मानाचा मुजरा!
घाण पाऊस होता, दुकानाच्या पायरी वर कसाबसा उभा होतो, हवा तर इतकी होती की पाऊस वरून पडतोय की खालून कळेना, इतका भिजलेलो की विचारू नका, समोर टपरी वर कंदीलातला दिवा जेमतेम दिसत होता, डोळ्यांच्या झापडांचा वापर जणू गाडीच्या काचेवरच्या व्हायपर सारखा झालेला.. २-३दा उघड झाप केल्याशिवाय काहीच धड दिसत नव्हतं, त्यात गडगडाट... हे सगळं होत असताना पोटातून ही तोच प्रकार! प्रचंड गडगडाट आणि छोट्या स्वयंपाक घरात मांजरीची भांडणं झाल्यावर त्यांच्या आवाजाबरोबर भांडी जशी आपली जागा सोडतात आणि जो काही आवाज येतो तसं फ्युजन आणि हे सर्व डॉल्बी लेव्हलला, एरवी न ऐकता येणारे लांबचे कुठले तरी आवाज पण ह्या धो धो पावासात ऐकू येत होते, कारण आभाळाबरोबर कान ही फाटलेला, ते आपलं मोठा 'आ...आ' करून कानाचे पडदे मोकळे करायचा प्रयत्न अखंड चालू होता. 😣
तितक्यात एक यामाहा RX100 थांबली, म्हणजे तीच असावी, कारण त्या बाईकचा आवाज अफाट युनिक आहे, पाऊस अजून ही त्याच जोमात कोसळत होता... टायरला आणि टेकलेल्या पायांना टशन देत पाणी मात्र रस्त्यावरून वाहात होतच, तरी तो इसम माझ्याकडे पाहात मला काहीतरी सांगत होता, खुणावत होता, २०-२५फुटांवर असेल पण असं वाटत होतं मला की जणू अख्या नदीच पात्रं पार करून त्याजवळ जायचंय! असो... काही इमर्जन्सी वगैरे असेल असा मनात विचार करत मी जरा पाऊल न पाऊल खास पावसाळ्यासाठी रचलेल्या विटांवर टाकत रस्त्यापर्यंत गेलो, गडगडाट त्यात त्या यामाहाचा दाणेदार आवाज त्यामुळे तो काय बोलतोय हे शष्प कळत नव्हतं, त्याचा लक्षात आलं की मला काही कळत नाहीये, ऐकू येत नाहीये, त्याने बाईक स्टँडला लावली, हेल्मेटची काच जी अर्धवट उघडी ठेवलेली ती पूर्ण वर केली, मला अर्धा चेहरा दिसला.. ओळखीचा वाटला, "सम्या...इथं काय करतोयस रे, चल घरी, मस्त मटकी पण आहे आज, आईनं आठवन पन काढली बघ तुझी जेवताना, अन तू दिसलास बघ..." तो बडबडत होता, माझी विचारपूस करत होता आणि मी... 😶
शाळेत असताना पेपर विकणारा माझा एक मित्र अजूनही पेपर विकतोय, सायकल ची जागा आता बाईकने घेतलीय, आणि कैरीयर ची जागा आता सीटने, तो बुटक्या जाड्या अजून ही आहे तसाच... तो माझ्याशी बोलत होता, विचारपूस करत होता, काय कुठे असतोस कधी पर्यंत आहेस वगैरे कानात शब्द पडत होते पण भेटल्या भेटल्या त्याने 'ऑफर' केलेल्या अमूल्य प्रस्तावाला नकार देत, पुन्हा कधी तरी वगैरे उगाच सबबी देत त्याला मिठी मारली, क्षणात गेलो ते ८/९वीच्या मधल्या सुट्टीच्या शाळेतल्या बेंच वर, डब्यात होती रस्सेदार मटकी, त्याची 'ऑफर' कितीही टेम्पटिंग असली तरी आता आपण शाळेतले मित्र नाही हा फालतू लहान(मोठे)पणा नडलाच, शेवटी 'घरी येऊन जा' वगैरे बोलून तो निघाला... दुर्दैव असं की त्याला नावाने हाक मारता आली नाही! अजून ही नाव आठवत नाहीये त्याचं 😐 त्याच्या डब्यातली मटकी मात्र आठवते मला, आणि त्याला मी आठवतो मटकी मुळे, हे ही तितकच खरं! 😂
असो, मुंबई/पुण्यात मटकीमुळे मला असेच लक्षात ठेवणारेे काही जून शाळकरी मित्र असतील, त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा! 😇
#सशुश्रीके | ८ ऑक्टोबर २०१७
Comments
Post a Comment