जुनी वास्तु...

॥ श्री ॥

जुनी वास्तु... भाग १

          असा प्रकार की जेव्हा असते तेव्हा किम्मत नसते, आता खुप आठवण येते... पण टिकवुन ठेवल्ये... आहे मनात अजुन! आज तुम्हाला पण घेऊन जातो... भावे यांचे आक्षी गावातील एक कौलारु ८०-८५वर्ष जूने घर, पुरुषोत्तम जनार्दन भावे नावाची पाटी... मोरपीशी रंगाचा दुहेरी दरवाजा... त्या दरवाजाच्या उजव्या डाव्या बाजूला शंकरपाळी लाकडी फळ्या... त्याच रंगाच्या, पावसात न भिजता बसता यावे म्हणून मुख्य घराच्या कौलांचे एक्सेंशन, अडीच पायऱ्या... अर्धी पायरी शेणानी सारवलेल्या अंगणात हरवलेली, पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला एका माणसाला बसता येईल असा कठडा... तांबडी रंगाचा, कौलांवारुन पावसाचे पाणी पडून पडून झालेला जमीनीवरचा सलग खोलगट भाग.
         पायऱ्या ते मुख्य फाटक मध्ये असलेल्या ६-७ फरश्या... एक एक फुट अंतरावर ठेवलेल्या, कितीही पाऊस असला तरी त्यावरून यायला त्यातल्यात्यात सुरक्षीत वाट... उन्हाळ्यात मात्र अनवाणी असल्यास चुकूनही पाय ठेवलात तर बोम्ब मारण्या इतपत गरम व्हायच्या! मग बाजूच्या मऊ माती/सारवलेल्या जमिनीवारुन यायचं... मेन गेट च्या बाजुलाच मोठा 'एंट्रस' ... ३ बांबूच्या सहाय्यानी गाड्या आणि म्हशींना जाण्या येण्यास बनवलेले खास फाटक.
फाटक आणि मुख्य दरवाजा ह्या दोघांमध्ये होता गावठी (रायवळ) आंब्याचं झाड, घरी कोणी नसलं की साखरेतली (गावातली) पोरं येता जाता दगड-काठ्या-बेचक्यानी कैऱ्या वेधत आंबे-तोड करायचे. पण खरी शान होती ती आप्पांनी लावलेल्या कलमी हापुस आंब्याची... मस्त वाढलेला... पसरलेला... त्यावर अगदी मी चढ़ून आंबे काढलेले आठवतय! छान सावलीही मिळायची, अगदी त्या ६-७ फराश्यांच्या बाजुलाच लावलेला आंबा! घरात शिरण्याआधी कैऱ्या किती दिसतायत ह्या कडे लक्ष्य... त्याच्याच जरासं पुढे म्हणजे घराच्या डाव्या बाजूला होते शेंगचे झाड.. शेवग्याच्या शेंगा! जेवण करण्या अगोदर आजी सांगायची.. की मी शेंगा तोडायला अंगणात... आणि लगे हाथ कैऱ्या पण!
         घरच्या उजव्या बाजूला चिंचेचे झाड़.. त्याच्या छोट्या छोट्या पानांचा ढीग आणि त्यात लोळणाऱ्या चिंचा वेचताना कमाल आनंद व्हायचा! उजव्या बाजुलाच पूर्वीचा गोठा ही होता.. घरालाच लागून! म्हणजे घरातल्या उजव्या बाजूचे दरवाजा उघडल्यास म्हैसच दीसायची... पेंढा / शीळवड वगैरे थेट दरवाज्यातून म्हशीच्या तोंडात! कितीतरी वेळा मी आणि आमची म्हस एकत्र जेवलो आहोत! फरक इतकाच की मी घरात बसुन जेवायचो आणि 'तो'दरवाजा उघडा ठेऊन द्यायचो... म्हणजे तीला बघत जेवता येईल असं! पण नंतर काही वर्षानी वेगळा गोठा बांधला घरा मागे... पार विहिरीच्याही मागे! खुप वाइट वाटलेले तेव्हा मला! बीचाऱ्या एकट्या राहायच्या आमच्या वीना असं काहीतरी इमोशनल वाटायचं, असो...
         उरलेले वास्तु-दर्शन उद्या घडवतो! रात्र झाली आहे खुप... आता इथे ऐसी लावतो... त्यावेळी ओडोमॉस/कासव छाप लावायचो!

