कॉल फ्रॉम दुबई...

कॉल फ्रॉम दुबई...

पुणे-मुंबई-पुणे करायचो ६महिन्यापूर्वी, आठवडा भर शुक्रवारची वाट बघायची, रात्री-अपरात्री पुण्याला निघायचं, आणि सुखाचे २ दिवस संपवून सोमवारी सकाळी सिंहगड एक्सप्रेस+लोकलनी परत नोकरीसाठी मुंबापुरी! गेले अडीच हेच चालू होते! तरीही वैतागलो नसलो तरी खुश मात्र नक्कीच नव्हतो.

त्याला कंटाळून मुंबईत स्थाईक झालेलो, बऱ्यापैकी सवय झालेली मुंबईत राहायची, आई, मी आणि बायको! अजुन काय पाहिजे आयुष्यात!? त्यात रोज घरचे जेवण... बस स्वर्गसुख! जोगेश्वरीत मामाच्या फ्लैट मध्ये राहायचो त्यामुळे तो ही एक महत्वाचा विषय संपलेला, कारण मुंबईत घर मिळणे आणि ते टिकवणे महा कठीण, पगार जास्त नव्हता पण बायकोही नोकरी कारायची त्यामुळे जागा भाडे आणि बाकीचे खर्च वगैरे धरून बरच चाल्लेलं एकंदरीत.
आई पुण्यात असायची तेव्हा पुण्यात असायचो साप्ताहिक सुट्टीत, आता मात्र महिन्यातून एकदा पुणेवारी व्हायची, असाच एक मुंबइया शनिवार का रविवार होता, नक्की आठवत नाही, दुपारच्या जेवणानंतर काहीसा अहारलेलो, तेवढ्यात मोबाईलची रींग वाजली. नंबर पाहिला, परदेशातला होता, मला कळेना नेमका कुठला!? तेव्हा त्या 'फ्रॉड कॉल्स' चे प्रस्थ पण चालू होते. जरा नाखुशीनेच कानाला लावला मोबाइल. समोरून विचारपुस, समीर केतकर बोलतोय का!? माझे नाव शेहजाद, आणि मी 'डी-सेवन' नावाच्या दुबईतल्या डिज़ाइन स्टूडियो मधून बोलत आहे, आम्हाला तुझा नंबर 'कॉरोफ्लोट' नावाच्या संकेतस्थळा वरून मिळाला. आम्ही सध्या 'ग्राफिक डिज़ाइनर'च्या शोधात आहोत. तुझी कामे आवडले, तू आमच्या कामासाठी योग्य आहेस. तू भारतातून दुबईत यायला उत्सुक आहेस का!? मी तेव्हा 'हो! का नाही!?' असे बोलून मोकळा झालो, आम्ही तुला २दिवसांनी परत कॉल करू, नीट विचार कर. त्यानी मला कामासंदर्भात बाकीचे बारकावे दीले आणि परत बोलु २दिवसांनी असे सांगत फोन ठेवला. हे सगळे ऐकून झाल्यावर मला काही कळेना की काय कारावं! एक तर कधीच कुठल्या कंपनी कडून असा फोन आलेला नव्हता, आला तो पण परदेशातून, थेट दुबई! आइला, बायकोला सांगितले, दोघांनही प्रसन्न मुद्रेने झालेल्या गोष्टीवर आनंद व्यक्त केला! मग मला धीर आला.

२दिवस गेले, मी दुबईच्या राहणीमानाचा अभ्यास केला, पैसे किती पुरतील, किती वाचवु शकेन वगैरे हिशोब करून अमुक अमुक मिळाल्या शिवाय 'हो'म्हणायचे नाही

ऑफिस मध्ये गौतमला सांगितले, आमची ४जणांची टीम होती त्यातला एक गौतम, चहा प्यायला खाली जायचो तेव्हा त्याला सांगितले की असा असा कॉल आलेला, तो पण जाम खुश, म्हणाला सहीच, म्हणाला जास्तीत जास्त काय होईल तुला काम आवडले नाही किंवा काही प्रॉब्लम आलाच तर परत ये, इथे परत जॉब मिळायला तुला कधीच प्रॉब्लेम येणार नाहीये! ह्या सर्व संभाषणात अपेक्षेप्रमाणे कॉल आला दुबईहून, पण ह्यावेळी शेहजादनी हाय हेल्लो करत थेट मालकिणी कडे फोन दिला, तीने पगारा संदर्भात आकडा विचारला, मी सांगितला, तीने 'नो प्रॉब्लम' केलं मग मी ही तेच! पुढचे संभाषण शेहजाद बरोबर 'जोइनिंग डेट' वगैरे साठी.

