आठवणींचा पत्ता
मॉडर्न हायस्कूल, जंगली महाराज रोड. परीक्षेचे दिवस, मी आपला जसा जमेल तसा पेपर लिहून मोकळा झालेलो, तितक्यात आमच्या वर्गातला एका मुलाला घाईची शी लागली म्हणून तो बाईंना विचारून धावत पळत वर्गाबाहेर गेला, आईने सांगितलेले पेपर झाला असला तरी वेळ झाली कीच वर्गाबाहेर पडायचं, लवकर बाहेर पडून घरी लवकर यायचं नाही! तो सल्ला जरा मोडून वेळेच्या बरोबर १०-१५ मिनिटे आधीच बाहेर पडलो, खूप वेळानी श्वास घेतला की कसं वाटतं तसं काहीसं वाटायचं परीक्षा संपल्यानंतर बाहेर पडताना.
बाहेर आलो शाळेच्या गेट पाशी, खूप गर्दी होती नेहमीपेक्षा, शाळेचे शिपाई वगैरे तिथे मुलांना बाजूला करत होते, तो मघाशी बाहेर पडलेला मुलगा गेट पाशी असलेल्या मुतारीच्या दरवाज्यासमोरच उभा होता, त्याला बहुतेक तिथेच झालेली, खूप लोकांना / मुलांना माहीत नसावे की तो मतिमंद होता, काही मूलं हसत होती, काही नागड्या-उघड्या असं ओरडून चिडवत होती, मला माहीत होतं की त्याची ही अवस्था का झाली, खड्डा पडलेला मनाला, डोळे डबडबलेले बघून! खूप वाईट वाटत होते त्याची ही अवस्था पाहून. एका प्रसिद्ध बाल विशेषज्ञ डॉक्टरांचा मुलगा होता तो. असो... तो दिवस आठवला की अजून ही त्रास होतो.
पण त्या दिवसानंतर आवर्जून त्याकडे खेळायला जाऊ लागलो मी, त्याचे आई बाबा दूरदर्शन वरचे चित्रपट टायमर वर रेकॉर्ड करून ठेवायचे, मग आम्ही ते नंतर रविवारी दुपारी पाहायचो, त्याच्या घराच्या परिसरात खेळायचो, नंतर आम्ही पुणे सोडले आणि नव्या सांगवीला राहायला गेलो. येता जाता कधी त्याच्या घराकडे लक्ष जायचे, पण कधी भेटायला जायची वेळ नाही आली. आता तर कदाचित तो ओळखणार ही नाही, मी ही नाही ओळखणार, त्याचा चेहरा आठवत नाही पण आठवणी विसरणं अशक्य आहेत त्याच्या!
आठवणींचा पत्ता तोच, न हरवणारा.
#सशुश्रीके । १५ मे २०१७
Comments
Post a Comment