क्रमशः

‪#‎सशुश्रीके‬ | ११ एप्रिल २०१५ ११:४८




जुनी वास्तु... भाग २

       काल मी येउन पोचलो थेट विहिरीच्या मागेच! नविन गोठा, आणि मला कसं वाईट वाटलं आमच्या त्या म्हशी एकट्या वगैरे!
       पण विहीरीच्या अलीकडे पण काय मस्त आठवणी, सरपण ठेवायला केलेली जागा… तिथेच जीना, जिन्याजवळ चूल, चुली समोर तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावनाखाली शंकराची दगडी पींड, मागच्या मुख्य दरवाज्या उजव्या बाजूला न्हाणी घर, त्या न्हाणी घरात सकाळपासून रात्रीपर्यंत येणारा नैसर्गिक प्रकाश… कौलांच्या मध्ये एका कौलाच्या जागी एक दुधाळ काचेतून यायचा तो प्रकाश… दैवीच वाटायचा… सोनेरी किरण दिवसभर… सोनेरी धुलीकण… मजा यायची पहायला! आतमध्ये एक छोटासा आरसा, जेमतेम चेहरा दिसेल ईतकाच, त्यावर ३-४ टिकल्या चीटकवलेल्या, बाहेर पडल्या पडल्या लगेच ६-७ फारश्या १-१ फुटावर… अगदी घराच्या पुढे तशाच मागे ही... त्या मात्र जायच्या घराकडून विहिरीकडे.
       विहीर म्हणजे माझी जाम आवडती जागा! रहाट, घसरडी जमीन, शेवाळं, बेडकं, थंड पाणी, केळींची झाडं यांचं साम्राज्य असलेली जागा, आणि विहिरीच्या समोर एक छोटा हौद, म्हशींना पाणी पाजायला कम कपडे धुवायला कम डुंबायला… संध्याकाळी घामाघुम झालेला देह रपारप थंड पाणी काढत झपाझप अंगावर ओतायचो तेव्हा वीज पडायची अंगावर, डोळ्यावर ५सेकंद पाण्याचा जाड थर जेव्हा भडाभडा जात असतो तेव्हा जी काही मजा येते त्याला तोडच नाही! १का मगोमाग एक बादल्या उपसत दम लागायचा... आणि त्यात ती वीज आणि जाड पाणी... त्यात त्या घसरड्या परिसरात पडायची भीती. सकाळी जेव्हा विहीरिवर दात घासायला जायचो तेव्हा मस्त तंद्री लागायची, खारी, सरडे, भारद्वाज ह्यांना बघत बघत सकाळ काय मस्त जायची.

हल्ली तंद्री कमीच लागते, लागली की वरचा प्रकारच आठवतो!

क्रमशः

‪#‎सशुश्रीके‬ । १३ एप्रिल २०१५

----------------------------------

जुनी वास्तु... भाग ३

गेले २भाग मी घराच्या बाहेरच्या परीसरातच जास्त बागडलोय... आज जरा आत जाऊ म्हणतो!

मागून नेतो, आत्ता तिथेच आहे... अगदी पयऱ्यांवर, जराश्या ओल्या गोणपाटावर, मस्त घासुन पाय...खर-खर... घामानी पायाला चिकटलेली सगळी माती न सारवलेलं शेण... नाकाला अक्खा हात घासुन 'आजीSSSS' ओरडत इतक्या जोरात आत जायचो की... १०वेळा गेलो असेन आत तर त्यापैकी ३-४वेळा तरी धडपडायचोच... आत घुसल्या घुसल्या स्वयंपाक घर, ते महत्वाचं असलं तरी डाव्या बाजूला एक छोटी खोली होती, ती जास्त इंट्रस्टिंग, तिथे सर्व भांडी वगैरे ठेवलेली असायची, सोललेले नारळ, रीठं, लसुण, पांढऱ्या कांद्यांच्या माळा वगैरे गोष्टी तिकडे आजीची वाट पहात बसलेल्या असायच्या, मी कूरियर सर्विससारख्या आजीला नेउन ही द्यायचो त्या कधी कधी... सांगेल त्यापेक्षा जरा जास्तच, मग उरलेलं घश्यात, सगळ्या खोल्यांमध्ये एक दुधाळ काच असायचीच एका कौला ऐवजी... त्यामुळे दिवसभर प्राकाशाची हजेरी आसायची पण नासायची ती मुसळधार पावसाच्या दिवशी... तेव्हा तर वीज ही नासायची... दुपारचा अंधार! त्यात रंग नावाचा प्रकार नव्हताच तसा, रंग होता दरवाज्यांच्या चौकटींना, अंधारात आपटु नये म्हणून असेल बहुतेक!

