खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी... ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका. (Series Review)

खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका.  


खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे #NARCOS मलिका.

अमेरिकेत गुन्हेगार साक्षीदाराला गायब करतो, कोलम्बियात 'पाब्लो' ने कोर्टच गायब केलं!
- 'स्टीव्ह मर्फी.'

आता हा पाब्लो कोण न हा स्टीव्ह कोण! सांगतो सांगतो... तर हा पाब्लो आहे ना तो खलनायक आहे मालिकेचा, मालिकाचे नाव आहे 'नार्कोस'... (अमली पदार्थांची निर्मिती/तस्करी करणारे ते 'नार्कोस') त्या पाब्लोच्या मागे लागलेला पोलीस म्हणजे स्टीव्ह आणि त्याचा सहकारी पण आहे एक हावी नावाचा, दोघे DEA agent . दोघे मिळून त्या पाब्लोला पकडायला जे शक्य असेल ते सर्व करत असतात, अगदी शेवट पर्यंत! असं सगळं आहे बघा, म्हणजे पोलीस आणि गुन्हेगार ह्यामधली झकाझकी, पण ह्यात वेगळं काय असा प्रश्न पडला असेल! तर वेगळेपण असय की ही कथा सत्य कथेवर आधारित आहे, जवळपास ५ ते १०% भाग रेकॉर्डेड चित्रफितींचा वापर करून सादर केलेला आहे, फारच डोकेबाज पद्धतीने तेव्हाच्या बातम्या आणि काही खाजगी चित्रफीती वापर करून वास्तविकता अजून प्रभावीपणे दाखवण्यात आलेली आहे. सत्य घटने वर आधारित त्यामुळे बऱ्यापैकी सर्वच जागा / व्यक्तिरेखा त्याची नावं सगळं एकदम 'ओरिजिनल', त्यामुळे ही मालिका बघताना आपण वेळोवेळी DOCU-DRAMA बघण्याचा अनुभव येतो, हेच ते वेगळेपण.

प्रेक्षकाला पाब्लो बद्दल माहीती असो वा नसो, असे दोन्ही प्रेक्षक नक्कीच 'पुढे काय होणार आता' ह्या प्रश्नावर एकावर एक भाग बघून मालिकेच्या जाळेत अडकणार नक्की. त्यात तो ८०-९०चा काळ... तेंव्हाचं ते जग, लँडलाईन, पेजर आणि मोठ्या सेलफोनचा तो जमाना, तेव्हाचे कपडे, केशरचना, गाड्या... रस्ते ह्या सर्वांची इतकी काळजीपूर्वक दखल घेऊन मांडणी केली गेली आहे की तुम्ही त्या ८०-९०च्या जगात जगायला लागता. ह्या सर्वात अजून एक म्हणजे पाब्लो ला इंग्लिश येत नसतं त्यामुळे त्याच्या सकट त्याच्या आसपासच्या सगळ्याच व्यक्तिरेखांचे बोल स्पॅनिश भाषेत आहेत, अर्थात 'सबटायटल्स' असतात, त्यामुळे नीट लक्ष देऊन पाहावी/वाचावीही लागते ही मालिका, आणि अजून परिणाम कारक होत जाते. पाब्लो साकारणाऱ्या कलाकारानेही खुप मेहेनत घेतलेली आहे (Wagner Moura), वयोमानानुसार वाढणारे पोट, बदलणारा आवाज, वागण्याची पद्धत, वाढत जाणारा उर्मट पणा, कुटुंबाशी आणि व्यवहारात वेगवेगळ्या भूमिका साकारणारा पाब्लो सफारइदारपणे जिवंत केलेला आहे. एवढं सगळं असून त्याबद्दल कधीतरी साहानुभूती मनाला जाणवणे हा प्रकारही कधी कधी काही प्रसंगातून दिसतो, ह्यातच मालिकेबद्दलची 'ग्रीप' अजून वाढते, एकूणच त्याचा प्रवास, चढउतार आणि त्याचा शेवट हे सर्व पाहण्यासाठी कुठली डॉक्युमेंटरी पाहण्यापेक्षा ही मालीका पाहणे कधीही मनोरंजनकारक!