झालेला प्रकार कळवला माझ्या ऑफिस मित्रांना मग माझ्या बॉसला, मकरंद पाटिल आणि विजय लालवाणी असे २बॉस होते, मकरंद 'आर्ट' आणि विजय 'कॉपी', मकरंद जाम खुश झाला ऐकून, म्हणाला बिंदास जा, मागे वळून बघू नको वगैरे, मला भीती वाटत होती विजयची...त्या विजय समोर माझी नेहमी 'हार' व्हायची! सिंधी साला, जाम खडूस होता, वचावचा बोलायचा, जरा सटकुपण होता, माझं आणि त्याचं खुप वाकडं होतं, मी मकरंदला म्हणालो, 'तू कल्पना देउन ठेवशील का, तो विजय चावेल मला!' मकरंद हसला म्हणाला मी कल्पना देइन, काळजी करू नकोस... पण त्याला जाऊन भेट आणि नीट सांग, वगैरे वगैरे धीर देत मला त्यानी विजय कडे पाठवले. विजयला झालेला प्रकार कळवला, अपेक्षेप्रमाणे तो मला शाब्दिक चावला, मी माझा निर्णय कळवला, तो नाखुश होता पण मी ठरवले होते की आता निर्णय बदलायचा नाही. लोकं दोन्ही बाजुनी बोलतील, शेवटी निर्णय आपणच घ्यायचा असतो वगैरे मनातल्या मनात पूटपुटत ऑफिस मधून बाहेर पडलो.

आता मनाच्या तयारी नंतर प्रत्यक्षातली तयारी सुरु झाली.. महिनाभरचा वेळ होता, महत्वाची कामे आटपायची होती, कमी जास्त प्रमाणात 'टेंशन' होतेच! पुढे काय!?
'भाग २' आणि काय!

(क्रमशः)

#सशुश्रीके | १५ जुलै २०१५ सकाळचे ६.४८
----------------------------------------------------------------------------------------------------------
कॉल फ्रॉम दुबई - भाग २
गुगल साहेबांकडे गेलो! दिलेला पत्ता बघून मैप पाहिला, जवळच सीएनएन व ईतर ख्यातनाम एडव्हर्टायझींग अजेन्सीजच्या ईमारती, हिरवा परिसर, तलाव/कारंजी वगैरे! मीडिया सिटी नाव होते परिसराचे. जागातीक आणि स्थानिक दुरदर्शन कार्यालये, एवेंट्स, रेडीओ स्टेशन्स वगैरे कार्यालयांची एक समृध्द कॉलनीच! मी इथे जाउन काम करणार ह्या कल्पनेनीच भीती + आनंद + उत्सुकता ह्यांची भेळ झालेली डोक्यात! २००७ ची गोष्ट आहे, तेव्हा ओर्कुट नावाच्या सोशल नेटवर्कची चलती होती. ओर्कुट वर जाउन पुणे, मुंबई - दुबई असे दुवे असणारे लोक शोधून त्यांना संदेश पाठवायला सुरुवात केली, कारण अनोळख्या देशात जाउन कोणीच ओळखीचे नसणे हा विचार मला सतत छळत होता अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. 

अमित मते नावाचा एक नागपूरचा मित्र झाला, त्याचाशी काही दिवस याहू कधी ओर्कुट वरून 'चैटिंग' करून बर्यापैकी दुबई बद्दल माहिती काढली. माझे तिकीट आले, कैथे-पेसीफीक नावाच्या विमानाचे तिकीट होते, तसा परदेशाचा प्रवास मला काही नवीन नव्हता, वडील दोहा-कतार मध्ये नोकरीच्या निमित्तानी १४ वर्षे होते, त्यात माझा जन्मही तिथलाच, त्यामुळे विमान प्रवासाचे काही अप्रूप नव्हते! फक्त इतकेच की खूप कालावधी नंतर विमान प्रवास घडणार होता. पासपोर्ट रेडी, ब्याग रेडी. पुण्यात जाउन वडीलधार्या माणसांचे आशीर्वाद, मित्रांच्या गलेभेटी वगैरे झाले! एका मित्रानी (प्रदीप येरागी) तर मला पाककला विषयावर एक पुस्तक गिफ्ट दिले! खूप आठवणी घेऊन परत मुंबईत आलो. दुबईला जाणार मी, परत भेट कधी होईल, किमान वर्षभर तरी नाही, कसा राहीन मी एकटा ह्या सर्व विचारांनी आई आणि बायको दोघे चिंतेत असूनही दाखवत नव्हत्या हे जाणवत होते अधून मधून. 