स्वयंपाक खोलीत ओटा होता... शेगडी मागे एक छोटीशी खिडकी होती... न्हाणी घराला आतून उघडता येईल अशी, आणि एक मोठी जीथून पलीकडच्या वाडीच्या भींतीचे दर्शन होत असे... त्या खिडकीतून मध्येच एखादं जास्वंदीचे फूल डोकावायचे... हवेनी असे काही हलायच(डोलायचेे) की त्याला दुर्लक्ष करणे अशक्यच! दर खोल्यांप्रमाणे त्या खोलीतही दुधाळ काच... छान प्रकाश! दुपारचे ३वाजले की ते सरळ किरण जरा आळशी होऊन हळू हळू भिंतींवर रेंगाळायचे. संध्याकाळच्या गप्पा छानच रंगायच्या तिथे... हातात चहा किंवा कॉफी आणि दडपे पोहे आणि आजीचं गुणगुणणं! तीन्हीसांजाची वेळ झाली की आजोबाही सर्व कामं आटपून यायचे आणि मला पकडायचे, 'ते खाणं नंतर आधी रामरक्षा!' देव्हारा होता मुख्य खोलीत म्हणजे स्वयंपाक घरापुढच्या एका खोलीच्या नंतर आणि पडवीच्या मध्ये… ३-४ शाळीग्राम, बाळकृष्ण, देवी, पिंड वगैरे, भिंती मध्येच एक उभी आयताकृती जागा, जो रंग भिंतीला तोच कपाटांना, तोच घरातल्या वायरींनाही… बल्ब होल्डर्स आणि बटणंही... जे त्या ब्रशच्या वाटेवर येईल ते त्या रंगात समरस झालेली असायची.

आता सर्व कसं प्रोफेशनल असतं! अगदी आत्ताच्या गावातली घरंही!… तो 'रॉ'पणा गेला आणि त्यावर टीपटापीचा एक 'लेयर' आला!

उद्या भेटतो पुढच्या भागात...

क्रमशः

#सशुश्रीके । १६ एप्रिल २०१५
----------------------------------

॥श्री॥

जुनी वास्तु... भाग ४

स्वयंपाक घर आणि मुख्य खोली मध्ये होती झोपायची कम जेवायची खोली... अगदी चौकोनी, रात्री झोपताना दरवाज्याच्या वर एक हारमोनियम बसेल इतकी जागा होती, त्यात दर्भ, सुपाऱ्या.. इतर रैंडम गोष्टी ठेवलेल्या त्यातच एक स्वतंत्र उमेद्वारा सारखा हीरवा दीवा होता! पीवळी वायर वाला... रात्री लावायला... आणि तो इतका भयानक दीसायचा की त्याकडे बघुन जागत राहण्यापेक्षा झोपुन जायला मदत व्हायची! रात्री अपरात्री शु/शी लागली की वीत भर फाटायची!!! मग मुख्य खोलीच्या दरवाज्यात उभं राहून किव्वा त्याच खोलीतल्या खिड़कीतून धार मारायचो अगदी जोर लाऊन... कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आउटपुट!