तर आता काही पाब्लो विषयी, कोलंबियन ड्रग जाळ्याचा सगळ्यात महत्वाचा महा-खल-नायक म्हणजे हा पाब्लो, ह्या पाब्लोने तेव्हाच्या ड्रग डीलिंग मध्ये इतका धुमाकूळ घातलेला की अमेरिकेत जाणाऱ्या ८०% ड्रग्सच्या मागे तोच होता! ही झाली त्याची एका वाक्यातली ओळख. छोट्याश्या शहरात वाढलेला, सतत दंगली आणि अस्थिरता अनुभवणारा एक मुलगा जेव्हा 'डॉन' होतो, त्यानंतरची त्याची वाटचाल, त्यांनी केलेले गुन्हे, कूटनीती, प्रतिस्पर्द्यांवर कधी सहजतेने तर कधी पराभवाने खचून केलेली 'कम-बॅक' दिग्दर्शकाने मस्तच रंगवली आहे. पाब्लोचे कौर्यकर्म थांबवण्यासाठी कोलंबियन पोलिसांना येणाऱ्या अपयशाला कारणीभूत असलेले स्थानिक पोलिसच ह्या मालिकेत दुसरे खलनायक आहेत, आणि त्यांचात राहूनच पाब्लोचा काटा काढण्याचे काम स्टीव्ह आणि हावी करत असतात, कोलंबियन सरकार विरुद्ध पुकारलेल्या अघोषित युद्ध आणि त्यामुळे केलेले भीषण कृत्य उदा. प्रवासी विमान पाडणे, भर चौकात गोळ्या घालणे, खुल्या बाजारपेठेत बॉम्बस्फोट घडवून आणणे अशी भयंकर कृत्ये करून ही पाब्लो निवडणुकीत उभा राहतो, आणि जिंकतो ही... 'चोर पोलिसांच्या नेहमी पुढे असतो २ पावले' हे किती खरं ठरू शकतं प्रत्यक्षात ह्याची खात्री पटते पाब्लोच्या एकूण प्रवासामुळे.

२०१६ मध्ये आलेल्या २र्ऱ्या सीजन मध्ये पाब्लोचे साम्राज्य वाढतच जात असते, आठवड्याला $420,000,000 इतके कमवायला लागलेला हा! म्हणजे जगातला सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एक होता तो १९९०च्या काळी. त्यावेळचेच काही विश्वास न ठेवता येण्यासारखे मजेशीर किस्से ही रंगवले आहेत, त्यातला एक लक्षात राहणारा म्हणजे, पाब्लो जेव्हा फरार होता तेव्हा तो आपल्या कुटुंबाबरोबर एका गुप्तस्थळी राहात होता, प्रचंड थंडी होती, आणि त्याच्या एका लहान मुलीला त्या थंडीपासून वाचवण्यासाठी तो चक्क पैशांची होळी करतो! अपेक्षेप्रमाणे त्याचा खात्मा ही होतो सीजन च्या शेवटी, तो अंत कसा होतो हे ही पाहण्यासारखं आहे.


आता सांगतो ३ऱ्या सीजन बद्दल, पाब्लोचा अंत झाला म्हणजे तिथे 'NARCOS' संपतं असं नाही...२०१५ साली प्रदर्शित झाली होती ही मालिका, आत्तापर्यंत ३ सिजन्स आलेले आहेत, प्रत्येक सिजनमध्ये १० एपिसोड्स असे तब्बल ३०, पण पहिले २० PABLO वर आहेत, ३र्ऱ्या सीजन पासून म्हणजेच मागच्या वर्षी पासून 'काली कारटेल' हे प्रकरण सुरु केलं आहे, पाब्लो ची क्रूरता ३-४ जणांनी वाटून घेतल्यावर किती भयानकता वाढू शकते कथानकाची ह्याचा विचार करायला लावणारा हा ३रा सीजन तर पहिल्या २पेक्षाही सरस आहे, आणि 'पाब्लोचा अंत झाल्यावर पुढे काय, आता मजा संपली' वगैरे वक्तव्यांना फुल्या मारल्या गेल्या आहेत अगदी सहज!


एकूणच 'NARCOS' ने निर्विवाद बाजी मारली आहे ३ही सिजन्स मध्ये!

#सशुश्रीके । ८/०२/२०१८

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!