आठवण

झोपच येत नव्हती,
आठवणी खोदत होतो...
आणि चक्क पैसे सापडले!
१०/२०/२५/५० पैसे काही रुपये...
पुरलेली नाणी!


आक्षीतल्या (गावातील) दाराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला शोभेची झाडे होती त्यातल्या एका झाडाच्या मुळांपाशी पुरुन ठेवलेली नाणी दिसली थेट!, डोळे चमकले...

आजी कडे अरेंज / लिमलेट गोळ्या, गोळे, कोल्ड्रिंक साठी सारखेच पैसे मागायचो... त्यापेक्षा हातात उरलेल्या (उरवलेल्या) चिल्लरचा फायदा तरी करून घेऊ, झाडाला पैसे लागतील... तेव्हढाच कमावता होईन मी!

सुट्टी संपल्यावर आक्षीच्या अंगणाचे गेट ओलांडल्यावर तेच गेट पुन्हा कधी दिसेल ह्या विचारात मुंबईला परतायचो...

नंतरची सुट्टी कधी अर्ध्या वर्षाने कधी वर्षाने येणार... आक्षीतलं ते झाड! त्याबद्दल विसर पडलेला, सुट्टी नेहमी प्रमाणे आक्षीत... एकदा जेवताना अचानक... आजीने एका रुमालाला गाठ मारून ठेवलेली जड वस्तू माझ्या समोर आणून ठेवली!

मी हसलो, ती पण हसली...
"असे पैसे... जमिनीत पुरून मिळाले असते तर!"

आठवण आहे ही,
आठवणी मौल्यवान असतात,
आठवणी पुरलेल्या असतात,
खोदून का होईना सापडतात,
कधी आजी कधी कोणी दुसरं!

आणि हो...
माझं नेहमीचं आवडतं वाक्य...
'आठवणींचा पत्ता कधीच बदलत नाही!'

आठवण तुला माझी शप्पत आहे,
मला कधीच विसरू नकोस.

तुझा आजन्म ऋणी #सशुश्रीके

२८/१२/२०१८



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!