ते तीन बांबू
काय मस्त होते ते
लांब लचक
भुंग्यांनी प्रेम केलेले
उन्हात वाळलेले
रात्री पहारा देणारे
आमच्या अक्षीच्या
फाटकाची भूमिका बजावणारे
त्यावर बसून कित्येक आंबे खाल्लेत
माझी मूर्ती होती इतकी लहान
सहज दोघांच्या मधून जायचो
पलीकडे रास्ता काळा
कधी वितळलेला कधी ओला
सदैव माझी वाट पाहणारा
तेव्हाच्या अनवाणी आठवणी
अजून ही आहेत ओल्या
आहे एक फोटो अजून ही
बाबांनी काढलेला
बघतो अधून मधून
चाळता अल्बम
दिसतो मी मला
आठवणींतला
असतील कुठे आता ते
ते तीन बांबू!
#सशुश्रीके १२ जून २०२२
Comments
Post a Comment