अनोळखी ओळख

खुप वर्षे झाली आज लिहीन नंतर लिहीन असं म्हणता म्हणता आज योग आला लिहायचा हे...

अनोळखी ओळख

बोरिवलीच्या 'श्री गणेश' बिल्डिंग मधला तळ मजला, बंद घर... काचा फुटलेल्या, त्या घरा समोर खेळायचो आम्ही मुलं, चेंडू जायचा आत एका घरात, कित्येकदा तो गेलेला चेंडू मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, ते प्रयत्न करत करत आत डोकावायचो... पूर्वी दरवाज्याच्या वर एक आडवी खिडकी असायची त्यातून की कुठून तरी आठवत नाही पण आत शिरलेलो, प्रचंड धूळ जळमटे वगैरेंनी श्रीमंत झालेलं ते घर! 

मालक आर्किटेक्ट किंवा तसल्याच काही क्षेत्रात असावा. सुबक टुंबदार (फोम बोर्ड / थर्माकोलचे) बंगले आठवतात! आजूबाजूला छान छोटी छोटी झाडे, पार्किंग मध्ये गाडी... 

आणि चेंडू हातात... बाहेर मित्र वाट बघतायत न मी त्या छोट्या बंगल्यांकडे बघत बसायचो.

कोणालाही सांगितलं नाही की मी काय पाहायचो आत, आत चेंडू जायची वाट बघायचो! गेला की मी जाणार आत हे ठरलेलं.

नंतर कळलं की मालक अमेरिकेत वगैरे असतो, फ्लॅट आहे पडूनच. नंतर आम्ही मुंबई सोडलं, आता ह्या गोष्टीला २९/३० वर्ष होतील.

ते घर आहे तसेच राहीलं आहे मनात, ती धूळ बंगल्यावरची... काय कडक फिनिश! तो जो काय माणूस असेल ज्याने ती कलाकृती केली असेल त्याने नक्कीच 'लै भारी' दिवे लावले असतील त्या क्षेत्रात अमेरिकेत किंवा कुठेही असेल तिथे फॉर शुअर!

असे किती तरी असतील नई... जे झाले असतील प्रसिद्ध / यशस्वी, त्यांचे काम असे मनात राहात असेल कोणाच्या कोणातरी. 

अनोळखी लोकं अशी कायमची ओळख ठासवून जातात.

#सशुश्रीके | २ जुन २०२१

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...