जेल...

जेल... (टीझर)

जेल मध्ये आहे तो!

गेले कित्येक वर्ष सकाळी कोणी ना कोणीतरी काठी वाजवतो कोठडीच्या सळयांवर, हा अलार्म असावा बहुतेक! पण कशाला हवाय अलार्म, तो झोपलेलाच नाहीये कित्येक वर्ष, डोळे उघडतो... बंद असले की झोपायचं समाधान. जेमतेम १X१ फुटाच्या खिडकीतून येणारा प्राकाशा कडे तो तासंतास पाहात बसे, त्यावरची कडेला आलेली जळमटं काढतो तो अधून मधून, रात्री घु घु आवाज करत वारा खेळायचा त्या छोट्या पण जाड भिंतीच्या किडकीत, तोच काय त्याला विरंगुळा, त्याला निरनिराळी गाणी ऐकू यायची... हसायचा मग, स्टीलचा पेला त्यावर नखाने ठेका देत सकाळ व्हायची, मग सकाळ झाली की तो शांत, पण बाहेरचे आवाज त्याला मुळीच आवडायचे नाहीत, दिवसभर कानात बोट घालून असायचा तो, शांततेशी जणू करार केलेला त्याने, एकाही कैद्याशी एक शब्द बोलला नव्हता तो, त्याबरोबरचे कित्येक कैदी आले न गेले, हा मात्र तिथेच राहिला. कोणी १खून कोणी २ कोणी १०... पण ह्या बिचार्ऱ्याने कोणाचाच खून केलेला नव्हता!
.
.
.
.
.
पण एके दिवशी तो ज्याची वाट पाहात होता तो आला...

क्रमश:

#सशुश्रीके । १० सप्टेंबर २०१६

–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––

जेल - (पूर्वार्ध) भाग - १

हा लहानपणापासूनच असा... म्हणजे, अभ्यास न करणारा किव्वा न ऐकणारा वगैरे नाही, भलतीच आवड! सगळे त्याला 'डिटेक्टिव्ह कुमार' म्हणायचे! हो... अगदी लहान वयातच, जस जसं वय वाढत गेलं तस तसा ह्याच्या डिटेक्टिव्हपणाची उंची वाढत गेली, पण गावात तितकाच बदनाम... त्याचाशी कोणी संबंध ठेवेनात! कोण कोणाला कधी आतली खबर देईल पत्ता नाही. आणि हे सर्व कुमारला माहीत होते, एके दिवशी घरच्यांशी ह्याच 'डिटेक्टिव्हगिरी' वरून वाद झाला, कुमार ने घर सोडलं. वडील प्रसिद्ध ज्योतिष होते, त्यामुळे गावात त्यांचं नाव, गावात काय अगदी शहरात पण, त्यामुळे कुमार जाऊन जाऊन जाणार कुठे पळून, तो जातो थेट दिल्लीला... कसे बसे मिळेल ते काम करत ३वर्षे उलटतात, एका बातमीपत्रासाठी तो काम करत असतो, ते काम म्हणजे पोटापाण्याची सोय, पण कुमार उरलेल्या वेळात डिटेक्टिव्हचं काम करत असतो.

एके दिवशी बतमीपत्रासाठी एका इंस्पेक्टरची मुलाखत घेण्याची वेळ येते कुमारवर, कुमारला ह्या संधीची खूप काळ वाट पहात असतोच, इंस्पेक्टरशी मुलाखत झाल्यानंतर कुमारच्या डोळ्यात दिसणारा डिटेक्टिव्ह इंस्पेक्टर घेरतो. म्हणतो "मित्रा, तुला एक विचारू!? तू ह्या बतमीपत्रासाठी काम का करतोयस? माझ्यासाठी काम कर... पैसा पण मजबूत मिळेल आणि वर्क सॅटिसफैक्शन गॅरेंटीड!"

कुमार बेझिझक इंस्पेक्टरची ऑफर स्वीकारतो, बोगस बीजीनेस, काळा बाजार, पोलिटीशीयन्स लफडी वगैरे 'हाय प्रोफाइल क्राईम इनव्हेस्टीगेशन' च्या लायनीत कुमार लवकरच शिरतो!

सत्याची बाजू, ही एकच बाजू माहीत आहे त्याला, आणि ह्याच गुणधर्माला हेरून इंस्पेक्टर त्याची पाहिजे तशी मदत करायला तयार असतो. काहीच वर्षात इन्स्पेक्टर कमिशनर होतो, कुमार आपले काम त्याच सफाईने करत असतो, चोर कितीही चार पाऊले पुढे असला तरी, त्या पावलांची दिशाभूल कारायला कुमार सज्ज असायचा.

