इटर्नल सनशाईन ऑफ द स्पोर्ट्लेस माइंड


इटर्नल सनशाईन ऑफ द स्पोर्ट्लेस माइंड

माझी पहिलीवहिली चित्रपट समीक्षा, नवीन चित्रपटांची करण्यापेक्षा मला आवडलेल्या काही निवडक चित्रपटांची करतो, तुम्हाला वाईट आठवणींपासून कायमची सुटका हवी आहे का? तुम्ही एखाद्या व्यक्तीला व त्या व्यक्तीशी निगडीत सर्व आठवणींना 'टाटा बाय बाय' करायच्या मनस्थितीत आहात काय? तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता… 'लकुना इन्कॉर्पोरेशन'

ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास, उत्तम प्रायोगिक मांडणी, बारकावे + प्रेम कथा ह्यांचा संगम पहायचा असेल तर * ईटर्नल सनशाईन ऑफ द स्पोटलेस माइंड * नावाचा इंग्रजी चित्रपट नक्की पहावा. जिम कैरी आणि केट विन्स्लेटचा अगदी हटके स्वरूपातला चित्रपट; २००४ साली प्रदर्शित झालेला एक अप्रतीम पण खूप न गाजलेला / प्रसिद्धी न मिळालेला चित्रपट!
 


माझा एक मित्र आहे… नाव मिहीर आपटे, इंग्रजी चित्रपटांचा चाहता… मला नेहमी त्यानी उद्गारलेलं एक वाक्य आठवत असतं, म्हणे "आयुष्यात चित्रपटांसारखं काहीच नसतं!" तो म्हणाला अरे येड्या हा बघच… बघच तू! आणि त्या दिवसापासून त्यांनी जे काही पहायला सांगितलं ते बिनबोभाट पाहिलं! असे मित्र मिळायला नशीब लागतं. असो...

तर ह्या चित्रपटाबद्दल सांगणे म्हणजे डोक्याची आई-माई-झ. आहे! तरी मी प्रयत्न करतो. जिम केरी हा अतिशय 'इमोशनल इन लव' असा आणि केट मात्र बिंधास, मनाला जे पटेल तसं करणारी, दोघांच्यात स्क्रिप्ट मध्ये ठरल्याप्रमाणे प्रेम वगैरे, मग वाद वगैरे, पण कथानक अचानक वळण घेते ते अगदी पहिल्याच ५ मिनिटांत! जिम भरकटल्या सारखा असतो, हँगोवर वगैरे झाल्यावानी!

काही झेपत नसतं, आणि कथा पुढे सरकता सरकता नकळत मागे सरकत जाते! गम्मत तिथेच आहे! केटला जिम केरीशी नातं तोडायचं असतं आणि ती निवडते 'लकुना इन्कॉर्पोरेशन' ही मंडळी लोकांच्या स्मरणातून एखाद्या व्यक्तीशी निगडीत गोष्टी 'ईरेझ' करण्याचे काम करत असते! जशास तसे म्हणून आपला जिम केरी पण तोच मार्ग अवलंबतो, पण जिमचं डोकं इतकं गुंतलेलं असतं केट मध्ये! 'लकुना इन्कॉर्पोरेशन' च्या डॉक्टरांना हुलकावणी द्यायचं अद्भूत काम नकळत घडत असतं! 'लकुना इन्कॉर्पोरेशन' च्या अथक प्रयत्नांना जिम भाऊ लई टफ देतायत हे पहायला जाम मजा येते!

अतिशयोक्ती, अचानक, आता हे काय बुवा… असा गोंधळ आहे पण त्या गोंधळाची मजा चित्रपट सारखा सारखा बघून भागवावी लागते! याचा अर्थ काय… चित्रपट पहिल्या झटक्यात समजायलाच हवा असा नियम थोडाच आहे? पैसा वसूल होणे म्हणजे चित्रपट उत्तम असणे असे मुळीच नाही, निदान हा चित्रपट पाहून झाल्यावर तरी माझे ह्या मतावर शिक्कामोर्तब झाले आहे. हा चित्रपट मी किमान ८-९ वेळा तरी पाहिला असेन... आणि आजही तितक्याच उत्सुकतेने बघू शकेन! छोटे छोटे बारकावे अजूनही निसटतात आणि ते कळल्याचे अती प्रचंड समाधान मिळते! शेवट पण छान केलेला आहे, तुम्हाला तो शेवट पाहण्या शिवाय मुक्ती नाही आता! आपल्या नसरुद्दिन शाह / फारूख शेख / स्मिता पाटील / दीप्ती नवल ह्यांसारख्या व्यक्तींनी करावी अश्या भूमिका आहेत! तर… सांगायचं असं की हा चित्रपट अवश्य पहावा! नाहीतर 'लकुना इन्कॉर्पोरेशन' ला भेट देऊन जे काही आत्ता वाचलेत त्याला 'ईरेझ' करून आपापल्या कामाला लागावे हा आग्रह!

#सशुश्रीके | २५ ऑगस्ट २०१४ / ३.२२मि.



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!