फडणीस सर...


फडणीस सर...

मॉडर्न हास्कूल जंगली महाराज रोड...
इयत्ता ५वी... विषय चित्रकला...
उंच, मानेतल्या शीरा दिसायच्या बोलताना,
कपाळावर मस्त २इंची भगवा गंध,
फुल बाह्यांचा पण दंडा पर्यंत दुमडलेला शर्ट,
जराशी अखुड प्यांट, भयंकर तापट,
पण हसले की जाम गोड दिसायचे...
आणि हो... लुना वर यायचे,
सर्व शिक्षकांमधे एकदम उंच...
फिट... एकदम हटके!


आमच्या सांगवीच्या खाडे महाराज बाबांचं पोर्ट्रेट केलेलं,
अजुन ही मठात आहे!
काय सुन्दर केलय... ओइल पेंटिंग... अगदी हुबेहूब!
मुंबईतुन पुण्यात आलेलो, ५वीत असेन,
चित्रकला उत्तम तयाामुळे मी लाडका,
त्यांचा वर्ग भरला की माझ्याकडे आवर्जुन येणार,
काय दीवे लावतोय...
आणि प्रकाश पडलेला दीसला...
की त्यांच्या मिशीतून दिसणारे ते स्मित हास्य
यशेची पावती देऊन जायचे!
जिंकलो आज... असा काहीसा चेहरा व्हायचा माझा!


एक आगाऊ पणा केला होता तेव्हा पालकांना घेउन ये उद्या असं आमच्या हेड मास्तरांनी सांगितलं, तेव्हा वडलांना बाजुला घेउन हलक्या आवाजात काहीतरी सांगितलं आणि बाबा हसले, तो क्षण अजुन ही आहे तसा आठवतो, माझा गुन्हा होता मी कॉपी बाळगली हां.. पण कॉपी लिहिताना पाठ झाल्यानी वापरली नाही, पण पायाखाली लोळत असलेलं ते कगादाचं पापी फुलपाखरू शाळॆच्या प्रचंड मोठ्या खिडक्यातुन आलेल्या निष्पाप वाऱ्यानी नेमकं 'मी मी' करत बाईंच्या डोळ्या समोर लोटांगण घालेल हे माझं दुर्भाग्यच! झालेली घटना मी फड़णीस सरांना सांगितली ती त्यांना पटलीही असेल पण जे काय झालं त्याला शिक्षा हवीच! समज वगैरे देऊन सुटका झाली एकदाची!
२वर्षच होतो त्या शाळेत...
त्यामुळे जास्त संपर्कात नाही राहीले,
पण जेव्हा जेव्हा त्यांची आठवण येते
तेव्हा तेव्हा मास्तर असावा तर असा, नाही तर नसावा!
असा विचार आल्या शिवाय रहात नाही.


चुक असली आणि विद्यार्थी कितीही लाडका असला
तरी शिक्षा हवीच,
पण त्या शिक्षे मागे असलेली प्रेमाची सावली तुम्हाला दिसली की बस्स! तुम्ही जिंकलेलं असतं प्रकरण!
असच मी जिंकलेलं... एकदा नाही अनेकदा.


फेयर अनफयर ह्याचा गंध नसतो तेव्हा माझ्या सारख्या प्रत्येकाला एकदा का होइना एक फडणीस सर तो मिलना ही चाहिये!


- सशुश्रीके | १ ओक्टोबर २०१४ | रात्रीचे १२.५४


Comments

  1. फडणीस सर.. नुसतं नाव घेतलं तरी उत्साह वाढतो

    ReplyDelete
    Replies

    1. अगदी मनातलं बोललात

      Delete
  2. काय सुंदर व्यक्ती रेखा उभी केलीस.
    माझं ही थोर भाग्य की मला ही सर 5वी ते 10वी लाभले. त्यांच्या चित्रकले बद्द्ल मी न बोललेलंच बरं.

