किस्सा किंगसर्कलचा

⛔ किस्सा किंगसर्कलचा ⛔
 .
रात्रीचे २ वाजले असतील, टैक्सीने मी आणि माझा मित्र निशांत ऑफिस पार्टी हून किंगसर्कलला आलो खुप दंगा आणि उन्हाळयातली रात्र त्यामुळे घामाघुम.. त्यात मी म्हणजे वातानुकूलित वातावरणातही ही घाम येणारा, पार भीजलेलो घामानी! त्यामुळे त्या गुलाम मधल्या आमिर खान सारखा रुमाल वगैर बांधून होतो, फुल फिल्मी मवाली दिसत असेन ह्यात शंका नाही!
निशांत रहायचा बोरीवलीत त्यामुळे म्हणालो रहा रूम वर उद्या जा निवांत! त्याआधी ज़रा गप्पा मारू वगैरे म्हणून किंगसर्कल जिमखन्याच्या आजुबाजुला टाइम पास करत आमच्या गप्पा चाल्लू. ऑफिस मधल्या  आणि इतर फालतू बडबड, खिदळणं वगैरे चालू होतं नेहमी प्रमाणे, वेळेचं वगैरेचं भान छ्या छ्या… ते काय असतं, असे ते दिवस!
तीतक्यात मागुन एक पोलिसांची बाइक एका बंगल्यापुढे येउन थांबली, मित्र म्हणाला 'समीर भाय, चल घर निकलते है!' मी म्हणालो आपण कुठे काय केलय का पोलिसांना घाबरायला! ५मिनिटांनी ते पोलिस आमच्या जवळ आले. संवाद असा...
"काय चाललैय... तुझं नाव काय.. ह्याचं नाव काय..." मी मराठी त्यामुळे उत्तरं मीच पुरवत होतो...
पुढचा प्रश्न येत होताच अपेक्षेप्रमाणे... "कुठे राहतोस?" मी उत्तर पुरवलं.. 'ब्राम्हण वाडी'
'ब्राम्हण वाडी' ऐकल्यावर हे जरा आवाजात नरमी आली, "बर बर चला घरी जा आता... किती वाजले... " वगैरे समज देऊन आम्हाला तिथून हकलवले. मी मित्राकडे बघून निघुयात चल अशी खूण केली आणि शांतपणे ब्राह्मणवाडीच्या दिशेने निघालो, पण जरासं पुढे गेलो तर बाइकचा आवाज यायला लागला! निशांतने हळूच वळून पाहीले तर दोघे पोलिस हवलदार हातात वौकी-टोकी आणि बाइक वर आमचा मागे येत होते हळु हळु.
आम्ही एकमेकांकडे 'ही काय भानगड आता!??' असा चेहरा करत चालत राहिलो, वाडीत घुसलो...
तरी ते होतेच मागे, आमच्या खोलीपाशी आलो, आमचे शेजारचे गानु काका जागेच होते, मला अणि निशांतला पाहिलं आणि आमच्या मागे पोलिस! हे पाहून त्यांना काय कळेना काय प्रकार चाललाय! त्यातच त्या वॉकीटॉकी तुन पोलिसांची बडबड... 'अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक मुलं...' असं तसं रिपोर्टिंग चाललेलं! तो आवाज ऐकून वाडीतले अर्धवट झोपी गेलेले जीव पूर्ण जागे होउन घडतोय तो प्रकार बघायला बाहेर!
माझ्या खोलीत ३जीवांपैकी २जीव जागे झाले, नीलम आणि प्रसाद आणि ३रा जीव (सुजित) कुम्भकरणाकडून वरदान मिळाल्यासारखा साखरझोपेत विलीन होता.. असो!
काका पोलिसांपाशी गेले, त्यांनाही प्रश्न विचारले पोलिसांनीे, आम्हाला ऐकू येत होतं सर्व
काका सांगत होते... 'समीर इथे गेले २वर्ष राहतोय...
चांगल्या घरातली आहेत मुलं, हां त्याचा मित्र पण येउन जाऊन असतो' हा सगळा प्रकार चालला १०-१५ मिनीटं, शेवटी त्या वौकीटॉकी वरून बड्या साहेबांकडून हिरवा कंदील मिळाला आणि तेहकीकात संपली. मग सगळे अर्धवट झोपेतले जीव आपल्याआपल्या घरी गेले.
आता आज तर खरी मजा होती, वाडीत रात्री काय झाले ह्याबद्दल चर्चा! कशीबशी झोप लागलेली, गजर होण्या आधीच उठलेलो. दरवाजा उघडला, गानू काका पेपर वाचत बसलेले. माझ्याकडे बघता बघता पेपर बाजूला ठेवत आणि मस्त स्माईल देत काका म्हणाले "अरे काही काळजी नको करूस, नंतर असे कळाले की तुम्ही जिथे बसलेले काल रात्री, तिथे एका पोलिटीशनचा बंगला आहे आणि त्याला म्हणे अंडरवर्ल्ड कडून धमक्या किव्वा असाच काही तरी प्रकार आहे त्यामुळं तीथं पोलिस गस्त असतेच, त्यात तुम्ही अपरात्री तिथे गप्पा मारत होतात त्यामुळे हा सर्व प्रकार घडला! काळजी नसावी"
ही सर्व चर्चा चालू असताना दरवाज्यातून डोकावून आणि आमच्या कडे बघत कुंभकर्ण वरदान प्राप्त झालेला सुजीत तोंडातला ब्रश काढत म्हणाला "काल रात्री काही झालं का!?"
#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...