सूर्यकांत, साकेत आणि अजुन दोन-तीन जण...

सूर्यकांत, साकेत आणि अजुन दोन-तीन जण...

असे गाव-बाल-मित्र होते माझे, आक्षीच्या त्या अरुंद छोट्या गल्लीतले, त्याहुन छोट्या घरातले, मे महिन्यातले माझे मित्र! त्यातल्या त्यात सूर्यकांत उनाड म्हणून माझ्याशी जास्तच मैत्री, साकेत बाजूच्याच चिटणीसांच्या वाडीत राहणारा... तगडा पाप्लेट न चिकान-मटान तोडणारा, बाकी जवळपासचेच... चपळ अणि खोडकर! (ही आडनावे नव्हेत, त्यांची नावं आठवेनात...  म्हणून आपली विश्लेषणं कोंबली)

आंबे, कैऱ्या, चिंचा, जाम, करवंद, लिमलेटच्या / आरीन्ज गोळ्या, नारळ, मेंगोला, थम्ससप ह्यांच्यात समान वाटणीचा हक्क् असणारे, २५-२५पैसे जमवून चेंडू खेळणारे आम्ही, भर उन्हाळ्यात अगदी नियमित समुद्रावर, मैदानावर, वाडीत क्रिकेट, लपाछपी, अप्पारप्पी... शिवणापाणी असले खेळ खेळत असायचो, भूक लागली की अर्धा तास गायब, की परत सुरुवात.

समुद्रावर तर कसा वेळ जायचा कळायचच नाही, जाताना येताना पायतोड करायचा कंटाळा आला की ते आमचं वीस किलोचं शरीर 'लिप्ट' मागायचं.. सायकल स्कूटर बाइक... जे दुचाकी वाहन दिसेल त्याला... आणि हो... बैल गाडी किव्वा टांगा जर दिसला तर धमालच!!! माइचा पोरगा ना तू!? आप्पांचा नातू ना रे!? असला वट होता ना आपला!!! गावच्या पोरांपेक्षा मीच फेमस!

सुरुच्या बनात त्या सुखलेल्या पानांच्या ढिगाऱ्यात लोळायला काय मजा यायची! अखंड वारा, कपडे अखंड ओले,
अंगभर वाळू, उनाडपणाचा कळस गाठायचो आम्ही! मग लांब उड्या... सायकलची शर्यत, आणि पैजा पण काय... नागडं धावायचं समुद्राकाठी! हाहाहा

मग ही सगळी धमाल दीड महीने झाले की संपायची,
मी मुंबईत परत...
जमलं तर दिवाळीची सुट्टी,
नाहीतर थेट पुढच्या वर्षी!

शेवटचा दिवस तर असला बोर असायचा ना, फुल ऑन इमोशनल! कधी कधी रीवाइंड बटण दिसलं की थेट त्या दीड महिन्याच्या काळात जावसं वाटतं!... मी आणि... सूर्यकांत, साकेत आणि अजुन दोन-तीन जण!

#सशुश्रीके | १२ डीसेंबर २०१४, रात्रीचे १२.२०

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!