Those 2 nights of ARRahman's LIVE IN CONCERT by Matrubhumi in Sharjah, UAE 18th March 2017

#Rockstar नंतर सुफी कॉन्सर्ट आता मी इथे दुबईत २००७ मध्ये आल्या पासून साहेबांचा हा तिसरा कॉन्सर्ट... नेहमीप्रमाणेच उत्सुकता!

आमच्या #ARRahman फॅन ग्रुप्स वरती हीच चर्चा, त्यात ३ आठवड्यापूर्वी दिनेश वैद्य नामक ग्रेट फॅन्स पैकी एका, त्यांचा पर्सनल मेसेज... जाणार आहेस का / तिकीट काढलेस का? लिंक आहे का... मी लगेच चौकशी सुरु केली, मातृभूमी नावाच्या ग्रुप ने आयोस्जईत केलेला... तिकिटाचे रेट्स म्हणजे 'अग्ग बाबॉ' भारतीय रुपयांच्यात सांगायचं झालं तर ३५,६५३ पासून ८९२ पर्यंत. मला प्लॅटिनम गोल्ड परवडणार नव्हतं आणि मागून पाहायची इच्छा नव्हती, सुवर्णमध्य साठी सिल्वर वगैरे काढायची इच्छा झालेली पण उशीर झालेला निर्णयाला, शो पर्वा आणि सिल्वर पण आता जवळपास संपायला आलेली.

Anand Swamy नावाचा एक 'जबरा फॅन' आहे आमच्या रहमानचा! (लिंक चिकटवतोय युट्युबची - https://www.youtube.com/watch?v=APg8MPre92g) तो म्हणाला "आपण काही तरी 'जुगाड' करू तिकिटांचा, तू काळजी करू नकोस!"... हे ऐकल्यावर मी मनातल्या मनात कॉन्सर्ट पाहण्याची स्वप्न रंगवू लागलो!... पण त्याआधी अजून एक महत्वाची संधी होती ती म्हणजे कॉन्सर्टच्या आधीची रंगीत तालीम!

ह्या रंगीत तालमी साठी मी आणि आनंद स्वामी आणि Uday Kiran भेटायचे ठरले... १७मार्च ला संध्याकाळी ९च्या आसपास मी आनंदला फोन लावला, तो म्हणाला उदय तुझ्या घराजवळच आहे त्याचाशी बोल आणि तुम्ही दोघे मला घ्यायला या, मी स्टेडियम जवळच आहे एका मित्राकडे राहायला आलोय... मी उदयला फोन लावला, काहीवेळातच मी त्याच्या गाडीत होतो, ऐनवेळी रहमान कॉन्सर्ट साठी निखिल पोळजीने केलेले एक झटपट कार्टून होतं... ऑफिस मधून त्याचे प्रिंट्स घेऊन आलेलो, त्याच्या ६-७प्रतींचं इन्वेलप होतं आणि पाणी + खाऊ घेऊन आलेलो एका बॅगेत! अगदी लहान मुलाला आई देते तसा फील येत होता.

मी नेहमी प्रमाणे माझा २रा मोबाईल (ज्यात फक्त राहमानचीच गाणी असतात) हेडफोन जैकला लावला... गाडीत आमचा मिनी कॉन्सर्ट सुरु! खरं सांगू का, रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्येपण इतका कमाल साऊंड येणार नाही जितका गाडीच्या छोट्या जागेत येतो, त्यात दुबाईचे सपाट रस्ते, म्हणजे अडथळे नाहीच... स्मूद ड्रॅईव्ह टिल शार्जाह विथ रहमान सॉंग्स! हेवन हो हेवन :)

A.R. Rahman #Sharjah #Concert #Live #NowPlaying #ArRahman

साधारण १०च्या आसपास आम्ही सगळे पोहोचलो शार्जाह क्रिकेट स्टेडियम पाशी, आनंद मी आणि उदय. आम्हा कोणाकडेही स्टेडियम मध्ये जाण्यासाठी लागणारी 'ऑफिशियल' ओळखपत्रे नव्हती, आणि मुख्य दरवाज्या पाशी २-३ 'ऑफिशियल' गार्डस्ने आमच्या मनसुब्यांना पार सिगारेटला पायाने ठेचावे तसे काही न बोलताच केलेले!

