विजय...

विजय...

माझा बॉस होता... मी एवरेस्ट ब्रँड सोल्युशन्स मध्ये जेव्हा रुजू झालो, काही महिन्यांतच विजयच्या ग्रुप मध्ये शिफ्ट झालो. एक नम्बर बोलबच्चन! रेतीला ही सोन्याच्या भावात विकण्या इतपत तगडा आत्मविश्वास... आणि त्यात कमालीचा खडूस!

माझी पहिली वाहिली नोकरी, २००५ची वेळ... एवरेस्ट ब्रँड सोल्युशन प्रा.लि. मुंबई. तिथे रुजू झाल्या नंतर ६महिन्यांनी प्रभादेवीच्या कार्यालयातून जेव्हा आम्ही नवीन सांताक्रूझच्या कार्यालयामध्ये स्थलांतरीत झालो तेव्हा त्याला बंद खोली असलेली स्वतंत्र खोली मिळाली आणि त्याला आमच्या दंग्यापासून सुटका मिळाली! कारण आम्ही जोरजोरात बडबड करायचो, गाणी वगैरे लावायचो कार्यालयात, आणि कार्यालयीन वेळेनंतर तर उत यायचं आम्हाला विशेषतः मला, आणि मग तो पिंजर्यातून चिडून सुटलेल्या वाघासारखा यायचा आणि चिडायचा आमच्या वर, विशेषतः माझ्यावर... म्हणायचा 'धिस इज ऑफिस गायज/समीर... बिहेव!' आम्ही/मी तात्पुरतं गांभीर्य पाझरून शांत बसायचो. आणि त्याला मनसोक्त शिव्या देऊन परत जरावेळानी ये रे आपल्या मागल्या.

त्याच्या बद्दल नेहमी 'तो असाच आहे तो तसाच आहे' असा सूर असे सगळ्यांचा/माझा, पण होता प्रतिभावान, जाहिरात क्षेत्रासाठी अगदी उत्कृष्ट व्यक्तिमत्व, बँडस्टँड वर एका इमारतीत जागा, विदेशी गाडी वगैरे, एकूणच थाटात होतं प्रकरण! म्हणजेच श्रीमंतांचे सगळे चोचले असलेला होता तो.

त्याच्या घरी त्यांनी एकदा पार्टी ठेवलेली (माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकिर्दीत त्यानी दिलेली पहिली आणि अखेरची पार्टी) घरात घुसताच टेबल वर मला 'टॉब्लॉरोन' नावाचे भलेमोठे त्रिकोणी वडीचे चॉकलेट दिसले...तेच जे लहानपणी माझे बाबा आणायचे माझ्यासाठी 'कतार'हुन! त्यानंतर पहिल्यांदाच पाहिले, त्याला न विचारता 'टॉब्लेरोन'वर तुटून पडलो, त्यानी जे काय हाव भाव दिलेत माझ्याकडे पाहून... 'ह्याला कुठे न्यायची सोय नाही!'

विजय बरोबर मकरंद पाटील (असिस्टंट क्रीएटिव्ह डिरेक्टर) असे आमचे दोन वरिष्ठ आणि त्यांच्या खाली मी, गौतम, संतोष आणि कार्तिक अशी आमची टोळी होती, पण गौतम आणि मी त्यांच्या त्यातल्या त्यात लाडके (का ते सांगतो पुढे) म्हणून विजयने एक खेळी खेळली आणि फक्त ४जणांची टोळी करवून घेतली, म्हणजे नंतर टोळीत मी, गौतम, मकरंद, विजय, बस!

विजयच्या ओळखी खूप होत्या त्याला त्याच्या कामाव्यतिरिक्त बाहेरची कामे ही मिळत, म्हणजेच जास्त पैसा, मकरंद मी आणि गौतम त्याच्यासाठी काम करत असू, दिवसभर कार्यालयात आणि दिवसाचे काम संपले की त्याचं काम, त्याचाकडे कधी पैशाची मागणी केली नाही, तो जसे देईल तसे घ्यायचो, मग अक्खा दिवस(रात्र)जर काम असेल दिवशी पाच हजार वगैरे द्यायला लागला, ह्या सर्व 'कामा'च्या दिवसातच माझे लग्न झाले.

मग काय!... साखरपुडा/लग्नासाठी सुट्टी पाहिजे, त्यामुळे साहजिकच तेच कारण देऊन मी सुट्टी मागितली, त्याला मी जेव्हा लग्ना बद्दल सांगितले तेव्हा त्याला विश्वासच बसेना! त्याचं वय तेव्हा ३२-३३ असेल आणि मी होतो २४चा... मकरंद कडे पहात हसत हसत त्यानी माझी जी काही खिल्ली उडवल्ये! असो, लग्न झाल्यावर मात्र मी त्याचे काम घ्यायचे कमी केले आणि शनिवार रविवारचे तर सोडलेच, शुक्रवार सकाळीच मी विजयला जाऊन विचारायचो, काही काम असेल तर आत्ताच सांग, की त्याला कळायचं की आज शुक्रवार आहे!

