चाळीत राहावं एकदातरी! एक गुळगुळीत अनुभव 👌



चाळीत.. गुळगुळीत असतं सगळं, म्हणजे सगळं कसं एक्सपेरियन्स असलेलं, चढताना उतरताना हात लागून लागून झालेले लाकडी कठडे, जीने, भिंतींचे कोपरे.. सगळं कसं गुळगुळीत...

पावसात सोडून इतर वेळी असलेल्या जळमटंयुक्त खिडक्या, त्यातून डोकावणारी पिंपळाची पानं, ती ही त्याच माजल्यावरची... भिंतीतून जन्माला आलेली.

पहिला मजला संपला न प्यासेज मध्ये शिरलं की 'दिल के टुकडे टुकडे...' वगैरे झालेल्या फारश्या, त्याची डागडुजी साठी वापरलेलं ठिसूळ सिमेंट, कोणाची तरी वाट पहिल्यासारखी वाटणारी एक म्हातारी, अजून पुढे गेलं की २-३ आजोबा, त्यांच्या हातात पेपर... आणि कोणी ऐको न ऐको, एकमेकांकडे न बघता चाललेली बडबड, अजून जरासं पुढे गेलं की कानावर नकळत राज्य करणारी आकाशवाणी, दरवाज्यातून डोकावणारी मुलं, फिस्कटलेल्या रांगोळ्या, वाळत घातलेले पण वाऱ्याने पडलेले कपडे... हे सगळं रोज पाहायचो!

परत एक मजला चढायचो,
हो... २मजली होती आमची ब्राह्मण वाडी, परत वरच्या लिहिलेल्या गोष्टी थोड्या फार प्रमाणात दिसायच्या, घडायच्या... एका बंद दरवाज्या पाशी येऊन मी थांबायचो, लगतच्याच उघड्या खिडकीतून मला पाहून एक मुलगा TV बघता बघता आईला जोरात ओरडून सांगायचा, 'आई, समीर दादा आलाय...' मग आतल्या खोलीतून काकूंचा आवाज, 'आले आले थांब', तो मुलगा मला ऐकू आलं आहे हे समजून TV बघण्यात मग्न व्हायचा, मग मी ५-१०मिनिटं २ऱ्या माजल्याहून खाली नजर टाकायचो, खाली मुलं क्रिकेट, लपाछपी, लंगडी वगैरे खेळण्यात मग्न...

हे सगळं अगदी २००५चच सांगतोय, फार जुनं नाहीये, पण आता सगळं बदललंय, आता खेळायला जागा नाहीये खाली, इतक्या गाड्या झाल्या आहेत की जमीन दिसत नाही, फारश्या बदलल्या आहेत, बरेचसे आजी आजोबा नाहीत.

पण काय बदललं नसेल तर ते हे... हे सगळं कसं एक्सपेरियन्स असलेलं, चढताना उतरताना हात लागून लागून झालेले लाकडी कठडे, जीने, कोपरे.. सगळं कसं गुळगुळीत... ते तसच आहे अजून... नशीब! मला जाम आवडतं त्या कठड्यांवरून हात फिरवत माजल्यांचा प्रवास करायला!

चाळीत राहावं एकदातरी!
एक गुळगुळीत अनुभव 👌

#सशुश्रीके | ६ मार्च २०१८


















Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!