The Americans, TV Series Review
The Americans ह्या अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजचा पहिला एपिसोड 2013 मध्ये FX चॅनेलवर आला. १०पैकी ८.३ रेटिंग मिळवणाऱ्या या सिरीजचे प्रत्येकी १३ भागांचे पाच सीझन झालेले आहेत. आता शेवटचा, सहावा सीझन मागच्याच महिन्यात सुरु झालेला आहे, गेल्या ५वर्षात ह्या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि आता ती शीगेला जाऊन पोचली आहे.
विश्वासावरचा अविश्वास आणि अविश्वासावरती विश्वास किव्वा जो आहे तो कशावरून तोच, जो तुम्हाला वाटत आहे? असं काही तरी अजब कोडं घेऊन ह्या मालिकेची सुरुवात होते. एका रशियन गुप्तहेराला पकडून त्याला 'किडनॅप' करायचे काम आटोपल्यावर कळते की त्याला पकडणारे स्वतः २ रशियन्स गुप्तहेर आहेत, नुसते रशियन्स नाहीत ते एक जोडपं आहे, १९६० मध्येच रशियन्स ने अश्या जोडप्यांना 'तयार' करायला सुरुवात केलेली, त्यापैकीच एक गुप्तहेर जोडपं म्हणजे 'फिलीप' आणि 'एलिझाबेथ', कथानकाचे २ प्रमुख नायक, त्यांची दोन मूलं आणि त्यांच्या शेजारीच राहणारा FBI एजेंट त्याचे कुटुंब ह्यांच्या आजूबाजूला ही सर्व मालिका रंगवण्यात आलेली आहे. फिलिपची ट्रॅव्हल अजेंसी आणि एलिझाबेथ 'हाऊस वाईफ'. अगदी सामान्य अमेरिकन मध्यम वर्गीय जीवन जगणारं कुटुंब, अगदी साधं, कामाला जाणारं... घरी मूलं असलेलं. आणि मग कथानकाला खरी सुरुवात होते जेव्हा एजन्ट बीमन नावाचा FBI कर्मचारी ह्या अमेरिकन रशियन जोडप्याच्या शेजारच्या घरी राहायला येतो. आता मात्र आली ना पंचाईत, म्हणजे हे असं झालं चोराच्या घराच्या बाजूलाच पोलिसांचं घर! तरी फिलिप कुटुंबीय 'अमेरिकन्स' आहेत, रशियाचा आणि त्यांचा काडीमात्र संबंध नाही ह्याची खबरदारी जोडप्याने अगदी १०१% बजावाण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचं अमेरिकन नागरिकत्व इतकं सखोल आहे की त्यांना रशियन बोलून ही खूप कालावधी झाला आहे, त्यांच्या मुलांना रशियन येत नाही, फिलिप जो एक वडील आहे आणि ट्रॅव्हल एजेंट आणि एक नवरा ही... ह्या सर्व जवाबदाऱ्या सांभाळून त्याची जी ओढाताण दाखवली आहे, केवळ अप्रतिम! अगदी तसाच एलिझाबेथ बद्दल ही, त्यात त्यांची वायात आलेली मुलगी जीला KGB काय प्रकरण आहे आणि आपल्या आई-वडलांचा KGB शी काय संबंध आहे हे कळल्यावर झालेली परिस्थिती, फिलिप एका वयात आलेल्या मुलीचा बाप असताना त्याला करायला लागलेल्या एका एफ्फेअर ची कहाणी आहे, पण तो त्या एफ्फेअर चा अंत कसा करतो हे ही बघण्यासारखं! शेवटी गुप्तहेर ही एक माणूस आहे त्याला ही माणुसकी आहे, ह्या दोन देशांच्या कात्रीत सापडलेले हे काही KGB अजेंट्स आणि त्यांची हे कहाणी! हे असं सगळं नाजूक-कठोर प्रकरण अत्यंत भावनात्मक पद्धतीने मांडलं आहे *The Americans* मध्ये. हे सगळं घडतंय वॉशिंग्टन DC शहरात १९८०च्या आसपासच्या काळात त्यामुळे तेव्हाचे कपडे, घरं, गाड्या, घरं, संगीत ह्या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करून चित्रित केल्या ह्या मालिकेला प्रत्येक विभागात निर्विवाद यश आलेलं आहे हे आवर्जून सांगावसं वाटतं!