३० मे ला रात्री गाडी काढली, बांद्राच्या 'हवाईयन शैक' नावाच्या नाईट क्लब ला गेलो मी आणि बायको, मी एडव्हर्टाईजिंग क्षेत्रात असल्याने नाईट क्लब वगैरेला महिन्यातुन एकदा जाणे व्हायचेच, बायको कधी गेली नव्हती म्हणून तिथे गेलेलो, तिथे छान पोलोरोइड फोटो काढला, हो अगदी 'दिल चाहता है' मधल्या 'कोई कहे केहता रहे' गाण्यात दाखवलाय तितका भारी क्लब नव्हता पण थोडक्यात मजा, अजून ही आठवतय! मध्यरात्री घरी आलो.
३१ मे उजाडला, सकाळी पूजा वगैरे केली, बाबांच्या फोटोला नमस्कार केला, आई मला सांगत होती, दुबईत गेल्यावर सारखा सारखा बाहेर जेवत जाऊ नकोस, आई कुकर लावताना व्हीडीओ वगैरे घेतला मी (नंतर तो आयुष्यात आत्ता पर्यंत पाहिला नाही ती गोष्ट वेगळी) मग मनसोक्त आमटी-भात जेवलो. जोगेश्वरीत राहणाऱ्या २ही मामांच्या कडे गेलो, नमस्कार चमत्कार झाले. दुपारचे विमान होते थेट दुबईचे. सचिन भावे (माझा मामे भाऊ) मला विमानतळावर सोडायला येणार असे ठरले. ३०किलो बैगेचं वजन आणि त्याहुन डबल माझ्या मनाचं, दोन्ही घेऊन आई आणि अमृतासोबत गाडीत बसलो. 

(क्रमशः)

#सशुश्रीके | १५ जुलै २०१५ रात्रीचे ११.५४




----------------------------------------------------------------------------------------------------------

कॉल फ्रॉम दुबई - भाग ३

इतकेही स्पष्ट आठवत नाही कारण खुप विचारांची मंडई झालेली तेव्हा, माझा मामे भाऊ, सचिन आला आल्टो घेऊन, माझ्या २ब्यागा, मी आई, अमृता आणि ड्राइविंग सीट वर सचिन. ट्रैफिक होतं बऱ्यापैकी, संध्याकाळ ६ची फ्लाइट होतं, वेळेत निघालेलो त्यामुळे वेळेतच पोहोचलो, मध्ये मध्ये फोनही वाजत होते, काही वेळेला फोन चालू असताना फोन येत होते. 

आलं, विमानतळ आलं! ट्रॉली आणली, मित्र यायला लागले भेटायला, फोन चालूच होते, विमानतळावर माझ्यासारखे लोक आलेलेच आणि त्यांचे नातेवाईक, मित्र... त्या स्टीलच्या रॉड वर हनुवटी टेकवून ते सर्व पहात होतो मी, मध्येच फोटोही घेत होतो, जितेंद्र पाटिल नावाचा मित्र आलेला, आणि माझा साला चैतन्य गोगटे, फीदीफिदी हसणं, विनोद, बडबड चाललेली. शेवटी निघालो, वेळ झालेली, परत गलेभेटी आणि नमस्कार चमत्कार करत निघालो, आई आणि अमृताला पापण्या झापुन फोटो काढल्यासरखे क्षण जप्त करत निघालो. इमिग्रेशन, चेक इन वगैरे सोपस्कार. तो बाय बाय करणारा हात नकळत कधी पासपोर्टच्या पानांत घुसला कळालच नाही. 

असो, अमृतच्या मित्राचा ओळखीचा मुम्बई एअरपोर्ट वर कस्टम/एअरपोर्ट अथॉरिटी मध्ये होता, त्यानी माझे साधे टिकिट पहिल्या श्रेणीत करून देईल असे म्हणालेला आणि ते मी साफ विसरलेलो, बोर्डिंग पास आल्यावर मी जागा काय आहे ते पाहिले ही नाही, हवाईसुंदरी मला प्रथमश्रेणी खुर्चीवर घेऊन गेली! परमानंद, परदेशात जाण्यासाठी विमानाचा तरूण वयात पहिल्यांदाच प्रवास आणि तो ही प्रथम श्रेणीचा, ते जड मन हलके व्हायला सुरुवात झालेली... मस्त पाय पसरुन दिमाखात प्रावास होणार ह्या कल्पनेनी. त्यात बाजूला बसलेला इसम कोणी बिजिनेसमन निघाला, मराठी बोलणारा, म्हणजे मराठीच पण सुरुवात इंग्लिश मग नाव काळाल्यावर 'मग दुबइत काय काम काढलत... वगैरे चर्चा सुरु!

तसे वेळेत सर्व प्रवासी वेळेत होते विमानात त्यामुळे वेळेत निघेल अशी अपेक्षा , पण उड्डाण कारायला १५-२०मिनिटे उशीरच झालेला,  दुबई जस जसे जवळ येत होते तस तसे उत्सुकता शिगेला पोहोचत होती, कोण असेल घ्यायला आलेले आपल्याला आणि गडबड तर नाही ना होणार कारण दुबइत वीजा बद्दल खुप कडक शासन आहे, ह्या सर्व प्रश्नांची रांग लागलेली... विमान अर्धा पाऊण तास उशिरा उडालेले तरी बऱ्यापैकी वेळेत पोहोचले, बैगेज क्लेमला वेळ लागला असावा अपेक्षित वेळे पेक्षा जरा उशीराच बाहेर आलेलो विमानतळाच्या बाहेर. माझ्या नावाची पाटी घेऊन एक इसम उभा होता, गळ्यात टाय, गोरागोमटा, चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह, हातात माझ्या नावाची पाटी, दिसायला भारतीयच वाटत होता, पण काय सांगता येत नाही पाकिस्तानी म्हणून सुद्धा खपेल असा, पण टापटीप! मी त्याला हात केला, त्यानी मला 'समीर!?' असे विचारले, मी हो म्हणालो, ट्रॉली मी आणि तो टैक्सी पाशी गेलो, जाता जाता मला विचारले, कशी होती फ्लाइट, काही त्रास झाला नाही ना वगैरे! मी आपले कमीत कमी शब्दात हसत उत्तर दीले, छान झाला प्रवास! टैक्सी वल्याला त्यानी 'करामा' सांगितले.