आता दुसरा मार्ग, स्टेडियमच्या मागची बाजू... आम्ही चालत चालत निघालो मागच्या बाजूला, जाताना ती १५फुटी उंच भिंत... असला राग येत होता त्या भिंतीचा... एवढी मोठी भिंत बनवतं का कोणी!??? पण तितक्यात आम्ही साहेबांचा आवाज ऐकला... रंगीत तालीम रंगात होती... कारण रंगीला चित्रपटातलं तन्हा तन्हा चालू होतं!

मध्येच एक झाड लागलं... आनंद म्हणाला आपण ह्या झाडावरून जाऊ शकतो, उदय हसायला लागला... मी म्हणालो बी प्रॅक्टिकल ड्युड, इट्स नॉट पॉसिबल! कारण ते सुरुचं झाड होतं, ह्या झाड्यांच्या फांद्या म्हणजे फारच नाजूक! असो... ५-६मिनिटाच्या पायतोडी नंतर मागचा दरवाजा दिसला, बाजुलाच तिकीटविक्री केंद्र, अगदी जुन्या स्टॉल/बाल्कनीवाल्या चित्रपट थेट्रासारखं!

उदय ने ते १५फुटी + काटेरी कुंपण वालं मोठं गेट पाहून तर श्वासच सोडला, मी विठ्ठला सारखा उभा होतो हे सगळं पाहात, आनंद मात्र त्या भव्य दाराजवळ जाऊन खटपट करत होता काहितरी!

आनंदने मला हळूच हाक मरली, चामारी ते गेट उघडं होतं! स्वर्गाचं दार उघडलं की जो आनंद होईल तो आनंद माझ्या समोर आनंदने उघडलेला!!! त्यात उदय येडा कुठे गायब झाला काय माहीत... म्हणून आनंद त्याला शोधायला गेला, उदय दिसला... त्याला सांगितलं फाटक उघडं आहे, नशीब लांब नव्हता गेला कुठे!

आम्ही स्वर्गाच्या दारात प्रवेश केला, हळूच दार बंद पण केलं, मला आनंदच्या चेहऱ्यावर प्रकाश पडलेला दिसला, अर्थातच आत चाललेल्या भव्य दिव्य कॉन्सर्टचा प्रकाश! त्याचा उत्साह इतका तेजस्वी होता की विचारायलाच नको! पण आजून एव्हरेस्ट चढायचय, आता कुठे आम्ही पायथ्याशी आलोय!

स्टेडियमच्या गॅलरी विभागात आम्ही शिरलो, पुढे मैदानावर सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे तीन पडाव आणि मग मुख्य स्टेज, आम्ही गॅलरीत आलो, काही कर्मचारी मंडळी आमच्याकडे संशयास्पद नजरेने बघत होतीच, तरी आम्ही अगदी बिंदास (अभिनय) वावर चालू ठेवला, काही वेळ बसलोही, मी काही छायाचित्रेही काढली, जी नंतर उडवावी लागली, ते नंतर पुढे सांगेन का ते!

आम्हाला गॅलरीतून मैदानात कसे जाता येईल हे कळत नव्हते, एक छोटेसे फाटक होते मैदानाला लागून, पण ते बंद होते आणि आजूबाजूलाच मैदानावरचे हा मोठा सोहळा सांभाळणारे काही जण असल्यामुळे आम्हाला कुठलाही असाधारण प्रयत्नही करता येत नव्हता!

आनंद आम्हाला नेहमी प्रमाणे 'लीड' करत होता, क्रिकेट स्टेडियम असल्याने मैदानाच्या अगदी मधोमध 'ब्लॅक-स्क्रीन' होता, त्याच्या मागे आणि गॅलरी ह्यांमध्ये जवळजवळ ३फूट लांब आणि जवळजवळ १२-१५ फूट अंतराची 'दरी' होती. त्या दरीतून आम्हाला काही पठाण सामानाची आवाजाही करताना दिसत होते, म्हणजे हेच ते द्वार, आणि त्याच द्वारावरती आमची घुसमट चालू होती!

