डोंगऱ्यांचा प्रवीण दादा
डोंगऱ्यांचा प्रवीण दादा (भाग-१)
बांबू शोधत होता भुंगा, मी प्रवीण दादाला सांगत होतो, 'दादा... अरे हा भुंगा बघ बांबू समजून लोखंडी पायंपावर बसतोय कसा', तो माझ्याकडे बघून हसतो, त्या हसण्यात एक निराशा होतीच... न सांगता न बोलता जाणवणारी!
एखाद्या 'दादा'ला १५/२०वर्षांनी भेटणं, आणि त्याला दादा म्हणणं, वेगळं वाटतं, अडकीत्यात अडकलेली सुपारी जशी फट्ट आवाज करून फुटते तसं काहीसं! चुना लाऊन हरवलेली ती वर्ष बोटांच्या चिमटीत विसाऊन गेलेली असतात, चर्र होतं मग 'दादा' म्हणताना! काकाचं वय असताना दादा हाक मारताना.
जरा मागे नेतो तुम्हाला... आक्षीच्या स्तंभाच्या जवळच वळणावर होतं डोंगऱ्याचं छोटं दुकान, किराणा मालाचं, आज ही आहे पण आता विटा सिमेंट आणि पत्र्याचं, ते जुनं नाही... शेणाने सरावलेलं, अंगणात बांबूच्या आधारावर कौलारू शेड असलेलं, २०-३०बरण्यांनी सजलेलं, ती मजा नाही, पण माणूस आहे तोच, नाव प्रवीण (दादा) डोंगरे!
आई मी आणि सुषमा काकू त्याचं दुकान बघून थांबलो, त्याने लगेच 'माई, कशी आहेस!?' असा ओळखीचा प्रश्न केलाच, आई पण त्याच ओळखीने उत्तरही दिले, लहानपणीचे मित्र ते! आईने खूप कौतुकाने त्याची ओळख करून दिली, 'सिलेंडर संपला की आजी सांगायची प्रवीणला, आजीसाठी नेहमी सिलेंडर नेऊन द्यायचा सायकल वरून, खूप कष्टाळू...' अशी स्तुतीसुमनं आईकडून अगदी सहज पणे काकूंच्या कानात एक-एक करत उतरू लागली. मी सगळं नुसतं ऐकत होतो, आणि दुकानाकडे आणि त्याच्याकडे पाहाता पहाता मला 'फ्लॅशबॅक' दिसत होता, आई सांगत होती... जणू काही ती 'सबटायटल' आणि माझ्या डोळ्यासमोर ती सांगेल तो क्षण अगदी 3D!
कष्ट तेव्हाचे आणि प्रवीणचा तो देह-ओरडून सांगत होता की कष्ट आणि तो जीवलग मित्र आहेत! ~हा-हा... मोठा दंड~ असं म्हणतो आपण तसे त्याचे मनगट होते... नाकावरचा चष्मा जणू कधी काढलाच नाही असा खड्डा पडलेला नाकाच्या त्या भागावर जिथे चष्मा अडकवतो आपण. दाढी केस अर्धे पांढरे झालेले, पण चेहऱ्यावरचा आनंद मात्र लाजवणारा, त्याच्या बोलण्यावरून आम्हाला खूप 'मिस' करतो हे जाणवत होतं.
खरं सांगतो! हे असं काही घडलं की ना, लाज सोडून घट्ट मिठी मारून रडावसं वाटतं... सांगावंसं वाटतं की मी १००पटीने जास्त 'मिस' करतो वगैरे. पण नाही! एक पडदा असतो ना ठरावीक वय झालं की, हसायचं सत्य परिस्थितीवर आणि परत भेटू रे नक्की वगैरे सांगून निघायचं!
तेव्हढयात त्याने आईचा नंबर विचारला, मी दिला, सेव्ह करताना, Shubhada maai असे नाव टाकले, ते पाहून अजूनच सेंटी व्हायला झालं, ओळख कशी टिकते अगदी कितीही वर्ष उलटू देत, ह्याच उत्तम उदाहरण LIVE पहात होतो, मग नंबर सेव्ह केल्यावर म्हणाला 'अरे मध्ये माझ्या बहिणीने आपल्या अक्षीतल्या बापट काकांबद्दल एक लेख पाठवलेला, अर्धवट मिळालाय, तूच लिहिलेलास ना!? त्याचा पुढचा भाग पाठव! मी लगेच उरलेले २भाग पाठवले, मोबाईल लांब धरून चष्मा ऍडजस्ट करत म्हणाला 'आता नेट चालू केलं की मिळतील, वाचतो मग.'
१०/१५मिनिटांनी निघताना आई म्हणते प्रवीणला, 'तुझ्याकडे कोयता आहे का!?' प्रवीण दादा म्हणतो... 'नाही गं, हल्ली मिळतात कुठे, एक आहे घरी लहान, पण पकड जरा लूज आहे.' आई म्हणते 'चालेल' मग मी म्हणालो 'ठिकाय, आता चौल ला जातोय, परत येताना चक्कर मारु, तो पर्यंत आणून ठेव'
त्याने असच सोडलं नाही, 'अरे अलिबाग चा फेमस सोडा पिऊन जा थंड मस्त...' त्याने मला आणि आईला/काकुला एक एक सोडा बाटली दिली, खरच फेमस ह्या शब्दाला साजेसा होता सोडा, वादच नाही.
आम्ही निघालो... गाडी चालू करताना त्याला कधी परत भेटतोय असं झालेलं. पण भेटणार तर नक्की ह्या आशेने मन सुखावलं होतं.
क्रमशः
#सशुश्रीके | १२ जून २०१६
डोंगऱ्यांचा प्रवीण दादा (भाग-२)
संध्याकाळ झाली, ५च्या आसपास आम्ही चौल हुन अक्षीत यायला निघालो, येताना रस्त्याचं काम चाललेलं (सिमेंटीकरण) म्हणून पर्यायी मार्ग होता तो थेट अलिबागला जात होता, हे नंतर कळालं म्हणा, पण प्रवीण दादाला भेटायचं होतं, कोयता घ्यायचा होता त्यापेक्षा त्याला सांगितलं होतं येणारच. त्यामुळे मोठा वळसा घेऊन आम्ही अक्षीत पोहोचलो, गाडी लावली स्तंभापाशी.
सुषमा काकूंना बोर होईल म्हणून त्यांना म्हणालो गाडीतच बसा, आई आणि मी दादाच्या दुकानात गेलो, दुकानाच्या समोरच्या दादा हातात कोयता घेऊन नारळाच्या झापांचा खराटा बनवत होता, आम्हाला पाहून थांबला नाही तो, जरा वेग कमी झाला कामाचा इतकच, आई आणि त्याच्या गप्पा सुरू झाल्या. मी प्रत्येक क्षणाला छायाचित्रात कैद करत होतो... तितक्यात त्याची बायको आली, म्हणजे त्याने बोलावलं, कोयत्या सकट, मी ओळखलं तिला, जास्त नाही भेटलेलो तिला, पण चेहरा पाहिलेला आहे आधी हे जाणवलं.
गप्पा वाढत गेल्या आणि व्यक्तींची संख्या ही, आईच्याच शाळेतला तिचा मित्र आला, लहानपणीच्या आठवणींनी गप्पांना 'सेपिया टोन' आलेला, आजोबा, मामा पासून आत्ता पर्यंतच्या सर्व आठवणींची रीळं थोडक्यात मांडली जात होती, मी ही ऐकत होतो एका बाजूला सर्व, जरा दुकानाच्या बाजूला डोकावलं तर २मुली खेळत असताना दिसल्या... अगदी तश्याच जसे आम्ही खेळायचो, दगड-मातीत, आवाजाची पर्वा न करता, मनसोक्त, मी त्यांना पाहतोय हे बघून प्रवीण दादा आला आणि म्हणाला... ह्या आमच्या दोन कन्या, जवळ आल्या मग दोघी, ओळख करवून दिली माझी.
माझं लक्ष अधून मधून काकूंकडे जात होतं, त्या मोबाईल मध्ये व्यस्त होत्या, घड्याळाकडे ना पाहताच ( मला तिथून निघावसच वाटत नव्हतं, त्यामुळे स्वतःला त्या घड्याळाच्या काट्यात अडकवायचं नव्हतं ) मी रंगलेल्या गप्पा ऐकत राहिलो. पण अंधार पडणार आणि मग उशीर होणार हे लक्षात आलं, 'निघुयात आता' आईला हे सांगून अजून १०मिनिटे गेली... लहानपणी आई निघुयात का म्हणल्यावर पुढच्या १०मिनिटात प्रत्येक मिनिटाला १दा ह्या हिशोबाने निदान १०वेळा तरी 'आई चल ना!' हे माझे वाक्य असायचे, आज मात्र तसा हिशोब झालाच नाही, पण मग गाडीत बसलेल्या काकूंना पाहून मी सगळ्यांना हात दाखवला, आईला म्हणालो 'चल निघुयात' तितक्यात आईने दुकानावरचे पापड घेतले दोन पॅकेट्स, त्याचे पैसे देऊन आम्ही निरोप घेतला.
त्याने आदरातिथ्याने पाजलेला तो सोडा अजून जिभेवर आहे, आयुष्यात विसरणार नाही तो! काही गोष्टी/पदार्थ अमूल्य होतात अयुष्यात, तसाच तो आईसक्रीम सोडा... त्या दिवसापासून... पुन्हा गेलो की २-३ पिणार वेगवेगळ्या फ्लेवर्सचा!
लिहिताना जाणवलं... खंत इतकीच की लहानपणी फोटो काढता यायचे नाहीत, सगळं जे काही आहे ते लेखणीतुन बाहेर निघतं, दादाची एक छबी आठवत आहे... मी आणि आई स्तंभावरून घरी जात होतो, मला बघून थांबलेला, सायकलवरचा, सिलेंडर घेऊन जाताना, माझी विचारपूस करायला! तसाच प्रसन्न चेहरा आज ही, क्या बात है!
काही लोकं जाम जिव्हाळा लावून जातात कळत-न-कळत, आयुष्यात परत भेटल्यावर त्याची जाणीव होते इतकच!
परत भेटू प्रवीण दादा... लवकरच!
#सशुश्रीके | १६ जून २०१७
Comments
Post a Comment