डांबर, सिमेंट की चिखल?

आपलं मन कसं असतं माहित्ये का, उगाच तुलना करावीशी वाटली म्हणून असेल पण...अगदी सेम असच असतं मन...

कडक उन्हातल्या डांबरा सारखं
कच्च्या सिमेंट सारखं,
झालच तर सारवलेली जमीन
किंवा चिखलासारखं

अश्या ह्या गोष्टी जेव्हा प्राथमिक कक्षेत असतात तेव्हा त्यांवर चुकून / मुद्दामून कोणाचेतरी पाय.. वाहनांचे टायर इ. गोष्टींचे ठसे येतात. मुद्दामून जड गोष्टी सांगतोय बर का, हे लोकांनी टाकलेले कचरे, पिचकाऱ्या वगैरे टिकत नाहीत.

मला अजून ही अशी ठिकाणे लक्षात आहेत जिथे लोकांच्या पायाचे किंवा चपला, बुटांचे ठसे बांधकामाच्या वेळेला जे चुकून किंवा मुद्दामून झालेले... ते अजून ही तसेच आहेत, रस्त्यावरच्या गरम झालेल्या डांबरावरून गेलेल्या एसट्या इतर वाहने, बैलगाडीच्या चाकाचे... बांधकामाच्या ठिकाणी केलेला कोबा त्यावर पडलेले पाय, किंवा तत्सम काहीही...

असे हे ठसे... किंवा घाव!

राहत नाहीत जास्त काळ ते फक्त चिखलावरचे,
चिखलच की हो तो! एकदा झाला की फार काळ टिकत नाही तो, एक तर त्याची माती होते किंवा परत चिखल! त्यात ठश्यांचे काय कौतुक!?

आपल्या जीवनात पण असच असतं की, कोणाची मनं डांबरा सारखी तर कोणाची सिमेंट तर कोणाची चिखला सारखी.

कोणी घाव आयुष्यभर विसरत नाहीत,
कोणाचे घाव वितळून जातात,
कोणाचे ठिसूळ होतात कालामानाने
आणि काही घावात मिळून मिसळून जातात.

आयुष्यात असेच ठसे (Impressions) आपल्यावर कळत नकळत घडत असतात, आपलं मन तेव्हा कुठल्या स्वरूपात असेल त्यावरून ते ठसे किती टिकणार हे ठरलेलं असतं!

आता उदाहणार्थ म्हणजे १९९२ साली गरम गरम ताज्या डांबरी रस्त्यावर रहमानची रोजाची कैसेट पडली, त्याचं impression अजून ही तसच आहे, नंतर खुप कैसेट्स आल्या, सिड्या आल्या, आता युएसब्या आल्या, पडतात... कधी चिकटतात, काही तर फुटतात! आता तो रस्ता कच्चा नाहीये... जुनाय आणि जसा आहे तसाच झक्कासे!

ही झाली सकारात्मक बाब, वाईट गोष्टीही असतात, पण राहूदे, त्या गोष्टी मन चिखलांच्या स्वरूपात असताना का नाही झाल्या असा विचार येतो! म्हणजे टिकून टिकून किती टिकणार ब्वा!?

पण नाही...

असं कसं, वाईट का विसरायचं, वाईट विसरलो तर चांगल्याशी तुलना कारायला कसं जमेल!

आता म्हणाल "मेरे भाय, आखीर केहना क्या चाहते हो!?"

तर माझं म्हणणं असं की 1st impresssion is last impression ही म्हण चुकीची आहे ते impression तुमच्या त्या त्या वेळच्या मनावरती (मनस्थिती) वर अवलंबून आहे.

कोणाचं डांबरी, कोणाचं सिमेंटचं तर कोणाचं चिखली!

#सशुश्रीके २१.०८.२०१८

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...