२रे विश्वयुद्ध संपून ४दशके ओलांडली आहेत, अर्थात अमेरिका जागतिक महासत्ता आहे, आणि रशिया मात्र मागे पडतोय, अमेरिका विरुद्ध रशिया असा 'कोल्ड वॉर' साधारण ६ दशके चालला, म्हणजेच १९४७ ते १९९१ पर्यंत, आणि ह्या कालावधीत एक भयंकर भीती होती ती अणुबॉम्ब आणि त्या सारख्या विनाशक गोष्टींचा वापर होण्याची, जो अमेरिकेने जपान वर लादलेला त्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडे अजून किती अणुशक्ती किंवा त्यासारख्या इतर विध्वसंक अण्वस्त्रांविषयी किती कुठे कसा अभ्यास चालू आहे, ह्याबद्दलची माहिती रशियन गुप्तहेर अजेन्सी KGB त्यांच्या उत्कृष्ठ गुप्तहेरांकडून अगदी बेमालूमपणे घेत असत. मग मुद्दा येतो हे कसं शक्य आहे... अमेरिकेसारख्या देशाकडून अश्या माहित्या काढणं सोपी गोष्ट नाही, पण शेवटी कुठलीच गोष्ट परिपूर्ण नसते आणि त्यात प्रत्येक देश ही येतोच, मग तो देश कुठलाही असो... आणि अमेरिका पण त्याला अपवाद नाही, नव्हता! त्यात रशियन्स ही आले, अमेरिकेत रशियन गुप्तहेर (KGB) असे पेरलेले होते की त्यांवर संशय येणे फारच अवघड, त्यात अमेरिकेत नवीन आलेले गुप्तहेर म्हणजेच KGB ची नवीन पिढी अमेरिकन राहणीमानाला सुखावतात, रशिया देश कम्युनिस्ट असल्याने तिथल्या नागरिकांमध्ये सरकार बद्दलची भावना कटू होणे साहजिक होते आणि त्यात अमेरिके सारख्या 'फ्रीडम टू स्पीच' वगैरे मूल्य असलेल्या देशात राहायला मिळणे हे त्यांसाठी जास्त महत्वाचे होत जात होते, ह्या सर्व काळात 'फिलिप' आणि 'एलिझाबेथ' ह्यांचा कस निघत होता. रशियाहून येणाऱ्या खास पाहुण्यांची भेट घेणे, KGB सिनियर्स चा आदेश पाळणे. स्वतःच्या मुलांच्या कडे लक्ष देणे, कामात अडथळा आणणाऱ्या अमेरिकन्स / फितूर रशियन्स ची वेळोवेळी 'दखल' घेणे. हे सगळं महा-धोकादायक काम वेळोवेळी 'केरेक्टर' बदलून चालू असताना येणाऱ्या अडचणींना उत्तरं देणं हळूहळू अती-महा-धोकादायक होत जात असतं. नक्की कोणाच्या बाजूने विचार करावा - रशियन्स की अमेरिकन्स हा ही प्रश्न सतत डोक्यात घोळत असतो.
जस जसे मालिकेचे सिजन्स वाढत जातात तस तसे जुने पात्र जाऊन नवीन पात्रांची भरणी चालू असते, जुनी काही पात्रं अचानक अमेरिकेतून गायब होतात, ती कुठे कशी जातात तर काहींना कंठस्नान... ह्यासर्व प्रक्रियेत फिलिप आणि एलीझबेथच्या मुलीवर KGB एजेंट होण्याची वेळ येत असते. पुढील कथानक बघण्यात जी मजा आहे त्याला तोडच नाही.
ग्रॅमी, गोल्डन ग्लोब सारखे प्रतिष्ठावान अवॉर्डस ची लयलूट केलेली आहे ह्या मलिकेने प्रत्येक सीजन साठी, खास एका गोष्टी बद्दल सांगावेसे वाटते ते म्हणजे उत्तम केशरचना, प्रत्येक अमेरिकन नागरिकाला वेगवेगळ्या व्यक्तीरेषेत गुंतवून गुप्त माहिती काढणे ह्यासाठी केशरचनाचा महत्वाचा वाटा किती आहे ही मालिका पाहून तुम्हाला कळेलच! बाकी इतर कलाकारांनीही जान टाकली आहे प्रत्येक भागात. जरूर पहा, अश्या इतिहासाला धरून मालिका फारच कमी असतात. त्यांपैकी ही एक The Americans.
#सशुश्रीके । ३० एप्रिल २०१८
Comments
Post a Comment