सकाळ झाली की पक्षांच्या आवाजानी डोळे उघडायचे... मग लोळालोळ, कसा बसा उठायचो, चुलीजवळ गरम करत ठेवलेल्या त्या काळ्या भांड्याला बघत बघत दात घासत (तंद्री लागल्ये असं समजा) सकाळची लोकं येत जात असायची त्यांचे आवाज.. भाजी वाली... मासे वाली... बैल गाड्या, सायकलची ट्रिंग ट्रिंग, रिक्शा, टेम्पो... त्यांच्या टायरी खाली चिरडणारी जाम्बळं, पसरणारे शेण... उडणारा चिखल... असा सगळा खेळ झाला की तंद्रि तुटायची ती धप्प असा आवाज आला की समजायचं, समोरच्या आंब्यानी जीव दीलेला आहे.. २-३सेंटीमीटर ची भेग पडलेला पोपटी आम्बा... आंबट गोड! तो ताजा आंबा नुक्त्याच घासलेल्या तोंडानी फस्त करायला कमाल मजा यायची... तो सर्व प्रकार झाला की मी पडवीत यायचो... झोपाळ्यावर आजोबांनी अर्धवट वाचलेला पेपर चाळत कॉफी-खारी/बिस्किट मारत १०-११वाजायचे! पडवी मध्ये जुन्या पेपरच्या रद्दीसाठी एक कपाट होते... अगदी झोपाळ्याच्या मागे, झोपाळ्याच्या बाजूला पण एक कपाट होते,  सर्व कपाटं भिंतीत असलेली, त्यामुळे अडथळा नासायचा! मामा, भावंड असली की खुप खेळायचो! क्रिकेट एक टप्पा आउट वालं... किव्वा भिंतीवरचा चेंडू झेल, तसोंतास.. स्वताचाच रेकॉर्ड मोडायची धडपड, झोपाळयाच्या डाव्या बाजूला एक दरवाजा पण होता पण त्याला २ लाकडांनी बंद केलेले... कारण पलीकडे पायऱ्या नव्हत्या, लहानमुलांनी तो पार करू नये अशी ती सोय. बाजुलाच ५फुट सोडून लगेच मुख्य दरवाजा... तिथे पायऱ्या... तिथे बसून आजी वाल सोलणे, भाजी, तांदुळ निवडणे ह्या सर्व गोष्टी करायची, त्याच दरवाज्याच्या पुढे सायकल असायची आजोबांची... कायम हवा कमी/नसलेली. त्या पडवीत त्यातल्या त्यात नवीन टाइल्स होत्या... ओबड धोबडच पण जिथे दोन टाइल्स एकत्र येतात तिथे सीमेंट ओले असताना लाइन मारलेल्या, त्यात तळपाय घासायला जाम मजा यायची... उगाच आपली खाज नसताना आणून खाजवत बसायचा टाइम पास! अगदी आजच  प्रश्न पडलेला की ३महीने सुट्टीत काय करायचो आपण... ते असले धंदे... खरा खुऱ्या अर्थाचा 'टाइम-पास'! आता मी साधा दुपारचा झोपतही नाही! कारण, कारण वाटतं की टाइम-पास होतोय! जेवण झालं की परत पडवीत झोपाळ्यावर आडवं होण्यासारखं सुख मिळवणारा मी शेवटचाच! मला वाटत नाही त्यानंतर त्या घरात कोणी माझ्या इतका 'मौल्यवान-टाइम-पास' केला असेल!

चला, ५व्या भागात एका रहस्य खोलीत भेटतो!