मला घरी कळवायचं होतं की मी वेळेत सुखरुप पोहोचलोय, अर्थात माझा फोन बंद होता, मी त्या माणसाला म्हणालो की मी तुझा फोन घरी एक कॉल कारायला वापरु शकतो का!? त्यानी लगेच त्याचा फोन मला दीला, मी खुशहाली कळवली, घरी बोलताना मी मराठीत बोललो, ते ऐकून तो चमकला, हो हो चमकलाच म्हणजे त्याला लपवताच आले नाही!

त्यानी मला विचारलं, 'अरे तू मराठीत बोलालास, तू पाकिस्तानी नाहीस!?'

(क्रमशः)

#सशुश्रीके | १८ जुलै २०१५ सकाळचे ९.२६
--------------------------------------------------------------------------------------------------------

कॉल फ्रॉम दुबई - भाग ४
हां... तर कुठे होतो मी!?... दुबईच्या टैक्सीत, दुबईतला पहिला  प्रवास, एअरपोर्ट टू 'करामा'
माझा घरी फोन झाला, अर्थात खुशहाली मराठीत कळवली, हे ऐकून (अजुन मी जो मला घ्यायला आलेला त्याचं नाव विचारलं नव्हतं) त्यानी मला विचारलं, 'अरे तू मराठीत बोलालास, तू पाकिस्तानी नाहीस!?' आणि हा प्रश्न चक्क मराठीत!
मी म्हणालो "अरे मी मराठी आहे, मुंबईत जॉब आणि पुण्याला घर" त्याच्या चेहर्यावर जो काही आनंद झळकलाय!
तो म्हणाला "ल्लेे! काय संगतोस, माझं नाव राहुल जयवंत... मी दादर, शिवजी पार्कचा" हे ऐकून मी प्रश्न विचारला, म्हणजे मला राहवलच नाही "तुला असं का वाटलं की मी पाकिस्तानी आहे!?" त्यावर तो म्हणाला की तू मेल मध्ये +92च्या पुढे तुझा मोबाइल नंबर दीलायस, +92म्हणजे पाकिस्तानी नम्बर,आणि त्यात तुझे नावही मुस्लिम" हे ऐकून मलाही क्षणभर कळे ना... की मग मला कॉल कसा केला ह्या लोकांनी बरोबर!? त्यांच्यातल्या त्यांच्यातच कोणीतरी +91च्या ऐवजी +92चा गोंधळ घातला असणार असा तर्कवितर्क लावे पर्यंत 'करामा' आले सुद्धा! रात्रीचा १-दीड वगैरे वाजले असणार, सर्वांची झोपायची वेळ. टॅक्सीतुन सामान उतरवुन राहुल नी पैसे देऊन बिल वगैर घेतलं. आणि आम्ही एका 'रहा रेसिडेंस' नावाच्या बिल्डिंग मध्ये घुसलो. (नाव ऐकून हसु लेलं मला, असो!)
२ऱ्या का ३ऱ्या मजल्यावर एका दरवाज्याकडे आणि मोबाईल वरच्या पत्त्या कडे बघत रहूलने बेल वाजवाली, एका अंधाऱ्या पैसेज मधून एक माणूस डोळे चोळत अणि लुंगी सांभाळत आला, साउथ इंडियन असावा, आम्ही आत घुसलो, एका खोलीत त्या माणसासरखेच ३-४इसम झोपलेले, ते बघुन राहुलची हटलीच! तो म्हणाला चल बाहेर चल, बाहेर पडल्या पडल्या त्यानी बहुतेक त्यांच्या जागेच्या एजेंटला फोन लावला, म्हणाला की आम्ही बेड स्पेस नाही शेयरिंग साठी तुला जागा बघायला सांगितली आहे, तू आत्ताच्या आत्ता शेयरींग असणारी जागा सांग! असा दम भरून फोन ठेवला, आणि परत फोन येई पर्यंत आम्ही तळ मजल्यावर येऊन थांबलो.
तेवढ्यात एक फिलिपिनो बाई आली, तिच्या हातात एक मोठी प्लास्टिकची बैग होती, त्यात ब्लैंकेट, चादर वगैरे गोष्टी होत्या. ती आपल्या कंपनीची केअर टेकर आहे असे सांगून राहुल झालेल्या प्रकाराबद्दल सांगायला लागला. मला काय करावे कळेना. मी शांत पणाचा आव आणून गुपचुप त्या एजेंटच्या फोनची वाट पाहत उभा होतो. राहुलचा फोन वाजला...
(क्रमशः)
#सशुश्रीके | १९ जुलै २०१५ रात्रीचे ११.५४
--------------------------------------------------------------------------------------------------------

कॉल फ्रॉम दुबई - भाग ५

राहुलचा फोन वाजला, राहुलने फोन उचलला, मला कळू नये की कोण जाणे, राहुल जरा लांब जाऊन बोलायला लागला. तेवढ्यात त्या फिलिपिनो बाइने ती पिशावी मला दिली, म्हणाली "हे कंपनी तर्फे, माझं नाव मारिसेल... आपण भेटुच ओफ्फिस मध्ये!"

