डोंगऱ्यांचा प्रवीण दादा (भाग- १) बांबू शोधत होता भुंगा, मी प्रवीण दादाला सांगत होतो, 'दादा... अरे हा भुंगा बघ बांबू समजून लोखंडी पायंपावर बसतोय कसा' , तो माझ्याकडे बघून हसतो, त्या हसण्यात एक निराशा होतीच... न सांगता न बोलता जाणवणारी! एखाद्या 'दादा'ला १५/२०वर्षांनी भेटणं, आणि त्याला दादा म्हणणं, वेगळं वाटतं, अडकीत्यात अडकलेली सुपारी जशी फट्ट आवाज करून फुटते तसं काहीसं! चुना लाऊन हरवलेली ती वर्ष बोटांच्या चिमटीत विसाऊन गेलेली असतात, चर्र होतं मग 'दादा' म्हणताना! काकाचं वय असताना दादा हाक मारताना. जरा मागे नेतो तुम्हाला... आक्षीच्या स्तंभाच्या जवळच वळणावर होतं डोंगऱ्याचं छोटं दुकान, किराणा मालाचं, आज ही आहे पण आता विटा सिमेंट आणि पत्र्याचं, ते जुनं नाही... शेणाने सरावलेलं, अंगणात बांबूच्या आधारावर कौलारू शेड असलेलं, २०-३०बरण्यांनी सजलेलं, ती मजा नाही, पण माणूस आहे तोच, नाव प्रवीण (दादा) डोंगरे! आई मी आणि सुषमा काकू त्याचं दुकान बघून थांबलो, त्याने लगेच 'माई, कशी आहेस!?' असा ओळखीचा प्रश्न केलाच, आई पण त्याच ओळखीने उत्तरही दिले, लहानपण...