बाबांच्या आठवणी #०१

बोरिवलीतली संध्याकाळ असेल, माझं वय ७-८च्या असापास असेल, रस्त्यावर इथे तिथे पहात होतो, हातात बाबांचा हात होता, रस्ता काही संपतच नव्हता, माझं काहीसं 🙄 असं झालेलं, माझा वेग आणि बाबांचा वेग काही मेळ खात नव्हता, बाबांनी आधी माझ्याकडे न बघताच हाताची पकड घट्ट करून खेचलं मग माझ्या चेहऱ्याकडे कडू प्रेमळ नजरेने पाहिलं... माझ्या कपाळावर आठ्या, विरोध दर्शवणार तरी कसा!?
म्हणालो, तहान लागली आहे, बाबा म्हणाले, 'घर आलच आहे घरी जाऊन पाणी पी.' हे ऐकून मी काय जे हात पाय गाळलेत! जणू काही सलाईन वगैरे लावायला लागणार आता मला असा चेहरा केला... (हे लिहिताना अन्वया चा चेहरा आठवला झटकन, ती पण असच वागते! जरा काही मनाविरुद्ध घडलं की अगदी असेच हावभाव) मी बाजूलाच असलेल्या दुकानाच्या फ्रीजकडे बोट केलं.

बाबांनी ओळखलं, म्हणाले 'अच्छा अच्छा... तुला थम्बसअप ची तहान लागली आहे तर!?'
बस, इतकच आठवतय, अगदी त्या आर्ट फिल्मच्या कथानकात शेवट अर्धवट सोडतात तसं... तहान माझी तिथेच भागली की घरी जाऊन, बाबांनी त्यांची इच्छा पूर्ण केली की माझी, मी खुश झालो की निराश!
काही गोष्टी अशाच शेवटपर्यंत आठवत नाहीत, त्यातली ही एक, पण बारकावे मस्त लक्षात राहतात, बाबा त्या आठवणींत इतके स्पष्ट असतात की आत्ता बाजूला बसून सांगतायत सगळं असा भास होतो!
अश्या अर्धवट का होईना, ह्या श्रीमंत आठवणींबद्दल देवाचे सदैव धन्यवाद.

#सशुश्रीके | २३ मे २०१७



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!