राहुल आला, तो मला म्हणाला की एजेंट स्वतःच येत आहे, २बिल्डिंग सोडूनच एक बिल्डिंग आहे त्यात शेअरींग साठी एक रूम मध्ये एका माणसाची जागा आहे, तिथे जाउ. १०मिनिटांनी तो एजेंट आला, पंजाबी असावा, पण पगडी-दाढी नसलेला... ६फूटी, आल्या आल्या राहुलला म्हणाला "सॉरी दोस्त, कुछ गलतफेमिली हो गयी होगी, चलो आपको आगे वाले बिल्डिंग मे ले चलू" आम्ही सर्व त्याचा मागे, तो पुढे, आता २ वाजले होते. पण झोपेचा अंश नव्हता चेहऱ्यावर माझ्या आणि त्यांचाही.

असो… बिल्डिंग बर्यापैकी नवीन असावी, आम्ही लिफ्ट ने २रा मजला गाठला, एजेंटने त्याच्या कडे असलेल्या डझनभर चाव्यांपैकी एकानी दरवाजा उघडला, असला थंड हवेचा लोट आला अंगावर, अतिशय थंड होता एसी... घरात घुसताच उजव्या बाजूला एक फोल्ड़ेबल दरवाजा होता, म्हणजे आडवे शटर प्लास्टिकचं. आणि डावी कडे ३ दरवाजे तिन्ही बंद, त्यातल्या पहिल्या दरवाज्याची किल्ली लावून त्या एजेंटनी मला वेलकमची खूण करत आत बोलावले. २ बेड २टोकांना, टोकांना नाही म्हणता येणार, तितकीही मोठी रूम नव्हती म्हणा, २बाजूला २बेड होते, एक भिंत अक्खी कपाटानी झाकलेली, मला गुडनाइट वगैरे करून सर्व मंडळी निघाली. राहुलने त्याचा आणि ऑफिसचा नम्बर असलेले त्याचे कार्ड दीले, आणि काही हवे असल्यास फोन करायला सांगितला.

मी अश्या वेळी आलेलो जेव्हा गुरुवार संपून शुक्रवार चालू झालेला, म्हणजे सुट्टीचे २दिवस, बहुतांश अरबिक प्रांतात शुक्रवार-शनिवार सुट्टी असते, त्यामुळे मला कार्यालयात रुजू व्हायला २दिवस होते, मधले २दिवस काय करायचे ह्याचा विचार करत रूमचे दार बंद करून मी खाली रस्त्यावर आलो, जरा चालत आजुबाजुचा परिसर पहावा ह्या उद्देशानी.

कोणी कुत्र नव्हतं रस्त्यावर, पण १सुपरमार्केट उघडे होते, बाहेर '२४तास उघडे' नावाची पाटी झाळाळत होती, रास्ता ओलांडून मुख्य रस्त्यावर गेलो, कतार मध्ये लहानपणी फीरताना जो काही 'फील' यायचा तसाच काहीसा येत होता, प्रचंड 'ह्यूमिडिटी' पण मजा येत होती, मनातल्या मनात बाबांशी बोलत होतो, त्यांना म्हणालो... "चांगलाच बूमरैंग झालाय... जन्म कतार, शिक्षण मुम्बई-पुणे, आता नोकरी साठी दुबई... माझं मिडल ईस्ट किन्नेक्शन काय सुटेना!" बाबा पण हसत हसत म्हणाले असतीलच "टेक केयर"

(क्रमशः)

#सशुश्रीके | २१ जुलै २०१५ सकाळचे १०.२६












--------------------------------------------------------------------------------------------------------

कॉल फ्रॉम दुबई - भाग ६

रात्रीचे अडीच वाजलेले, अर्धा किलोमीटर चालून गेलेलो, एक सिग्नल आला, तिथून वळालो... बैक टू न्यू प्येवलियन! नवीन दिलेली चादर आणि ब्लैंकेट घेऊन, बाहेरच्या गरमीतुन थेट थंडीत... -वळवंतातून थेट हिमालयात- इतकी होती थंडी! झोपायचा असफल प्रयत्न सकाळी ५च्या आसपास सफल झाला असावा, ८ला जाग आली. बैग उपसली, लागणारे नित्यनियमाचे साधन, क्रिया करून एका महत्वाच्या गोष्टीसाठी हात बैगत गेला, बाबांनी ८०सालच्या आसपास कतार मध्ये जो गणपति नेलेला तो मी आणलेला... त्या मुर्तीला पाहुन जे काही प्रसन्न वाटलय, इतकी देखणी आणि सुबक मूर्ती मी आजतागायत पाहिलेली नाही (आपला तो बाप्या... असं म्हणालात तरी चालेल) असो… कसंबसं कुडकुडत अथर्वशीर्ष म्हंटले.