आनंद म्हणाला, हाच एक उपाय आहे, एक पाण्याचा पण त्यात पाणी नसलेला ड्रम त्यावर लाकडी फळी दिसत होती वरून, आनंदने त्याचा पुरेपूर फायदा घेतला, आणि काहीच क्षणात तो खाली उतरलेला होता, उतरताना त्याला थोडं खरचटलेही, आनंद सारखा माणूस खाली उरलाय आणि मी का मागे राहू... म्हणजे तुलना देहयष्टीची, मी पण खाली उतरायला लागलो, पण माझ्या पद्धतीने. हे असले उंचावरून उड्या मारण्याचे प्रकार लहान असताना अगदी दररोज केलेले, ते सगळे दिवस आठवले आणि मस्त डोकं लाऊन २ही पंज्यानी भिंतीला धरून देह सोडला त्या ड्रम्स वर, ड्रम्स मध्ये पाणी नसल्याने डगमगायला लागलेला, पण कसंबसं करत जमलं शेवटी! पायाला झिणझिण्या... धप्पकनी लँडिंग केलं होतं देहाने!
आनंदला आनंद आणि मला परमानंद!

दोघांनी वर पाहिलं तर उदय मात्र चलबिचल अवस्थेत! तो जरा थुलथुलीत, वेगळ्याच पद्धतीने यायचं होतं त्याला सोपं सोडून, त्याला आनंद आणि मी सांगत होतो सोप्या पद्धती, असं कर तसं कर, इथूनच ये वगैरे... शेवटी अर्धा खाली आला कसा बसा... तो निळा पिंप, त्या जड देहाला कसाबसा पेलवत होता, आणि त्यावरच्या लाकडी फळी मुळे एकूणच डोंबाऱ्याचा खेळ झालेला, शेवटी उदयच्या पार्श्वभागाला आमच्या ४हातांची मदत लागलीच, एकदाचा उदय जमिनीवर आमच्या हृदयासकट!

२रा महत्वाचा पडाव पार पडलेला... ३घे आता मैदानावर होतो... ती हिरवळ त्यावर आमचे पाय, आणि समोर रहमानची रंगीत तालीम आमचे पाय हलवायला लागलेले!

सिल्वर च्या बाजूचे कुंपण ओलांडून चालत थांबत चालत आमची आगेकूच स्टेज पर्यंत गेली, आनंद आम्हाला होता... मी हातवारे करतो, की 'हा बॅनर इथे असावा वगैरे!' तुम्ही फक्त काहीतरी बोलण्याचा अभिनय करा, बाकीचं काही करायची गरज नाही आणि हे सर्व प्रकार आम्ही तो बॅकस्टेज / इव्हेंट क्र्यु वगैरे चा बैज नसताना करत होतो! एका सेक्युरीटी गार्ड ने आम्हाला पाहून शंकायुक्त नजरेने पाहिले, आम्ही अगदी काहीच फरक पडत नाही ह्या विनधास्तयुक्त चेहऱ्याने आमची आगेकूच ठेवण्याचा असफल प्रयत्न केला! आम्हाला परत जिथून आलात तिथून जाण्याचा 'समाज + धमकी'नामा देण्यात आला! घोर निराशा... पण तरीही लक्ष मात्र होते रंगीत तालिमी कडे, 'मुस्तफा मुस्तफा' चालू होणार होतं,

आमची परतीची वाट सुरु झाली, म्हणजे बॅक टू २रा पाडाव... बॅक ऑन ग्रास एरिया, तिथे काही पठाण लोक 'लेट नाईट डिनर' करत होते. आनंद आणि मी त्याच्या मागे जाऊन बसलो, उदय कुठे गायब झाला तितक्यात देवास ठाऊक... मी मोबाईल काढला फोटो काढायला, कधी व्हिडीओ रेकॉर्डिंग्स, कधी ऑडिओ चालू होते... त्यात आनंद त्या पठाणांशी हितगुज करू लागला, त्यातल्या एकाने सांगितलं वैतागून 'क्या ये कलसे याही गाने बजा रहै है... मुस्तफा मुस्तफा!' मला हसू यायला लागलेलं त्याचे हावभाव बघून. तेवढ्यात आम्हाला हकलवणार्या त्या सेक्युरिटी गार्डचे आमच्या दिशेने येणे पाहून आनंद अक्षरशा: झोपला, जेणेकरून तो दिसणारच नाही, मी हे सगळं ना करता मान खाली टाकून ऑडिओ रेकॉडिंग चालू ठेवलेले.