    त्यांनी एकदा इजिप्त मधील pyramids कसे बांधले हे एका off पिरियड ला सांगितले होते. अक्षरशः मी इजिप्त ला जाऊन ते पिरॅमिड बांधताना बघितल्याचा भास झाला. अतिशय ग्रेट व्यक्तिमत्त्व.

    ReplyDelete
  3. काय बोलु सर आमचे देवत्व

    ReplyDelete
  4. Truly Inspirational for all the students, Sir you are and will be forever in everyone's heart...
    Miss you so much...

    ReplyDelete
  5. आयुष्यात फार थोडे शाळेचे क्षण लक्षात राहतात त्यातीलच एक पण मनात भरणारा शिक्षक या शब्दाचा खरा अर्थ

    ReplyDelete
  6. खरय, फडणीस सर आपल्याला लाभले हे आपले भाग्यच होते. चित्रकलेची थिअरी सांगताना त्यांनी एक किस्सा असा रंगवला होता की हसून हसून, डोळ्यात पाणी आले होते. क्षीरसागर सर ही तसेच होते.
    एकदा चौकात, मधल्या सुट्टीत, दगडाचा फुटबाल खेळताना त्यांनी पकडले होते, आणि उन्हात खेळून आजारी पडशील असे सांगताना डोळे वटारून बजावले होते.
    सरांना विनम्र श्रद्धांजली...
    -- विनायक
    मॉडर्न हायस्कूल, १९८४ - १९९५ (१० वी)

    ReplyDelete
  7. फडणीस सरां सारखे शिक्षक लाभले हे आमचे भाग्यच म्हणायला हवे.माझे हस्ताक्षर चांगले वाटले म्हणून सर्व इयत्ते चे केटलोग लिहीण्याची जबाबदारी त्यांनी माझेवर सोपविली होती ते माझे भाग्यच समजतो.सर आपल्याला त्रिवार मानाचा मुजरा.

    ReplyDelete
  8. फडणीस सर सारखे शिक्षक लाभले हे मी माझे भाग्यच समजतो. सरांना नक्कीच स्वामींचा साक्षात्कार झाला असणार इतके स्वामींचे हुबेहूब चित्र काढणारे ते एकमेव.
    अक्कलकोट स्वामी मंदिरात गाभाऱ्यात स्वामीचा एका दगडी ओट्यावर बसलेला अप्रतिम पेन्टिंग आहे नक्की आवर्जून बघा आणि फोटो फ्रेम चे दुकानात फडणीस सरांचा नाव असलेले पेन्टिंग बघितले कि खूप अभिमान वाटतो कि मला हे सर चित्रकला शिकवायला होते

    ReplyDelete
  9. Kyaaa BAAT. Dolyasamor ubhe rahile sir.

    ReplyDelete
  10. अरूण फडणीस सर आम्हाला १९७५-८० पर्यंत चित्रकला शिकवत असत.. सर जीव ओतून चित्रकलेबद्दल सांगायचे. आज त्याचे महत्व समजत आहे.

    ReplyDelete
  11. मला नक्की आठवत नाही पण साधारण १९६७/६८ च्या सुमाराला फडणीस सर join झाले असावेत. जयंत खरे सरांसारखे stalwart शाळा सोडून गेल्यावर स्वतः चे स्थान निर्माण करणे ही सोपी गोष्ट नव्हती, पण फडणीस सरांनी त्यांच्या अप्रतिम चित्रकलेने आणि अतिशय मन मिळावू स्वभावाने सर्वांनाच जिंकले. अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व

    ReplyDelete


  12. झपाटलेलं वादळ ...

    बऱ्यापैकी उंची , बरेचसे पांढरे झालेले केस, पांढऱ्या होत आलेल्या मिशा , सडपातळ शरीरयष्टी , दोन भुवयांच्या मधे लावलेला शेंदूर आणि त्याच शेंदराचे गळ्याजवळ लावलेले बोट. फिकट पिवळसर रंगाचा शर्ट, त्या शर्ट च्या वरच्या खिशात काही छोट्या डायऱ्या , एक दोन पेनं आणि एखादी पेन्सिलही ! फिकट रंगाची पॅन्ट .जुनाट सायकलवर पुढे बसलेला त्यांचा छोटा मुलगा आणि हॅन्डल ला लावलेली कापडी पिशवी !