तसा तो चांगला पुढारी (लीडर) ही होता, आम्हाला इंग्लिश येत नसे तेव्हा धड (आत्ता ही येतं असं नाही) किंवा ग्राहक (क्लाएंट)ला कसं सामोरे जायचे हे सगळे तो आम्हाला करायला लावायचा, उगाच "तुला जमत नाही मग तू करू नकोस" ह्यातला तो नव्हता! त्याच्या सिफारशी मुळेच दोनच वर्षात मी व्हिजुअलायझर पासून आर्ट-डायरेक्टर झालो... आजू बाजुला चर्चाच.. विजयचा खास आहे ना...वगैरे वगैरे!

असो, तो कितीही गंभीर असला तरी सुद्धा त्याची पण आम्ही/मी खूप खेचायचो, तोंडावर नाही पण त्यानी पाठ फिरवली की त्याचा अभिनय करणे, तो कसा चालतो.. त्याला कोण 'आवडतं' आणि कोण आवडत नाही, ह्याबद्दल गप्पा! आणि हो... त्याच्या चेहऱ्यावर बघावं तेव्हा फोड आलेले असायचे म्हणून गमतीने माझा मित्र गौतम आणि मी त्याला साबुदाणा म्हणत असू, त्याला दुधाच्या पदार्थांचा त्रास व्हायचा म्हणून त्याला उगाच दुधाचे पदार्थ असले की जाऊन विचारायचे, हवय का!? असले कीडे करत असू, आणि तो ही काही कमी नव्हता 'वेळ आली' की आमची ठासायचा!

हे सगळं गमतीजमतीचे वातावरण चालू असताना मला अचानक दुबईतून कामाच्या संदर्भात फोन आला, मी तो स्वीकारला ही... पण मी हा निर्णय कसा सांगणार विजयला हा मोठा प्रश्न माझ्यासोबत इतरांनाही होता! मकरंद म्हणाला, तू मुळीच घाबरू नकोस, अरे मस्त छान निर्णय आहे, विजय तुला थांबवणार वगैरे मुळीच नाही. तरी मी मकरंदला म्हणालो, तू आधी त्याला कल्पना दे, मला उगाच त्याचा रागीट चेहरा पाहण्याची इच्छा नाही! त्यानी तशी कल्पना दिली विजयला आणि माझा मार्ग जरा सुखकर झाला!

मी दुबईत आलो, त्याच्याकडून मला वीस-पंचवीस हजार येणे होते, मी वेळोवेळी त्याला मेल/मेसेजेस वर कळवत होतो पण तो काही मला पाहिजे तसा प्रतिसाद देईना! काही महिने झाले, माझं डोकं फिरायला वेळ लागत नाही, तरी मी संयमानी गोष्टी हाताळत होतो, मग मी मकरंदला झालेला प्रकार सांगितला, मकरंदने विजयला समजावले असेल पण तरीही माझ्या पैशांबद्दल उदासीनताच! मग मला एक युक्ती सुचली... साधारण चार महिन्यांपूर्वी (म्हणजे मी दुबईत येण्या आधी) त्यानी त्याचा मोबाईल मला दिलेला गाणी भरण्यासाठी, जागा कमी होती म्हणुन त्याचा 'बॅकअप' घेतलेला मी कार्यालयातल्या संगणकावर, आणि त्या कार्यालयातून कायमची रजा घेताना माझे अडीच वर्षांचे काम आणि तो 'बॅकअप' (नकळत) माझ्याकडे घेऊन ठेवलेला आहे ह्याची आठवण झाली, पुढे माझ्यातला खलनायक जागा झाला आणि मग 'अगर तुम अपनी सलामती चाहते हो तो मुझे मेरे पैसे दे दो' ह्या धमकीनी शीत-युद्ध सुरु केले, विजयनी मकरंदला मध्ये आणले, मी झालेला प्रकार मकरंदला संजावला... त्यानी मध्यस्थी साधत शेवटी बऱ्यापैकी पैसे मिळाल्यावर मी प्रकारणावर पडदा घातला.

त्यानंतर विजयशी असा काही संबंध आला नाही, सद्ध्या व्हॅटसऐप आणि फेसबुक द्वारे संपर्कात आहोत.

त्याच्याबद्दल एक महत्वाची माहिती द्यायची राहून गेली बघा... ह्याला चित्रपट कथा लिहायची खूप खाज होती, त्यानी लिहिलेली ही, आम्ही त्याच्याबरोबर काम करत असताना त्यानी ह्याच विषयाबद्दल कल्पनाही दिलेली, आणि एके दिवशी अचानक कळले! फरहान अख्तर नायक आणि निर्माता... पदुकोण नायिका... आणि तो कथा लेखक आणि दिग्दर्शक! चित्रपटाचं नाव होतं 'कार्तिक कॉल्लिंग कार्तिक'

#सशुश्रीके । २१ नोव्हेम्बर २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!