काहीवेळाने तोच माणूस एका माणसाची गचांडी धरून 'एक्सिट' द्वारापाशी जाताना दिसला! मी स्वतःलाच त्या माणसाच्या जागी 'इमॅजिन' करू लागलो! त्यात आनंद म्हणाला... हीच ती वेळ... पुढे जायची... स्टेज च्या पाशी! मला कळेना काय करावे.. तो पुढे गेला. मी मोबाईल खिशात टाकला, न त्याच्या मागे मागे.. त्याचे नेहमीप्रमाणे हातवारे चालूच होते. अभिनय करण्याची वेळ यावी पण अश्या प्रसंगात जिथे तुम्हाला अपमानास्पद हकलवून देण्यात येणार असेल तिथे... पण तरी ह्या सर्वाचा विचार करायला वेळ नव्हता. आम्ही आमचे ध्येय ठरवून आलेलो, आम्ही परत स्टेज पाशी आलेलो, मात्र प्लॅटिनमच्या मागे आणि गोल्डच्या मधल्या भागात.

प्लॅटिनमच्या मागे आणि गोल्डच्या मधल्या भागात... गोल्डच्या पहिल्या पंक्तीत काही 'ऑफिशियल बॅजेस' नसलेले ३-४ जण बसलेले, आनंद आणि मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो, स्टेज वरून आवाज येत होता रहमानचा पण तो मात्र दिसत नव्हता अजूनही, मी आनंदला विचारलं नक्की कुठे लपून बसलेत साहेब! तो त्या लेबर लोकांशी बोलण्यात मग्न, मी फोटो विडिओ काढण्यात! तेवढ्यात २ इसम आले, ऑफिशियल बॅज वगैरे असलेले, म्हणाले काय करताय इथे? त्यात माझ्या हातात मोबाईल... मला सर्व फोटो डिलीट करायला लावले, मी केले ही कारण मला उगाच लफडं नको हवं होतं, कारण हे फोटो कॉन्सर्ट च्या आधी लीक होणे म्हणजे मॅनेजमेन्ट बेजबाबदार असणे वगैरे आरोप होतात. असो... फोटो गेल्याचं दुःख आणि नंतर तिथून परत काढता पाय घ्यावं लागणं हे अजून एक!

तरीही आम्ही खचलो नाही बरं का!... आम्ही अजून ही त्या प्लॅटिनम आणि गोल्ड च्या मध्येच एका स्पीकरच्या भिंतीमागे घुटमळत होतो, शेवटी तो क्षण आला.. कोणाचच लक्ष नाही हे पाहून मी थेट प्लॅटिनम मध्ये घुसलो, मागे वळून बघितलच नाही! स्पॉन्सर्स किव्वा इव्हेंट करणाऱ्या लोकांचे नातेवाईक असतील बहुतेक त्यांच्या बाजूलाच जाऊन बसलो, सगळे रहमान च्या रंगीत तालमीत मग्न! मला ही दिसला रहमान... काना नंतर आता डोळे तृप्त झाले! मी फोन खिश्यातुन बाहेर काढलाच नाही, लक्षवेधक कामगिरी नकोच करायला असा निश्चय केला! कॅन्सर्ट मध्ये गाणारे इतर गायक, नृत्य आविष्कार, प्रोजेक्शन चा जणू ट्रेलर चालू होता डोळ्यासमोर.

जवळजवळ अर्धा तास मन लाऊन रंगीत तालीमीची मजा घेत होतो, लांबून फोन वर बोलत असताना उदय दिसला, त्यानंतर त्याच्या ओळखीचे २-३ 'रहमानीयाक' पण दिसले माझ्या मागेच बसलेले! कळाले त्यातले २ चेन्नईत राहतात आणि रहमान जिथे जाईल तिथे आवर्जून हजेरी लावतात! हो हो, जगात कुठेही! नंतर आनंद ही आला... आणि १२ वाजले! ऑफिशियली रंगीत तालीम बंद व्हायची वेळ! आम्ही सगळे स्टेजच्या मागच्या बाजूला जमलो, रहमान अजून आहे... हॉटेल रूम वर गेला नाहीये हे ऐकून बरं वाटलं. आता 'वेटिंग गेम' सुरु झाला. आज पण मागच्या कॉन्सर्टच्या वेळी जशी पाहाट झालेली घरी निघायला तशी होणार हे स्पष्ट झालेलं!


क्रमशः

#सशुश्रीके

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!