आता पूर्वीसारखी भेट व्हायची नाही, इंस्पेक्टर आणि कमिश्नर ह्यातला फरक होता हा. भेटायची जागा आता चहा टपऱ्यानंतर थेट 5स्टार हॉटेलांमध्ये व्हायला लागली. ओळखता येऊ नये म्हणून निरनिराळ्या वेशात 'डिटेक्टिव्हगिरी' करणारा कुमार आता कमिश्नरलाही तसाच भेटायला लागला. अश्या सर्व तणावपूर्ण परिस्थितीतही कुमार त्याचा 'कूलनेस' टिकवून होता.

क्रमश:

#सशुश्रीके । १४ सप्टेंबर २०१६

–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––

जेल (पूर्वार्ध) भाग २

एके दिवशी मात्र काही भलतंच होतं, ज्या ठिकाणी कुमार डिटेक्टिव्हगिरी करत असतो त्याच ठिकाणी तो रक्ताच्या थारोळ्यात असतो, हातात बंदूक, पायात प्रचंड कळा, त्याला गोळी लागलेली असते पायावर, कपाळावर घाव, भरपूर रक्तस्त्राव आणि... आणि समोरच्या खुर्चीत एक प्रेत, तो नीट पाहतो, वेदना इतक्या असतात की समोर असलेली व्यक्ती ही दुसरी कोणी नसून तो स्वतः आहे हे पाहताच त्याची शुद्ध हारपते.

पुढे जेव्हा शुद्ध येते तेव्हा समोर काही ओळखीचे पोलिस आणि काही डॉक्टर्स... अर्थात तो हॉस्पिटल मध्ये असतो. झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वजण थांबलेले असतात.

आता त्याला दोन मोठे प्रश्न पडलेले असतात की त्याला सर्वजण कमिश्नर असल्या सारखं का वागतायत? आणि त्याने पाहिलेलं प्रेत हे त्याचंच का? का तो भास होता??? कमिश्नरचे कुटुंब येतं, ते ही कुमारशी कमिश्नर असल्यासारखे वागत असतात... कुमार ह्या सर्व प्राकारात पूर्ण गोंधळून गेलेला असतो. त्याच्या तोंडावरचा ऑक्सिजन मास्क आणि हाता पायावरची पट्टी काढण्याचीच वाट पाहात असतो. अखेर दुसऱ्या दिवशी एक नर्स येते आणि त्याच्या तोंडावरील ऑक्सिजन मास्क काढते... कुमारच्या तोंडातून शब्द येतात 'कुमार.. कुमारला मला मारायचं नव्हतं!'

क्रमश:

#सशुश्रीके । १७ सप्टेंबर २०१६

–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––

जेल (पूर्वार्ध) भाग ३

कुमारच्या तोंडातून शब्द येतात 'कुमार.. कुमारला मला मारायचं नव्हतं!... तो आहे ना, आहे ना तो जिवंत!?' कुमार गोंधळतो, कमिश्नरची बडबड चालूच असते, कुमारला गोंधळायला होतं, पण त्याला त्याचे अखेरचे चे क्षण आठवतात!!!

त्याच्या कारकीर्दीतल्या शेवटच्या केस साठी तो ज्या खोलीत मायक्रोफोन लावत होता त्या खोलीत कोणी नाही हा त्याचा अंदाज खोटा ठरला होता, त्यात कमिश्नर अचानक आल्याने गोंधळ अजून वाढला असं काहीसं अस्पष्ट चित्र त्याला आठवलं, हे सर्व आठवून ते त्याचे शेवटचे क्षण होते ह्याची त्याला खात्री पटली आणि आपण कमिश्नर आहोत की कुमार ह्याचा उलगडा ही त्याला झाला! कुमार कमिश्नर द्वारे पाहू, ऐकू शकत होता पण कुमार कडे कमिश्नरला पाहिजे तसे वागवण्याची 'पॉवर' नव्हती!

हे सर्व घडत असताना, कुमार म्हणजेच कमिश्नरच्या डॉळ्यांपुढे अंधार... डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार नर्सने इन्जेक्शन देऊन सैरभैर झालेल्या कमिश्नरला थंड केले होते. पण कुमारला नाही... कुमारची शेवटची केस तर आत्ता कुठे सुरु झालेली, त्याला आरोपी शोधायचा होता... तो पण त्याच्या स्वतःच्या खुनाचा!

क्रमश:

#सशुश्रीके । २४ सप्टेंबर २०१६

–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!