माझ्या रूमचा दरवाजा उघडला, बाजूच्या दरवाजा खटकवला, म्हंटलं बघू तरी कोण शेजारी आहे आपला! दरवाजा उघडला एका बुटक्या माणसानी... मी त्याला माझी ओळख करून दिली, तो म्हणाला माझं नाव संदेश... संदेश पोतकर. झालं... हा ही माणूस मराठी निघाला!!! दुबईत फ्लाइटमध्ये बसल्यापासूनचा हा ३रा इसम जो मराठी! त्याच्याशी गप्पा मारता मारता कळलं की त्यानी २दिवसांपूर्वीच एक सेकंड-हैण्ड होंडा एकॉर्ड घेतली आहे, आणि दुपारी तो अबूधाबीला मित्राला भेटायला वजा 'लौंगड्राइव' म्हणून जाणारे, सांगताना म्हणाला तुला यायचे असेल तर ये... तेव्हढच तुझं अबुधाबीला जाणे होईल! मी काय नाही म्हणणार, नवीन देशात कोणीच ओळखीचे नसताना असे कोणी भेटणे आणि विचारणे, सगळं अजबच! त्याच्याबरोबर एक मल्लू मित्रही होता, तो मी आणि संदेश निगालो अबूधाबीला.

माझ्याकडचा फोन कैमरामधून फोटो काढत होतो, दुबइतला पहिलाच दिवस आणि मी अबुधाबीत, दुबई पासूनच अखंड रस्त्यात निरनिराळ्या 'सुपरकार्स' पाहुन माझा तोंडाचा 'ऑ' होणे थांबत नव्हते, एका पेट्रोलपंपावर थांबून आम्ही पोटपूजा आटोपली... माझे यूऐई मधले पहिले-वहीले 'जंक-फूड' हाणत आम्ही अबुधाबीकडे निघालो.
अबुधाबी मधल्या त्या उंच इमारती बघुन मान दुखायला लागलेली, आणि फक्त वेबवर बघायला मिळणाऱ्या गाड्या रस्त्यावर दिसत होत्या, काढून काढून किती फोटो काढणार!? मी फोटो न काढता नेत्रसुख घ्यायचे ठरवले. संदेश एका मित्राकडे घेऊन गेला, फॅमिली वालाच होता, जरा बोर झालेलो पण रूमवर बसून बोर होण्यापेक्षा बरं, तिथून आम्ही परत दुबईला निघालो संध्याकाळी.

घरी येई पर्यंत माझा फोन गंडला! स्क्रीन वरचे पीक्सेल्स आपापल्या जागा सोडायला लागलेले, तसा तो फोन मुंबईहून दुबईला निघतानाच आजारी पडलेला, तेव्हाच मला त्या फोनचे भवितव्य धोक्यात आले आहे हे जाणवले होतेच, असो… आणलेल्या मोजक्या दिर्हाम्स मधून मला हवा तो फोन घेता येणार होता, फोन तर हवा होताच... 'खाईन तुपाशी नाहीतर उपाशी' आणि उपाशी राहून चालणार नव्हतं, म्हणुन माझ्या फोनच्याच सारखा पण त्याचे पुढचे वर्जन असलेला सोनी W850i घेतला जाऊन. जाम खुश, घरी येताच गाणी टाकून वगैरे टाइमपास सुरु झाला... एकूणच मस्त गेला दिवस! त्या दिवशीही जरा अशांत झोप लागली.

शनिवार उजाडला. घराची आठवण यायला लागलेली, काही तास आठवणीत गेले, एकटाच होतो, डोळे ओले होत होते... गेले ७-८ दिवस आठवत होते. जरा देवाचे नामस्मरण केले, बरे वाटले. रूम मध्ये टीवी होता पण त्याला केबल कनेक्शन नव्हते, संदेश कडे लैपटॉप होता, त्यावर जरा टाइमपास केला. संध्याकाळी काय करायचे मोठा प्रश्न होता, संदेशला गेल्या दीड दिवसात कळून चुकलेले की मला गाड्यांचे प्रचंड वेड आहे, त्यानी मला शेख झाएद रोड वरच्या एका शोरूमला नेले, मष्टांग-फेरारी-रेंजरोवर वगैरे एक-से-एक गाड्यांनी भरलेल्या शोरूम मध्ये तासभर कसा गेला कळालेच नाही!

रात्री एका साउथइंडियन रेस्टोरेंट मध्ये जाउन घरी आलो, उद्या ऑफिस होते. मनात धाकधुक सुरु झाली, कसे असेल ऑफिस? तिथले लोक... काम…बॉस्स!? त्यात बॉस्स एक बाई! आयुष्यात एकदा बाई असलेल्या बॉस्स कडे काम केलेलं, पण अनुभव काही चांगला नव्हता! ह्या सर्व विचारांच्या मंडईत त्या रात्रीही झोपेचे खोबरे झालेले!

