बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!


बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

काय आहे ना झोप नसेल येत की मी जुन्या फोल्डर्स मध्ये घुसतो..
आणि मग सब फोल्डर्स
बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!...
म्हणजे जास्त शोधाशोध न करता,
त्यात मुंबई-अलिबाग-आक्षी...
अशी फोल्डर्स तर खचून भरलेली,
उघडलं की जणू आतमध्ये स्प्रिंगांनी फेकल्यासारखी,
उसळून थोबाडावर आपटतात,
कधी जळमटं किंवा गंज चढलाच नाही,
चकाचक अजूनही...
'वेल मेन्टेड यु नो!'
काय काय आहे त्यात,
दणकट झोपाळा...
२-३ म्हशी आहेत
आहेत काही रेडिओ
काही छोटे काही मोठे टीव्ही
बेहिशोबी पेन्सिल सेल्स... 
काही नाणी मातीत लपवलेली,
काही सायकली - काही मित्रांच्या काही माझ्या
गोळ्या लिमलेटच्या,
काही कॉफी बायटा काही मेलड्या
खूप सारे पेप्सीकोले...
ग्लास च्या ग्लास आरींज - काला खट्टे
तुटलेल्या स्लिपरा, फाटलेले बूट
पिवळे झालेले आणि आंब्यांचा वास (सुवास) असलेले बनियन्स
फुटलेले ढोपर, खरचटलेले कोपरे...
थंड पाण्याने भरलेल्या,
विहिरीतून खेचलेल्या कष्टी बादल्या...
शेवाळ्यातून कधी चुकून कधी जाणूनबुजून झालेली धड्पड
छोट्या हौदात मारलेले मोठे सूर!
पायऱ्यांवरच्या गोणपाटावर बसून खाल्लेले दडपे पोहे, 
काही थेंब पावसाचे ... ओंजळीत जमवून मिटवलेली तहान
सुरुच्या बनात लावलेली शेकोटी,
हातात कैद केलेले काजवे...
दोऱ्याने बांधलेले हेलिकॉप्टर्स!
शेवटी... परतीची तिकीटं,
हातात चुरगळलेल्या... काहीश्या भिजलेल्या...
आजीने दिलेल्या...
काही नोटा.

फोल्डर उलटं पालटं करता करता...
कधी झोप लागते मग कळत नाही,
मग ते तसच उघडं!
मग जाग आल्यावर बंद करायचं की... 
उघडं राहू दे म्हणत रमत बसायचं?
मग स्मार्ट फोन येतो हातात,
कीबोर्डवर दे देनादन...
आठवणींची अक्षरे होतात
काही रडतात, काही हसवतात
पण न फसवता...
इथे येऊन पडतात,
कारण...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

#सशुश्रीके ४ जुलै २०१९




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी