डबल दंड!



२००५ च्या वेळची गोष्ट, मी सांताक्रूझला हॉटेल 'ह्यात' समोर एका एड अजेंसी मध्ये कामाला होतो, दर शुक्रवारी रात्री/बेरात्री (कामाच्या लोड जसा असेल तसा, कधी कधी शनिवारी पहाटे/सकाळी ही निघालेलो आहे) निघायचो पुण्याला, माझा फर्स्ट क्लास पास होता लोकलचा, किंग्सर्कल - सांताक्रूज - किंग्सर्कल, पण नेमका शुक्रवारी लोच्या व्हायचा, तिकिटाला रांगेत कोण उभे राहणार, आणि मग दादर पर्यंत जाण्यासाठी फर्स्टकलास उतरून सेकण्ड क्लास ला कोण जाणार! म्हणजे दोन गुन्हे एका मागो माग एक, पहिला म्हणजे तब्बल तीन स्टेशन्स विना तिकीट आणि तो ही फर्स्टक्लास मध्ये!

२-३ वेळेला केला हा प्रकार, पण अपराध्याची भावना घे/ठेऊनच, बिंदास नाहीच. पण मग तो दिवस आलाच, मस्त वेळेत निघालेलो कामं आटपून, माहीम येताच साक्षात टीसी आला डब्यात, मला विचारणी केली, मी गपचूप पास दाखवला 'काही न बोलता.' टीसी ने ही 'काही न बोलता' दादर आल्यावर हात धरून मला प्लॅटफॉर्म वर आणले.

माझ्याकडे जेमतेम पुण्याला बसनी जाता येईल इतकेच पैसे, मनात म्हणालो झालं! आता आज कसला जातोय मी पुण्यात 'वेळेत'

जरा तोंड पडलेलं पाहून म्हणाला 'दंड तर भरावा लागणार आता' मी म्हणालो साहेब, नेहमी नाही हो करत असं, पुण्याला जायचय... गडबडीत आहे, पुन्हा नाही करणार असं! असल्या गूळचट विनवण्या करत होतो १०मिनिटे. पण दगडाला पाझर फुटेना. शेवटी सत्य परिस्थिती दाखवली, पाकीट काढलं आणि २०० काढले म्हणालो इतके आहेत माझ्याकडे, १५०लागतात पुण्याला जायला, हे बघून तो हसला, म्हणला पुन्हा पकडला गेलास माझ्या कडून तर डबल दंड द्यावा लागेल, कळलं का!?

माझ्या डोळ्यात आलेले एमएल भर पाणी त्याला दिसले होते बहुतेक! त्यानी दिलेली ऑफर स्वीकारत मी धावत दादर बस स्टँड पाशी गेलो, त्याच्या बद्दल मनातल्या मनात देवाकडे सद्वभावनेनी प्रार्थना ही केली.

त्यानंतर आजपर्यंत कधीच विना तिकीट प्रवास केलेला नाही, उगाच डबल दंड कोण भरणार!?

#सशुश्रीके | ६ जानेवारी २०१६

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!