देजावू'
हे सलग ६-७वर्ष घडले, मग मी मुंबईत कामानिमित्त अडीच वर्ष, त्या अडीच वर्षात ३-४दाच जमले असेल, पण आमची ती 'सुका मेवा' भेट अगदी तशीच, काका अजूनही तसेच, अभी भी वोही जोश वोही होश! वय ७०च्या घरात असून!
मुंबई सोडलं, आता दुबईत, वर्षातून एकदा भारतात,
दर वर्षी एकदा भेट, २००८ ते २०१५ काका अजूनही बऱ्यापैकी जोश और होश संभालके,
तशीच हाक आणि 'सुका मेवा'ही.
२०१६ च्या जानेवारीची ती २९ तारखेची रात्र, मी व माझी आई आणि अन्वया (माझी कन्या) अमृता (अन्वायाची आई) गानू काकांकडे गेलेलो, पुर्वी आई बाबांबरोबर यायचो तेव्हा गानू काका असायचे आता गानू काका नाहीत, माझे बाबा नाहीत आणि जुने घर ही नाही, इतका मोठा फरक. परदेशी काकांचा दरवाजा तहा टक्के उघडा बघून मी गानू काकांच्या घरी गेलो, वर काकू आमची वाट पाहत होती, त्यांच्याकडे जेऊन वगैरे झाल्यावर अन्वयाला 'बोर' व्हायला लागले, म्हणून तीला एका गमतीचे आमिष दाखवून मी परदेशी काकांकडे गेलो.
काका त्यांचा पलंगावर बसलेले होते, माझ्याकडे पाहून डोळे अजून बारीक करत स्मितहास्य सरकवत काही बोलणार तितक्यात मीच विचारले,
"काका, ओळखलं का मी समीर... आणि ही अन्वया माझी मुलगी"
काकांनी मान हलवत कधी आलास वगैरे विचारले, मी म्हणालो "झाले तीन आठवडे, आता पर्वा जाईन परत",
काकांनी परत विचारले! "अरे इथे कधी आलास!'" आता हा खरा प्रश्न होता, ज्याचे उत्तर मला द्यायला लाज वाटत होती.
इतके वर्ष पाळलेला तो आनंदी नियम आज मी तोडलेला होता.
त्यांना वाईट वाटायला नको म्हणून उगाच सबबी द्यायला लागलो… तुमचा दरवाजा बंद होता! (वास्तविक त्यांचा दरवाजा कधीच पूर्ण बंद नसतो!)
आणि मी 'इथे' येउन तासभर झाला असेल (त्यांच्याकडे आधी गेलो नाही ह्याचा कबुलीजबाब)
त्यात अन्वया मला गम्मत हवी मला गंमत हवी चा हट्ट करत होती, माझे डोळे 'सुका मेवा'चा डबा शोधत होते, हे पाहून परदेशी काका मला हात दाखवत जवळच्या कपाटात असलेल्या एक छोट्या स्टीलच्या डब्यातुन अन्वयाला हवी असणारी गम्मत द्यायला सांगतात, त्या डब्यात ५-६ काजूकंदच्या वड्या होत्यान, मी त्यातली एक काजूकंद वडी काढली आणि अन्वयाला दिली, अन्वया खुश! मी मात्र काकांच्या प्रश्नांमुळे आणि न मिळालेल्या माझ्या नेहमीच्या खाऊ मुळे अस्वस्थ, अन्वयाची ती वडी काही सेकंदातच फस्त झाल्यानी "तिला अजून एक दे रे, आहेत नं त्यात अजून, की संपल्या?" अशी विचारणा परदेशी काकांकडून आली, हे सर्व चालू असताना माझं लक्ष त्यांच्या पायांवर गेलं, म्हणजे तसं अगदी आल्या-आल्याच गेलेलं पण आता शंभर टक्के गेलं, पाय सर्वसाधारण आकारापेक्षा दुप्पट झालेले, त्यांचं बोलून झाल्यावर उरलेल्या वेळात श्वासा बरोबर 'हौ हौ हौ' असा लहान आवाज, मान सतत एका ठराविक हळू गतीने हलत होती. परदेशी 'काका' आता 'आजोबा' झालेल्याची जाणीव अगदी प्रत्येक सेकंदाला जाणवत होती, तो जोश आणि होश नव्हता, परदेशी काकू मात्र जश्या मी १५वर्षांपूर्वी पाहिलेल्या तश्याच, घरात मात्र कमालीची स्वच्छता, कदाचित त्यांच्याकडे काम करणारी बाई असावी, बाकी टीव्ही आणि फर्नीचर मात्र तेच जुने. पण… पण... तो 'सुका मेवा'चा डबा अजून काही दिसत नव्हता.
तेव्हढ्यात ह्रिषिकेश नावाच्या मित्राचा फोन आला, ज्याला मी कधी भेटलेलो नाही, सध्याच्या फेबु आणि व्हाट्सएप जनरेशन वाला मित्र, त्याला म्हणालो "कुठायस मित्रा, काचेच्या गणपती पाशी ये…" हे ऐकताच परदेशी काका म्हणाले "काचेचा गणपती? हे काय इथेच आहे, एक गल्ली सोडून"
मी अन्वयाला उचलून घेत आजोबांना आश्वासन देत निघालो, "चला काका निघतो, परत जाताना भेटून जाईन"
मित्राला भेटून गानुंकडे परत आलो... वर गानुंकडे जाताना परदेशी काकांचा दरवाजा नेहमी प्रमाणे दहा टक्के उघडा होताच आणि घरी जाताना ही, मुद्दामून मी त्यांना भेट दिली नाही, मी रागावलेलो, स्वतःवरच, 'सुका मेवा' ची हाव अजून ही संपलेली नव्हती. 'काका' वाले परदेशी 'आजोबा' झालेले पहायला मन तयार नव्हतं.
#सशुश्रीके । १ फेब्रुवारी २०१६
(दुसर्या दिवशी मी आईला परदेशी काकांबद्दल सांगितले, ती म्हणाली ते फार हट्टी आहेत, त्यांच्या वयाचे सर्व मित्र त्त्यांना वृद्धाश्रमात राहण्याचे सल्ले देतात, पण त्यांना कोणावरही अवलंबून राहावयाचे नाही, एक बाई येते सकाळी आठ ते अकरा, त्यांच्या घराची साफसफाई करते आणि जेवण बनवते. हे ऐकून मी फक्त 'ह्म्म्म' शिवाय काहीच करू शकलो नाही. तो 'सुका मेवा' परत मिळणार नाहीये ह्याची खंत आयुष्यभर राहणारे.)
खरच,श्री व सौ परदेशी काकांचे सुबक नेटके व अस्सल ०यक्त्त्वि बहारीने लिहिले आहेस,,,१५ वर्ष झाली,हे लिहिण्याला,,सौ मंदाताई गणपतीत व श्री काकांना ,१ जाने ला देवाज्ञा झाली,विनम्र श्रध्दांजली
ReplyDelete