    हे सगळं वर्णन वाचलं कि असं वाटतं असं काय असणार या माणसात ? पण नाही. हे वर्णन खूप फसवं आहे. वरवरचं आहे. कारण वरकरणी सामान्य वाटत असलं तरी हे एक असामान्य वादळ होतं. एखाद्या बाणासारखा हा माणूस वर्गात शिरायचा आणि अवघा वर्ग व्यापून टाकायचा. त्याचे लांब हात आणि लांबसडक बोटं हि फळा, कागद, कॅनवास यावर नजाकतीनं फिरायची. त्याच्या रंगातून सूर उमटायचे. चित्रकला हा जगातला एकमेव विषय आहे या तळमळीनं तो शिकवायचा. HB २बी चीजल पॉइंट अशा पेन्सिलींची ओळख त्यानेच करून दिली. चित्रं काढत असताना मधेच ते उलटं करून बघा म्हणजे तुमचं तुम्हालाच कळेल कि प्रपोर्शन बरोबर आहे का, स्पेस डिव्हिजन बरोबर आहे का हि दृष्टी त्याने दिली. रंग संगती समजून घ्यायची असेल तर साड्यांवरची डिजाइन्स पाहत जा असा सोपा मंत्र तो देत असे. मुलांना चित्र काढायला देऊन स्वतः स्वस्थ न बसता वर्गाच्या खिडकीतून जंगली महाराज रोडवरच्या गोष्टींचे स्केचिंग करीत बसे.

    व्रतस्थ वृत्तीने राहून ज्याचे चित्र काढायचे त्या क्रांतिकारकांचे , संतांचे संपूर्ण चरित्र वाचून मगच कॅनवासवर ते चितारणारा तो अवलिया होता. शिवथरघळीत असणारे समर्थांचे पूर्ण उंचीचे चित्र किंवा लाखो लोक आपल्या देवघरात ज्यांची प्रतिमा मोठ्या भक्तीने पूजतात ते अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे चित्र हे त्यांच्याच हातून निर्माण झालेले आहे. सोप्या सोप्या टिप्स देऊन मग "कळ्ळल " असं विचारणारा त्यांचा आवाज अजूनही कानापेक्षा मनात रुंजी घालतोय.
    !
    शाळा संपली. पुढे जवळ जवळ १३-१४ वर्षांनी शाळेपाशीच ते भेटले. तसाच वेष होता . पण अजून थोडे थकलेले होते. मी रस्त्यातच त्यांना वाकून नमस्कार केला. लुना किंवा टीव्हीएस अशाच कुठल्यातरी जुन्या गाडीवर ते होते. "शाळेत आता पूर्वीची मजा नाही . खूप राजकारण झालंय रे !" असं काहीसं बोलले. मी म्हटलं , "सर पुन्हा एकदा तुमच्याकडे ड्रॉईंग शिकायला यायचं आहे." तसे ते हसले. म्हणाले. " अरे ये कि , पण मी आता त्रिशुंड गणपतीजवळ नाही राहत. सिंहगड रोड ला राहतो . जरूर ये. " ती त्यांची शेवटची भेट...

    असं हे अरुण फडणीस नावाचं एक झपाटलेलं वादळ होतं . कला काय असते आणि कलाकार काय असतो हे कळण्याच्या कितीतरी आधीच्या वयात आपल्या आयुष्यात येऊन गेलं. आता वाटतं , आपल्याला थोडी अधिक समजूत आलेली असताना ते भेटले असते तर किती बरे झाले असते ?
    - पण वादळाला असे थोडेच काही नियम लागू होतात ? ते केंव्हाही येतं ना !

    -सुनील गोडसे


    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आजी

कोथरूडचा व्हाइट वॉकर... निपुण धर्माधिकारी.