क्रमशः

#सशुश्रीके । १८ एप्रिल २०१५
----------------------------------

जुनी वास्तु... भाग ५
 
५ व्या भागात एका रहस्य खोलीत भेटतो! असं लिहिलेलं… पण खरं सांगू का, आजही ती खोली तितकीच रहस्यमय/भीतीदायक वाटते जेव्हढी तेव्हा वाटायची! ही खोली होती घराच्या बरोबर मधल्या खोलीच्या बाजूची! आणि वैशिष्ट्य म्हणजे ४ही बाजूंपैकी ३बाजूंना दरवाजे होते! एकाच दरवाजा असा होता ज्यातून आत शिरता यायचं तो म्हणजे मागच्या बाजूची खोली (भाग २ मध्ये नमूद केली होती ती खोली जिथे लसूण, पांढरा कांदा, ईतर भांडी वगैरे असायची ती) लाकडी दरवाजे त्यांना लाकडी कड्या...
त्या खोलीत शिरायचं म्हणजे पायाची बोटं अशी वळायची.. हाताच्या बोटांची मुठ घट्ट करून आत शिरायचो, एक जूना जळमटीने श्रीमंत असा पिवळा दीवा अशक्त प्रकाश सोडायचा, त्याखोलीत प्रत्येक खोली प्रमाणे असलेली ती दुधाळ काच नव्हती, त्यामुळे जर तो बल्ब नसेल तर त्या खोलीत अखंड काळोकाचं साम्राज्य असायचं... आणि फक्त त्याच खोलीत फरश्या पण नव्हत्या... सारवलेली जमीन, भीतीने पायांच्या बोटांच्या नखानी जमीन कुरतडायचो!
जुनी भांडी, लाकडी भक्कम गडद हीेरवी कपाटं, एकावर एक रचलेले मोठे मोठे हंडे, त्यात काय होते अजुनही नाही माहित... बेहूदा रीकमेच असावेत, बजुलाच खुप सारे पाट... एकमेकांचा आधार घेऊन उभे... महिनोंमहीने! जरा जरी हात/पाय लागला तर पडायची भीती... त्या खोलीत एक विचित्र वास यायचा... खुप दिवस तिथला प्राणवायु माझी वाट पहात असल्यासरखा माझ्या नाकात नकळत डोकवायचा, छत तर इतकं काळं असायचं की अमावस्येत अकाशाकडे बघतोय की काय असा भास व्हायचा, सगळ्यात भीती वाटायची ती वीज जाण्याची...कारण ती कधीही अणि किती वेळही जात असे... एकदा आलेला तो प्रसंग... दरवाज्यातून जो काही बाहेरचा प्रकाश होता त्या दीशेने घाबरत घाबरत पाऊल टाकत बाहेर येई पर्यंत छातीत धडधड, माझ्या ह्याच घाबरटपणाचा फायदा घेऊन आजोबा माझ्या हातात न याव्यात अश्या गोष्टी तिथे ठेऊन द्यायचे. खोलीच्या डाव्याबाजूला खिडक्या होत्या.. बंद... कधी न उघडणाऱ्या, त्यांपुढचे गंज तुरुंगासारखे वाटायचे! एका कपाटावर आजी पैशांचा डबा ठेवयची, खुप साऱ्या नोटा अश्या गोल करुन ठेवलेल्या असायच्या, त्यांच्या खाली नाणी... एकूणच ती खोली एक खजिना सारखी वाटायची, पण बेक्कार फाटायची... मला एकदा शिक्षा म्हणून त्या खोलीत बंद केल्याचेही अंधुकसे आठवत आहे!
असो... बाहेर पडतो...
पुढच्या भागात माळ्यावर नेतो!
भटू भाग ६मध्ये.


‪#‎सशुश्रीके‬ | २३ एप्रिल २०१४ रात्रीचे १२.२७


-------------------------------------------------- 

जुनी वास्तु... भाग ६

मागच्या भागात त्या रहस्यमय भितीदायक खोलीत होतो... आज माळ्यावर नेतो...त्या रहस्यमय भितीदायक खोलीचा मोठा भाऊ!

शिडी... लटपटणारे पाय... बुब्बूळ पार 90° करून... डोळ्यात धूळीचा खुराक घेत... हळू हळू माळ्याची लाकडी फळी सर्व ताकदीनीशी ढकलत माझा हात त्या धुळीत एंट्री मारायचा... मग घुडगा... अक्खा वर जाइ पर्यन्त रोखलेला श्वास सोडत 360° दर्शन घ्यायचो! घुशी किव्वा तत्सम प्राणी दिसत नाहीयेत ना ह्याची खात्री पडल्याशिवाय पुढचे पाउल टाकायचो नाही... माळ्या वर एक सोडून २ दुधाळ काचा होत्या त्यामुळे दुपारचा कड़क प्राकाश खेळायचा माळ्यावर... मिस्टर इंडियाचा लाल लाइट पडायचा तसा मी उभा राहायचो त्या प्रकाशात आणि घड्याळ चालू बंद करायची एक्टिंग करून आजुबाजूला जायचो...फूलऑन 'खुदख़ुशी'!

