राजी

काहीतरी दुःखदायक घटनेची बातमी ऐकली / वाचली असेन मी त्या दिवशी, आणि जरा संतापून/निराश होऊन मी एका मित्राला प्रश्न विचारला, का एक माणूस दुसऱ्या माणसाला मारतो! म्हणजे एका जिवाने दुसऱ्या जीवाला का मारावे? त्याने सहजच एक उत्तर दिले, म्हणाला... "तुझ्या मुलीला जर कोणी मारलं तर तू त्या व्यक्तीला काय करशील!?" मी चटकन प्रतिसाद दिला नाही, hmmmm केलं न शांत राहिलो, पण मानातल्यामनात त्या व्यक्तीला मारलं.

हा एक प्रसंग/प्रश्न/उत्तर मी कधी विसरणार नाही, खूप साधा आहे प्रसंग, पण खूप परिणामकारक, जर इतका साधा प्रसंग एखाद्याच्या मनात इतका खोलवर जाऊ शकतो, आणि काहीतरी असे घडवतो की त्याचा तुम्ही तिरस्कार करत असता... तर असे काहीसे घडलेल्या / अनुभवलेल्या व्यक्तीच्या मनावर तो काय परिणाम करेल!?
तुमच्यासाठी काय पण
पासून...
कुटुंबासाठी काय पण
धर्मासाठी काय पण
राष्ट्रासाठी काय पण
देशासाठी काय पण
असे वेगवेगळे 'काप पण' ची वेळ परिस्थिती नुसार प्रत्येकाच्या आयुष्यात कधीनाकधी येत असते.

सेहमतच्या (आलिया भट) आयुष्यात पण अशीच एक परिस्थिती येते, परिस्थिती का येते आणि त्या परिस्थितीला ती 'तुमच्यासाठी काय पण' ते 'देशासाठी काय पण' पर्यंत कशी नेते हा प्रवास म्हणजे 'राजी'
ह्यात 'तुमच्या साठी' म्हणजे हिदायत खान (रंजित कपूर), सेहमत चे अब्बा... आणि 'देशासाठी कायपण' म्हणजे सांगायची गरज नाही!

१९७१ साली पूर्व पाकिस्तान, भारत आणि पश्चिम पाकिस्तान मध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रंगलेला 'राजी' सिनेमा हा गुप्तहेर असलेल्या लोकांच्या जीवनाचा खराखुरा चेहरा आपल्या समोर मांडतो, त्यांना देशाकडून खुला सम्मान मिळणं अशक्यच, असे कित्येक गुप्तहेर जगात आपापल्या देशासाठी कार्यरत असतात, देशासाठी काहीही करायची त्यांची मनषा, सहनशक्ती, मर्यादा ओलांडून केलेले धाडस या सर्वांची अप्रतिम मांडणी ह्या चित्रपटात पाहायला मिळते. 

नुसती आलिया भटच नाही, तिचा ट्रेनर खालिद मीर (जयदीप अहलावत) ह्याने उत्तम अभिनय केला आहे, अजून एक छान भूमीका साकारली आहे ती अब्दुल नावाच्या नोकराने (आरिफ झकारिया) पण...

खटकतो तो तिचा नवरा इकबाल सईद (विकी कौशल) आणि सासरेबुआ ब्रिगेडियर परवेज सईद (शिशिर शर्मा) या दोघांनी अभिनय जरी कितीही चांगला केला असला तरी दोघांच्या कडून ते पाकिस्तानी असल्याची अदा येत नाही, म्हणजे त्यांची मातृभाषा उर्दू, ती जशी हवी तशी मांडता आलेली नाही, चेहरा मोहरा ही पाकिस्तानी ढंगाचा वाटत नाही, हे असे मोठे तर काही लहान सहान मुद्दे सोडले तर बाकी सर्व विभागात छान भट्टी जमली आहे. शंकर एहसान लॉय ने आधी पण अश्या देशभक्ती वर आधारलेल्या चित्रपटांत संगीत दिलेले आहे, उदा. लक्ष्य, चित्तगोंग नावाच्या सिनेमा साठी तर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे पण ह्या राजी मध्ये तशी जादू ऐकायला मिळाली नाही, शेवटी कुठलीच गोष्ट परिपूर्ण नसते त्यातलाच हा प्रकार. पण ह्यासर्वांवर मात करत एक सुंदर कथानक आणि मुख्य भूमिकाच्या जोरावर हा सिनेमा नक्कीच खूप पारितोषिके मिळवणार २०१८मध्ये हे नक्की! 

सध्या स्त्री प्रधान भूमिका असणारे चित्रपट धुमाकूळ घालत आहेत बॉलीवूड मध्ये, ह्या सिनेमा आधी मस्त वाटलेला तुम्हारी सुलू... आता अश्या लक्षात राहणाऱ्या सिनेमांमध्ये ह्याची एक भर! नक्की पहावा असा 'राजी'



#सशुश्रीके | १९ मे २०१८

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!