बाबांच्या आठवणी #२
परीक्षेचे दिवस होते, अगदी अचूक सांगायचं तर Australia tour of India, 2nd ODI: India v Australia at Pune, Mar 28, 2001 - ह्या दिवसाच्या ३-४दिवस आधी मी बाबांना सांगितलं - 'मला अमुक अमुक पैसे हवेत' कारण काय? तर मॅच बघायची आहे, बाबांनी शांतपणे आईला विचारलं 'परीक्षा कधी आहे' आईने माझ्याकडे पाहात मॅच च्या २दिवसानंतर. हे ऐकताच बाबांनी नन्ना चा पाढा सुरु केला. पण माझ्यावर काही फरक पडेना, आधीच आभ्यासात भोज्जा, त्यात परीक्षेच्या आधी ही अवदसा. आपल्याला शिव्या / मार खावा लागणार हा भविष्यकाळ मला अगदी Ultra HD स्वरूपात दिसत होता! शेवटी बाबांचा राग अनावर झालाच, तेव्हा एक विचित्र गोष्ट घडली + मला अपेक्षा नसलेली... ते आत गेले त्याच्या बेडरूम मध्ये जरावेळानी बाहेर आले त्यांने एक 'लेटर' तयार केलेले... त्यावरचा मजकूर काही असा होता, मी समीर केतकर... (मी कितवीत आहे, परीक्षा दिनांक काय आहे मॅच कधी आहे असा काहीसा मजकूर) आणि पुढे 'मी ह्या परीक्षेत नापास झाल्यास पूर्णतः स्वतः जवाबदार असणार आहे' माझं नाव आणि खाली सही साठी सोडलेली जागा! हे तोंड न उघडता वाचले मी.....