शरद मामा

शरद मामा

माझा सख्खा मामा... शरद मामा, भटजी... सध्या पालीला असतो. दोन मुलीआहेत, एकिचं लग्न झालंय आणि दुसरी अजून शाळेत आहे. दात पुढे, केस तरुणपणीच पांढरे झालेले, रव्याच्या लाडू वरचा जसा रवा दिसतो तशी १-२एमेम दाढी,पोटाचा गोलाकार वयोमानानुसार वाढत गेलेला, शर्ट-धोतर किवा आखूड प्यांट,बाटा सैंडेक किंवा कोल्हापुरी चपला, कपाळाला गंध, अखंड सर्दीने ग्रस्त,काही कोणाचं (त्याच्या पेक्षा वयानी कमी असलेल्यांपैकी) चुकलं की क्षणात खेकसणारा, हातात अडकित्ता तोंडात तंबाखू, अस्सल कोकणस्थ ठेका बोलताना,मनसोक्त खळखळून हसणारा, मोठा कान असलेला माझा सक्खा मामा... शरद मामा

आम्ही मुंबईत राहत असताना आमच्या कडे काही दिवस राहायला होता, आपणासर्वांमध्येच काही अवगुण असतात छोट्या मोठ्या प्रमाणात तसे त्यातही होते त्यामुळे आमच्या घरी काही जास्त टिकला नाही तो... मग नंतर ठाकूरली, डोंबिवली येथे स्थाईक झाला, स्वतःचं असं घर घ्यायला जमले नाही त्याला. ते पागडी का काय ते, त्यावरच. असो, मूळचा अक्षीचा. अलिबाग-रेवदंडा मधलं छोटंसं गाव. तिथे माझे आजोबा म्हणजे - 'पुरुषोत्तम जनार्दन भावे' (आप्पा म्हणायचे सगळे त्यांना) गावातल्या मोजक्या ख्यातनाम भटजींपैकी एक. त्यांच्या सारखाच मामाही भटजी झाला. पाठांतर उत्तम, धार्मिक ओढ त्यामुळे त्याचासाठी भिक्षुकी काही अवघड नव्हती म्हणा, आणि दुसरा पर्याय ही नव्हता. पण आजोबांच्या 'त्या' नावाचा त्याला फायदा घेता आला नाही, नाही… नाही त्याने घेतला नाही. कारण त्याला मुंबईत भिक्षुकी करायची होती, मग काय... अक्षीचं मोठ्ठ घर आणि आई वडलांना सोडून तो मुंबईत भिक्षुकी करायला लागला. पण गम्मत अशी की, भिक्षुकी बरोबर त्याला दुचाकी आणि गाण्यांची फार आवड!

मग काय… निरनिराळ्या दुचाक्या, त्यांच्या पुढे मागे विविध आकर्षणे, आकर्षणे म्हणजे एकापेक्षा अधिक आरसे, विविध प्रकारचे होर्न, सामान जास्त
मावावे ह्यासाठी वाढवलेली अतिरिक्त विशेष जागा संशोधन, त्यात तो मुंबई-अलिबाग प्रवास करायचा, दर दिवाळी/गणपती कुटुंबां सकट! एकदा तर मला
घेऊन तो मुंबई-अलिबाग येत होता, अचानक आम्ही हवेत, नशीब रस्त्यावर गर्दी नव्हती, लेंबरेटा होती त्याच्याकडे तेव्हा… त्या 'रेट्रो'लेंबरेटा कडे गेलो
पहायला नेमके काय झालेले तेव्हा असे कळाले की 'साय्लेन्सर ने जागा सोडल्यानी आम्हाला आमची जागा सोडावी लागली!'... नशीब जास्त दुखापत वगैरे
झाली नाही, त्यादिवशी पासून मोठा प्रवासाला माझा (माझ्या आईकडून) मोठा 'नकार' असायचा त्याला. मुंबईत त्याच्या कडे कधी गेलो तर त्याचा दिनक्रमातला
एखादा भाग नक्कीच ग्यारेजला समर्पित केलेला असायचा. सुरुवातीला सायकली, मग दुचाक्या… अहो सर्व भावंडांमध्ये हा पहिलाच ज्यानी दुचाकी घेतली! बाकी सर्व मामा लोक बघत बसले, लेंम्ब्रेटा, वेस्पा, बजाज, कावासाकी फोरस्ट्रोक ह्यासगळ्या मनसोक्त हाणून झाल्यावर पाठीची वाट लागणे अपेक्षित होतेच! मग काय आता पाठीला आराम म्हणून 'कावासाकी एलीमीनेटर' घेतली आहे एक वर्षापूर्वीच! त्यात २र्या मुलीला नात झाली, मग अख्या कुटुंबाला बाइक कशी बरं पुरणार म्हणून सेकंड हैंड मारुती सुझुकी चार-चाकीचे आगमन ही झाल्याचे समजले! त्यात ही विविध फेर-बदल केले असतीलच त्यानी त्याबद्दल शंकाच नाही!

राहिलं संगीत प्रेमा विषयी तर… आजोबांना आवड शास्त्रीय संगीताची तशी त्यालाही, बघावं तेव्हा अजित कडकडे, भीमसेन वगैरे घुसत असतात त्याचा कानात - विविध उपकरणांनी, पूर्वी फिलिप्स पॉवर-हौस, मग विविध वॉक-मन्स… आता विविध स्मार्ट-फोन्स, 'हौशेला मोल नाही' ह्याचं 'ब्येस्ट' उदाहरण! माझ्याकडे त्याच्या एकट्याचेच ४-५ नंबर असतील, म्हणतो पालीत विविध ठिकाणी विविध ऑप्रेटर्स चांगली रेंज देतात! आता काय बोलायचं ह्यावर!

दुचाक्या, संगीत वेड… आता गाडी, अरे हो एक महत्वाची गोष्ट विसरलोच! जाम गोड खाऊ…त्याला एकदा गरम गरम मोदकावर गरम तूप आणि त्यावर पेढा कुस्करून खाल्लेला पाहिलाय मी! भरपूर साखर युक्त शिक्रण, काही नसेल तर तूप-साखर/गुळ भयंकर गोड, काहीही खाऊ शकतो हा मनुष्य! जेवताना शेवटचं शीतही सोडत नाही, अगदी १००% ब्राम्हण जेवतो तसा जेवतो हा. सोहळं-सुतक-सोयर अगदी सगळं पाळणारा पक्का, पण…

…पण तो अक्षीत राहिला असता तर नक्कीच्च आत्ता आहे त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत असता. आयुष्यात एक पाउल चुकीचे पडले की पुढचे पाउल बहूतेकरून त्याच दिशेने जाते, 'शेवटी नशीब' असं म्हणतो ना आपण. पण लहानपणी ह्या काही गोष्टींचा गंध नव्हता, जाम धमाल करायचो मी त्याच्याबरोबर!
मजा यायची, मिस यु मामा! शरद मामा :)




‪#‎सशु
श्रीके‬ । १० नोव्हेंबर २०१५ | http://sashushreeke.blogspot.ae/2015/11/blog-post_10.html

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!