'वजनदार आठवणी'
पूर्वी लोकं एकमेकांना पत्र लिहित, खुशाली... अडचण किव्वा काहीही. म्हणजे आत्ता मी खुश आहे किंवा माझी लागलेली आहे हे कळवण्यासाठी, इतर कुठल्याही व्यक्तीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर निदान आठवडा तरी लागायचाच पत्र व्यवहाराला, मनी ऑर्डर आणि ते सगळे प्रकार...
हळूहळू अंतर कमी होत गेले. आज आत्ता मी फेसबुक व्हाट्सएपच्या माध्यमातून किव्वा ई-मेल वगैरे करुन काही क्षणात / तासात 'रिप्लाय'ची अपेक्षा ठेऊ शकतो! ऑनलाईन पैसे पाठवू शकतो, जगातल्या कान कोपऱ्यातून गोष्टी विकत घेऊ शकतो.
ह्या सर्वांची नोंद ठेवणे, जपणे आता सहज सोपे झालेले आहे...कारण जे काही करतो त्याची अप्रत्यक्षरीत्या नोंद होत असते.
हे फेसबुकचच बघा ना १/२/३ वगैरे वर्षांपूर्वी तुम्ही काय दिवे लावलेले आजच्या दिवशीचे 'रिमाईंडर' तुम्हाला मिळत असते, किंवा मेल मध्ये तुम्ही तुमचा पत्र व्यवहार शोधू शकता... किंवा व्हाट्सएपचे ही तसेच. हे सर्व झाले डिजिटल माध्यम. सगळं ढगात क्लाउड मध्ये म्हणे!
पण... 😔
पण घरी अश्या काही फायली आहेत, इन्वेलप्स आहेत, ज्यात जुनी पत्र, बिलं, ग्रीटिंग्स आहेत. पोस्टक्सार्ड्स, झेरॉक्स, प्रगती पुस्तक, जवळपास प्रत्येक गोष्ट कोणाच्या ना कोणाच्या हस्ताक्षरात, आजोबा, वडील, शिक्षक, मित्र वगैरेंचा... प्रेमाचा हिशोब त्या जीर्ण कागदावर बघायला काय मजा येते! डोळे सुखावतात, सध्याच्या डिजिटल आठवणींत तशी मजा नाहीये.
'आज काय, अंघोळीची गोळी घेतलीस का!?' असा टोमणा ऐकला असेलच तुम्ही कधीनाकधी आयुष्यात, अगदी तसच!
कागदावरच्या आठवणी, मग त्या कुठल्या ही स्वरूपात असोत, लिखाण, छायाचित्र वगैरे... मस्त वजन असतं त्यांना. तुलना होतेच, जुनं ते सोनं उगाच म्हणत नाहीत. 🤓
असो हे सर्व मी हाताने न लिहिता फोन वर टाइपतोय ह्याला काय म्हणावं कळेना! लिहायची सवयच नाही, लिहिलं तर ते स्वतः मलाच कळेल का ही शंका... कळलच तर ते तुमच्या पर्यंत पोचणार कसं!? आता सगळं झटपटची सवयच होऊन बसलीय. 😖
असो... आपल्या पुढील पिढी कडे आपल्या सारखा वजनदार आठवणींचा खजिना नसणार ह्याचं वाईट वाटतं. एवढच... बाकी जे अजून ही एक मेकांना आवर्जून पत्र लिहितात, पोस्टकार्डं पाठवतात अश्या लोकांना माझा मनाचा मुजरा.
#सशुश्रीके | ५ जून २०१७
Comments
Post a Comment