आजी आजोबा आणि मी...



काय पुण्य केलं आहे मी मागच्या जन्मी काय माहीत... दोन्ही बाजूंच्या आजी आजोबांचं प्रेम मिळालं, खूप छळलो त्यांना आणि त्यांनी तितकेच लाड करून परतफेड केली 😊

'आण्णा'

बाबांचे वडील, आण्णा म्हणायचे सगळे त्यांना, एक दिवस खूप ठसका खोकला आला, पुढचं आठवत आहे मी थेट माझ्या शेजाऱ्यांकडे होतो, परत घरी आलेलो तेव्हा अण्णांच्या नाकात कापूस आणि ओठांवर तुळशीचे पान होते, आणि मला त्यांना प्रदक्षिणा घालायला लावलेली. त्या दिवसाआधी यांबरोबर रोज मंदिरात जायचो, त्यांच्या मित्रांबरोबर खेळायचो, त्यांच्या मांडीवर जणू सिंहासनावर बसल्या सारखं वाटायचं, पेपर रेडिओ टीव्ही पाहात असताना माझा व्यत्यय नेहमीचा होता त्यांना, पण हसतमुख चेहरा, हे सगळं मला आठवत आहे, मी बालवाडीत वगैरे असून आठवत आहे म्हणजे खरच कमाल आहे! तरी कधीतरी हावरट पणा म्हणून काही किस्से आठवतात का हा प्रयत्न चालू असतो. पण शेवटी माणूसच आहे, असं इतकं कसं आठवेल! 

आठवलं की लगेच लिहायचं... पुन्हा आठवेल का? का नाही...ह्या भीतीने का होईना!

जास्त किस्से आठवतात ते आईच्या वडिलांचे, 

'आप्पा'

आप्पा म्हणायचो सगळे त्यांना... भयंकर कडक स्वभाव. उठ म्हंटलं की उठ बस म्हंटलं की बस... अगदी पुलं म्हणतात तसं... खरा कोकणातला माणूस कसा असतो, अगदी तसेच होते! पावसात शेण सारवलेल्या अंगणावर घसरून पडेन मी हे त्यांना सांगायचं असायचं, पण जो काय त्यांचा शब्दांचा मारा असायचा... मी पडणार नसलो तरी त्यांच्या हाकेवरून पडेन मी काय अशी अवस्था असायची! ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर त्यातल्या त्यात काही सौम्य शिव्या आणि धपाटे तर हमखास, असं ऐकलेले की मामा मंडळीने जर ऐकलं नाही तर त्यांना नारळाच्या झाडाला बांधायचे दोरीने शिक्षा म्हणून... आणि मग उभे राहा रडत! अश्या अजब शिक्षा... पण नाही हो, मी नातू ना... माझ्यावर जीव पण होता त्यांचा. मुंजीचा तो दिवस मला अजूनही आठवतो, चांदीच्या ताटात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले तेव्हा मागून हाक मारली बाजूला झालो तर अप्पांचे प्रतिबिंब अजूनही आठवते, *अरे नीट कालव भात, लिंबू पीळ...* की असेच काही तरी उपदेश पण केलेले, आता उष्टे खायचे नाही कोणाचे... अगदी आई बाबांचे पण नाही वगैरे बोलले. असो.. १९९० सालची माझी मुंज.. त्यानंतर त्यांना अर्धांगवायू चा झटका आला, ते कडक राकट कष्टाळू अंग खाटेला टेकलं. पण माझा बलिशपणा काही संपला नाही, त्यांना भेटलो की आता त्यांना मला मारता येत नाही हा क्रूर आंनद माझ्या तोंडावर असायचा! हे आठवून डोळ्यात पाणी येतं अजून ही, जसं आत्ता आलय, जास्त लिहिवत नाही. 

खूप किस्से आहेत , पर अब फिर कभी...

असो

सर्व आजोबांना माझा माणपासून नमस्कार 
शेवटी आपल्या आई बापाचे बाप ते! 

#सशुश्रीके २०२२/०३/१८

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...