(क्रमश:)

#सशुश्रीके | २२ जुलै २०१५ दुपारचे २.५६







--------------------------------------------------------------------------------------------------------

कॉल फ्रॉम दुबई - भाग ७

हो एक सांगायचं राहून गेलेच, नवीन फोन घेतला पण नंबरचं काय!? संदेश म्हणाला पासपोर्ट दाखव त्यावरून नंबर देतात, जवळच्या त्या २४तास चालू असलेल्या 'सिटी कॉर्नर' नावाच्या सुपरमार्केट मध्ये जाऊन नवीन सिम घेतले, मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे 'उद्याचा दिवस कसा असेल' ह्या प्रश्नामुळे झोपेचे खोबरे झालेले... त्यात प्रचंड थंडी! ऐसीची सवय नाही... आणि मला मैन ऐसीचे बटण कुठे तेही माहीत नाही, नशीब ते ब्लैंकेट होतं! (मला जेव्हा ते ब्लैंकेट देऊ केलेले तेव्हा प्रश्न पडलेला की कोण वापरणार हे ह्या वाळवंटात!?)

असो... पहाट झाली ४ वाजता ची अझान ऐकू आली मग ६वाजताची, डोळा लागायचा पण सलग अशी झोप नाहीच, शेवटी उठलो ७ला. ९वाजेपर्यंत पोहोचायचे होते, ८ वर्षापूर्वीचं एवढं सगळं आठवतय पण त्यादिवशी कसे गेलो ऑफिसला आठवत नाही.

पोचलो सकाळी ९च्या आसपास मीडियासिटीत! काय सुंदर परिसर, सगळीकडे हिरवे गवत, मोठी झाडी, तलाव, कारंजी... प्रत्येक इमरती समोर रिजर्व्ड पार्किंग, तीथेही एक-से-एक गाड्या, उंटाच्या सुबक मुर्त्या त्यावर सुंदर नाक्षीकाम, जगोजागी आर्ट गैलरी मध्ये ठेवतात तसे मॉडर्न आर्ट! जाम कौतुक वाटत होते ते सर्व बघुन, ते सर्व आठवून आता कळतं की जगातल्या सर्व चांगल्या-महाग गोष्टींची भेळ आहे दुबई!

राहुल मला आमच्या सीएनएन इमारतीखालीच भेटला, इंटरव्यूसाठी आलोय असाच काहीसा माहोल होता, पण प्रत्यक्षात माझा पहिला दिवस होता नव्या देशात, नव्या जागेत, नव्या लोकांबरोबर! ३ऱ्या मजल्यावर ३२१च्या पाटीवर डी-सेवन ची पाटी होती, लिफ्ट मध्ये घुसलो, राहुलनी विचारपुस केली 'कसा आहेस, काय केले २दिवस, दुबई आवडलं का?' वगैर. मी 'आल इज वेल' केले, तेव्हड्यात ३रा मजला... बाहेर पडल्यावर राहुलच्या मागे मागे... ३२१, एक मोठी रूम... त्यात मध्ये रिसेप्शन त्याचा बाजूला एक काचेचे पार्टीशन असलेली रूम, त्यामागे मैन ऑफिस बॉसचे टेबल, खुप छोटे पण जागेचा अप्रतिम वापर केलेले ऑफिस होते, रेड-ब्लैक रंग-संगती, मस्त मोडर्न टच! मला ब्लैंकेट देऊ केलेली मारीसेल रिसेप्शन टेबल वर होती, तीने मला हालहवाल विचारून वेलकम टू डी-सेवन केले. माझी जागा त्या रिसेप्शनच्या मागच्या एकमेव रूम मध्ये होती! म्हणजे अक्खा डेस्क माझा! त्यावर एक दणदणीत नवीन-जलद-संगणक! गेले अडीच वर्ष 'एवेरेस्ट ब्रांड सोल्युशन्स' आणि त्याआधी 'सकाळ पेपर्स' सारख्या मोठ्या कार्यालयांतून काम केल्यानंतर अश्या छोट्या ठिकाणी काम करायचं ह्याची थोडी कुरकुर करत होतं मन, तेवढयात एक नवीन चेहरा आला ऑफिस मध्ये... (माझ्यासाठी नविन चेहरा) आल्या आल्या म्हणाला, "तू समीर ना!? मी शेहजाद, आपण ३-४दा फोन वर बोललो आहोत... दुबईत स्वागत" हस्तांदोलन करून तो ही त्याच्या जागेवर जाऊन बसला. मी ही डेस्कवर एकडे तिकडे बघत मोबाइलवर टाइमपास करायला लागलो.

