दुष्ट दुष्काळ

परळी वैज्यनाथ दर्शन झाले, आता अंबेजोगाईला जाऊन जोगेश्वरी देवीचे दर्शन घ्यायचे होते, आई आणि मी देवळाच्या समोरच्याच एका स्टॉल वर उत्तप्पा/डोसा खाल्ला, मस्तच होता! बरोबर पाण्याची बाटली होतीच त्यामुळे 'मिनरल वॉटर' टेबलावर होतं तसंच राहिलं, जरा गम्मत वाटली... दुबईत 'मिनरल वॉटर' बघायची सवय आहे हॉटेलांमध्ये, पण इथे स्टॉल लावलेल्या छोट्या हॉटेलात पण तोच प्रकार पाहून जरा वेगळं वाटलं.
असो, आता अंबेजोगाईला जाऊन दर्शन घ्यायला आम्ही मोकळे, पण त्याआधी आईच्या पौरोहित्य क्लास मधल्या एका मुलीच्या आई वडिलांकडे भेट द्यायची होती, साधारण ४५-५०मिनिटे लागतात परळीहुन अंबेजोगाई एसटीने... साधारण १२च्या सुमारास आम्ही त्यांच्याकडे गेलो, घरात गेल्यावर मस्तपैकी खुर्चीवर बसल्यावर हायसं वाटलं, कारण त्या एसटीचे टायर जणू लोखंडाचे आणि सस्पेन्शन जणू रबरी... आणि परत स्टेशनहुन चालत रस्ता शोधत शोधत जवळ जवळ अर्धा तासाची पायपीट झालेली! रस्त्यात डाळिंबेवाला दिसला... एक किलो डाळिंबे घेऊन आम्ही घर शोधत शेवटी पोहोचलो.
वय असेल ६०-६५च्या आसपास, काकूंचा एकही केस पांढरा नाही आणि काकांचा एकही केस काळा नाही, हे आत्ता लिहिताना आठवले! असो.. ज्या खुर्चीत बसलेलो त्याच्या बाजूलाच एक गव्हर्नमेंटचा पाणिवाटप संदर्भात स्टिकर असलेला एक मोठा पिंप होता, मी त्यावरचा पेला घेऊन सहज पाणी घेतले आणि प्यायला लागलो तेवढ्यात काकू म्हणाल्या, "अरे बघा.. मी पाणी द्यायला विसरलेच!" त्यावरून पुढे पाण्याचा विषय निघाला.. तेव्हा काका म्हणाले... "आमच्या इथे २१दिवसांनी पिण्याचं पाणी येतं" हे वाक्य ऐकताना शेवटचा घोट घश्याखाली उतरलाच नाही!
२१ दिवसांनी पिण्याचं पाणी, आणि सांडपाण्यासाठी टँकर येतो ते पाणी विकत घ्यावं लागतं, जाम हाल आहेत पाण्याचे, डेड स्टॉक पण संपत आलाय आता, गेले चार वर्ष पाऊसच झाला नाहीये नीट!
जवळ जवळ एक - दीड तास आम्ही बोलत होतो... त्यात असं कळालं की नवी पिढी ह्या दुष्काळाला वैतागून शहरात जायला लागली, आता इथे कोणी शेती करायला तयार नाही, आम्ही आहोत पण काम करायला मजूर मिळत नाहीत... काका सांगत होते आम्ही ऐकत होतो, आई ही आधुनिक शेती वगैरे वर बोलत होती... तेवढ्यात तीळगुळ घेऊन आल्या काकू, तिळगुळ खाल्ल्या नंतर पाणी प्यावेसे वाटलेले पण टाळले!
सव्वा बाराच्या सुमारास मी आणि आईने त्यांचा निरोप घेतला, ते म्हणाले रात्री या जेवायला, नाहीतरी रात्री अकरा वाजताची बस होती पुण्याची, इतका वेळ काय करणार!? आई आणि मी ठरल्या प्रमाणे जेवायला गेलो मग... काका काकू वाट बघतच होते, आम्ही सात वाजताच गेलेलो, कारण वेळ घालवायला काही पर्यायच नव्हता, येता येता २-३मंदिरे करत पाय ही दुखायला लागलेले, काका टीव्ही पाहत होते, आई काकू स्वयंपाक घरात होत्या, मी आपला मोबाईल वर टाइमपास करत होतो... काका बातम्या पाहत होते, ग्रामिण हेडलाईन्स का कायतरी प्रोग्राम होता, विषयात दुष्काळ वगैरे चाच... मी मोबाइलवर असूनही कानात तो दुष्काळ ऐकू येत होता, तेव्हढ्यात एक माणूस त्यांच्या मुलाबरोबर आला.. काकांनी त्यांना सोफ्यावर बसायला सांगितले, त्यांच्या गप्पा सुरु होत्या... हातात तिळगुळ, तोंडातून हरभरा बद्दल उदासीन 'गॉसिप' चाललेले... म्हणजे "ह्या वर्षी जितका हरभरा लावला तेव्हढाच येणार हो!" म्हणजे एकूणच शेतकरी आणि पाणी आणि त्यांच्या व्यथा! त्यांच्या घरी पदोपदी ह्या गोष्टीची जाणीव होत होती... आलेले पाहुणे गेल्यावर आईचा आतून आवाज आला, जेवण तयार होते.
मस्त २-३प्रकारची लोणची, चटणी, बटाटा रस्सा भाजी, पोळ्या, भात, ताक! जेवता जेवता पुण्या, दुबईच्या गप्पा... पण मला एक कळेना की काकू का जेवत नाहीयेत! त्यांचा होता उपास! दुपारी पाणी जाईना आता घास गिळवेना अशी परिस्थिती... काका ढेकर देत म्हणाले, तिला सवय आहे!
असो... आता निघायची वेळ झालेली, काकांनी आईला एक पुस्तक दिले आणि मुलीसाठी तिळगुळ. मी दोघांना नमस्कार केला आणि निरोप घेतला.
परत अंबेजोगाईच्या भक्तनिवासाला जाईपर्यंत आई आणि मी त्यांच्या बद्दलच बोलत होतो, दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर झालेला प्रकार आबांना सांगितला, ते म्हणाले परभणीमध्ये ही हाच प्रकार आहे... दुष्काळ फार वाईट!
पाणी पिताना / जेवण जेवताना घसा बंड करतो! नको तो दुष्ट दुष्काळ...
#सशुश्रीके | ४ मार्च २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!