जुनी नं लागणारी भांडी... नको ते फर्नीचर... मोठमोठाले हंडे... गोणपाट... जास्तीची कौलं... 
हे सगळं एकावर एक रचलेलं.

खाली पाहिल्यावर खालच्या खोल्यांचा टॉप-व्यू पाहायला जाम मजा यायची लाकडी फटींमधून! एखादी फळी लांबी किव्वा रुंदीला कमी असल्यास त्यावर पाय पडल्यावर तारांबळ व्हायची... आजुबाजुला असलेली धूळ आणि अंगाला आलेला घाम... ह्याचं कॉम्बिनेशन भयंकर असायचं! थेट उन्हाळ्यातला गरम तडाखा... नुसती भट्टी असायची माळ्यावर! त्यात कौलांच्या मधल्या बांबुंच्या मध्ये भूंग्यांचा थयथयाट असायचा… कितीही भयानक असला तो प्रकार तरी माळ्यावर जायची संधी सोडायचो नाही!

माळ्यावर चढायला भीती वाटायची नाही... पण उतरायची वेळ आली की भोवळ यायची... कारण उलट्या बाजुनी खाली न बघता पाय टाकून खाली जायचं म्हणजे चूकलो की घात! हळू हळू खाली आलो की पेशंस संपायचा आणि शेवटच्या २-३ पायऱ्यांना डच्चू देत खाली आलो की थेट न्हाणीघरात! 

जरा अंग पूसतो... मग अंगणात जाऊन भाग ७मध्ये घुसीन तो पर्यंत झोपाळ्यावर बसा... आलोच!

#सशुश्रीके । २७ एप्रिल २०१५ । १२.५१


प्रतिक्रिया-

गजानन गोरे - समीर अशी जुनी वास्तु येणाऱ्याटी पिढीच्या नशिबात नाही याचे वाइट वाटते...त्याना फ़क्त लिफ्ट..काचा...हेच...ना दगड ना त्याच्या कोरिव पायर् या..  ना शेतात लांब जाणारी पायवाट..ना गुरै ढोरे..ना त्यांचे दल पाहणे...ना ना जनवरांच्या खुराचे जमीनी वर पडलेले व्रण... सगळे चकाचक पोलिश केलेले..शेणाचे  सारवण नाही पाहायला मिळणार त्यांना....
धाप लाग्न्या एवढे फ़ास्ट आयुष नवते..आपल्या बाल पाणी तरी..आत्ता शाळा क्लास पाऊस आल्ला तर छतरी...कगदाचि बोट तर नाहीच.. भिजत घरी येन नाही..पाण्यात पाय आपटुन चिखल उडवणे नाही..सिमेन्ट रोड मुळे चिखलच होत नाही..कपडे ख़राब होत नाहीत...साठते  फ़क्त गटारी तुम्बलेले पाणी आणि त्यात फसलेल्या म्हगड़या गाड्या

गजानन गोरे - मस्त खुप छान लहान पण देगा देवा..टाइम मशीन कशाला नाही पण या आठवणी उजळा देण्यासाठी बनवायला पाहिजे राव.. आयुशातले सगळ्यात आनंदी shan kuthale ghalavale asatil tar te khedyatle.. lahan panije ajol che. aaji ajoba sobatche.
Apratim. S

Anjali Dixit - समीर चित्रकाराची नजर आहे तुझ्या लेखनाला,मातीच्या रंगा,वासा सकट जाणवत बघ..आणि ते कौला ऐवजी प्रकाशासाठी ठेवलेली काच असो की कांद्या लसूनच्या माळा की डुलनार जास्वंद फूल,,प्रकाश कवडसा,अंधार्या जागा,सामानाची खोली त्यातल्या वस्तू सगळ डोळ्यासमोर चित्रा सारख उभ राहिले..

यशोधन अभ्यंकर - रंगाच निरिक्षण मस्त. पूर्वीच्या बहुतेक सगळ्या घरांमध्ये हीच पद्धत होती. तू ती बरोब्बर टिपलीस. शेवटच वाक्य तर झकासच. 'रॉ'पणा या एका शब्दात ते घर परत डोळ्यासमोर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!