जुनं ते सोनं



आक्षी बद्दल किलोभर लिहून झालंय... काही सोडलं असेन असं वाटत नाही, पण तरी इतका जीव अडकलाय तिथं काय विचारायची सोय नाही, असं वाटतं एक पेरेलल जग असावं तिथं आपलं, म्हणजे कसं पटकन डोकावता यावं कधी ही कुठून ही.. अशी एक खिडकी नाहीतर दरवाजा.

घरी कधी नावडती भाजी किंवा काही खास मेनू नसेल की लगेच त्या दरवाज्यातून हळूच आत जायचं की वर्तमान बंद न भूतकाळ सुरू... आजी मला बघणार... हसणार! "आली का माझी आठवण, आज काय करू... पानगी की दडपे पोहे!?"मी मला बघणार... डोळ्यात माझ्या असली चमक जणू आजी नाही कुठला तरी तारा बघतोय!!!
 

आजी...

आजी काय सुंदर होती माझी आजी काय सांगू, किती सांगू! आई शप्पत सुंदर होती, अतीशयोक्ती नाहीच... ती बोलत नसली तर तिच्या बांगड्या बोलत असायच्या, विळीवर भाजी चिरताना... अंगणात शेण सारवताना... म्हशीला पेंढा घालताना... अखंड बांगड्यांचा आवाज... 'अगदी सराऊंड साउंड / डॉल्बी डिजिटल' कधी पुढून कधी बाजूने! त्या बांगड्या कधी थांबलेल्या आठवत नाहीच.

अशी ही ऑडिओ स्वरूपातली चरचरीत आठवण झोपेचा अलगद गोड खून करते.
हे आठवण प्रकरण, स्पेशली आजी आणि आक्षी... हे वाईट्ट कॉम्बिनेशन आहे, फार वाईट्ट.

ते हल्ली व्ही.आर. (व्हर्चुअल रीएलिटी) असतय ना ते झक मारेल इतकं जिवंत होतं हे सगळं!

मेंदू न हृदय ह्यांची गट्टी / भट्टी जमली की धूळ गंज वगैरे हे प्रकार अस्तित्वातच नसतात अश्या प्रकारे सगळं कसं लक्ख / स्पष्ट / स्वच्छ दिसतं.

म्हणायचं तर आपण जगतो हो रोज दिवसातले २४ तास, पण ह्या ज्या काही आठवणी काही सेकंद का होईना... खरं जगणं देऊन जातात. जशी ट्रेन हो! थांबत नाही काही स्टेशनांवर... काही मिली सेकंद पुरतात स्टेशनचं नाव बघायला... मग डोळे मिटायचे न उघडायचे, बंद करून उघडलेली वेळ, तो शेवटचा क्षण दिसतो! बघा कधी तरी ट्राय करून... केमेरा नसला की मी असं करतो, ती इमेज सेव्ह होते मेंदूत, परत आठवता येते! करून बघाच एकदा... म्हणजे मला तरी येते... तुमचा अनुभव मला नाही सांगता येणार.

एक शेवटचं आणि फार महत्त्वाचं... सुट्टी संपली की मुंबईत जाण्यासाठी जो वेळ लागायचा त्यासारखा वेळ कुठेच लागायचा नाही, २५-३० किलोचा जीव... त्यात टन भर निराश मन, आजीचे डोळे... हातात दिलेली नोट... हे सगळं आयुष्यात परत येणार नाही हे माहीतच नाही!

का इतकं छान छान देवाने दिलं मला आयुष्य!?? किती सुंदर... किती भरभरून प्रेम केलं देवाने माझ्यावर, त्याच देवाने आजीला नेलं... त्याच देवाने...

देव!?? असतो का जगात... नाहीच

आठवणी असतात, आठवणीच खऱ्या असतात, आठवणींतच सगळं असतं, त्याच घडवतात, उद्याचा काळ आत्ता आठवणी बनवतोय. ह्यातच सगळं आलं!

हे लिहिलेलं वाचून परत रमवेन हा जीव, अशी वेळ येऊच देणार नाही "की आता आठवत नाही!" उकरत राहायचं जुनं, लिहिणार असं खोदून खोदून...

शेवटी म्हणतात ना
"काय पण म्हणा जुनं ते सोनं!"
हेच ते! 😊



#सशुश्रीके | २०२१/०३/२०

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!