अर्धा पाऊण तासानी एक अबाया असलेली बाई आली (अबाया म्हणजे अरेबिक बायकांचा पौराणिक पोशाख!) पण बुरखा नव्हता, जरा मॉडर्न पद्धतीचा... तीच बॉस असावी, आल्या आल्या तीने सर्वाना सुप्रभात केले, आणि इतरांनी तीला, मी त्या माझ्या रूम/पार्टीशन मधून पहात होतो, बहूदा मी आलोय हे तीला कळालं नसावं, राहुलने तिच्या डेस्क पाशी जाऊन मी आल्याची बातमी तीला दीली, ती उठून माझ्या डेस्क पाशी आली, मी हसून उभा राहिलो, आयुष्यात पहिल्यांदाच एका लोकल अरेबिक बाईशी प्रत्यक्षात बोलणार होतो, आणि ते पण थेट कम्पनीच्या मालकिणीशी!

(क्रमशः)

#साशुश्रीके । २३ जुलै २०१५ । दुपारचे १.०९


-----------------------------------------------------------------------------

कॉल फ्रॉम दुबई - भाग ८

.नायला अल खाजा' असं नाव होतं तिचं... म्हणजे अजुन ही असेलच म्हणा. शैक हैण्ड वगैरे केला, मला वाटलं की हात मिळवणे वगैरे प्रकार ह्या अरबी बायकांकडून जरा अपेक्षित नसतेच, पण ही जाम 'मॉडर्न' अरब जगातली होती, स्वतःची कंपनी, ४-५लोकं कामावर, स्वतःच्या पायावर उभी... मला 'वेलकम' करून तीने कामा विषयी थोडी माहिती दिली, आणि माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, आणि संगणक साठी काही तुझ्या ख़ास मागण्या असतील तर सांग वगैरे वार्तालाभ झाला, मी हुस्श् केलं!

मनातली सर्व भीती पळून गेली, तिथे फार कमी वेळेत रुळलो, एक स्थानिक भाषिक 'कॉपी रायटर'ही होता, हे ६फूटी उंच.. पण इंग्लिशची बोम्ब, पण मस्त दिलखुलास हसायचा, कायम कानाला मोबाइलचा एयरपीस लाऊन असायचा, तो एक... राहुल मी आणि शेहजाद आणि रिसेप्शनिस्ट मारीसेल असे ५जण असायचो रोज, नायला कधी यायची, कधी नाही. 

मी मुंबईत असताना अखंड गाणी चालू असायची, दिवसभर... संध्याकाळी तर आवाज वगैरे वाढवून, इथे मी जरा हळू आवाजने सुरुवात केली, इतरांना ही सवय झाली, कधी कधी तर नायलाच मला म्हणायची 'अरे किती लहान आवाजात गाणी एकतोयस, जरा मोठा तरी कर!.. माझं आवडतं गाणं आहे हे!' 

दीड एक महिन्यातच अगदी 'कोर टीम' मेंबर झालो, अरब जगातील पहिल्या वहिल्या महिला दिग्दर्शन लघु चित्रपटाच्या पुरस्काराचा किताब आहे तिच्याकडे, हे तिथे काम करताना कळालं, ट्राफी ठेवलेली तीने टेबलावर. त्याच लघुपटाचा 'स्पेशल स्क्रीनिंग' साठी लग्नानंतर पहील्यांदा सूट घेतला, आणि घातला ही! सॉलिड धावपळ, एकंदरीत खुप काम आणि कमी काम आणि कधी कधी कामच नाही असे ही दिवस अनुभवले.

ह्या सर्व गोष्टींमध्ये खुप किस्से घडले... पहिल्याच सप्ताहात 'अड्वान्स' मिळालेल्या अर्ध्या पगारानी भरलेले पैशांचे पाकिट टैक्सीत विसरलो! हा सर्वात मोठा किस्सा, आणि ही फजिती कोणालाही न सांगता उरलेला पगार होइ पर्यंत जी काटकसर केली आहे त्यावर ४-५भाग आरमात होतील. पण नको! हे भाग बंद करून सलग लेख... हाच उत्तम! जाम शिव्या पडल्यात ह्या भागांमुळे!!!

असो, कॉल फ्रॉम दुबई... ह्या कॉल च्या नंतरचा अक्खा महीना आणि दूबईतला अक्खा महीना, कधी जलद कधी धीमा! जशी वाट मिळेल तशी ती घेत होतो, स्वप्नाच्या मागे न जाता स्वप्नाला मागे आणत होतो. बाबा आज नक्कीच खुश असतील, लाहानपणा पासून 'तुला काय कमवायची गारज, बाबांनी कमवून ठेवले आहे ना!' ह्या टोमण्यांना ठेचत मी स्वतःच्या पायावर उभा होतो, ह्यात काही विशेष नाही म्हणा, पण तेव्हा ध्यानी मनी नसताना आलेला तो 'कॉल फ्रॉम दुबई' अजुन ही चालूच आहे!

#सशुश्रीके । २५ जुलै २०१५ रात्री १२.५८


Comments

  1. wahhh mastt!!! " स्वप्नाच्या मागे न जाता स्वप्नाला मागे आणत होतो." aavadla he (y)

    ReplyDelete
  2. 'कॉल फ्रॉम दुबई'
    छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!