रामभाऊ

रामभाऊ

आमच्या शाळेतले शिपाई. नाव रामभाऊ... घंटा वाजवायला, फाईली आणायला, फाईली पोचवायला, पालकांना विद्यारथ्यांचे वर्ग दाखवायला, साफसाफाई वगैरे अगदी सर्वच कामासाठी रामभाऊ! श्रीमुखात मोजून तीन-चार दात, कपाळाला स्तंभा सारखा उंच गंध, कदाचित टक्कल असावं, कदाचित म्हणतोय कारण त्यांना त्यांच्या त्या खाकी गांधी टोपी शिवाय कधी पाहिलेच नाही. दाढी एक एमएम वाढलेली, एका कानाला अत्तराचा कापूस, कंठाला अंगारा, पायात कोल्हापुरी, आता सर्वात महत्वाचं म्हणजे... त्यांचा एक खांदा दुसऱ्या खांद्यापेक्षा जरा वर असायचा नेहमी, त्यामुळे विशेषतः मागून त्यांना पाहिलं की नेहमी देव आनंदचा भास व्हायचा! बाकी वय झालं होतं ते त्यांच्या हाताच्या सुरकुत्यांहून कळायचं, अगदी नस आणि नस दिसायची, पण चेहरा मात्र तुकतुकीत... तेजपुण्य, सदा हसरा!

मधली सुट्टी झाली की आम्ही सर्व पोरं पाच सहा मिनिटात डबे संपवून पटांगणात अक्षरशः सांडायचो! कोणालातरी लागायचंच... कोणाचा घुडगा फुटायचा तर कोणाचं कोपर! मग रामभाऊ हातचं स्ट्रेचर घेऊन टीचर रूम मधल्या 'फर्स्टएड' पेटी पाशी आणून सोडायचे. दिसायला फारच बारीक पण भलतीच ताकत, शाळा संपल्यावर एका हातानी ती भली मोठी घंटा उचलायचे आणि एका हातात ते जड लोखंडी स्टूल घेऊन जाताना कित्येकदा पाहिलेलं मी.

मी चालत यायचो आणि चालतच जायचो.. घरापासून जास्त लांब नव्हती शाळा, पण कधी कधी बाबा सोडायचे स्कूटरनी, परीक्षा असेल तर त्या आठवड्यात रोजच सोडायला आणि आणायला, रस्त्याच्या पलीकडे सोडायचे... मग रस्ता ओलांडण्याच्या आधी सहज लक्ष जायचं शाळेच्या इमारतीवर, वरच्या कुठल्या ना कुठल्या तरी मजल्यावरच्या वर्गात रामभाऊ दिसायचेच... लक्ष गेलं तर हसायचेही हात दाखवून!

अशाच एका परीक्षेच्या आठ्वड्यातला किस्सा... परीक्षा चालू होती, आमच्या वर्गातला एक मुलगा (दुर्दैवाने मतिमंद होता) अचानक परीक्षा अर्धवट सोडून निघून गेला, मला राहवेना काय झालं वगैरे, डोक्यात विषय तोच... आधीच माझा आणि अभ्यासाचा छत्तीसचा आकडा, मर्यादित यशाचीच अपेक्षा त्यामुळे मर्यादित प्रश्न सोडवून झाल्यावर मी ही वेळ संपायच्या आधीच सुटायचो... तसा त्यादिवशी ही! बाहेर पडल्यावर शाळेच्या फाटकापाशी असलेल्या शौचालया समोर गर्दी, तो मगाशी लवकर निघून गेलेला मुलगा तिथे त्या शौचालयाच्या दरवाज्यापाशी नको त्या अवस्थेत उभा होता, रामभाऊ त्याला उचलून आत नेत होते, हा सगळा प्रकार बघत असताना लोकं हसत होती, त्यात मी ही होतो म्हणा... पण त्या मुलाबद्दल आणि रामभाऊ बद्दल वाईट वाटत होतं, ह्या घडलेल्या प्रकाराने झोप ही लागली नाही त्या रात्री!1

दुसऱ्या दिवशी बाबांनी स्कूटर वरून सोडलं, नेहमी प्रमाणे मी खिडक्या पाहिल्या शाळेच्या, रामभाऊ दिसले, त्यांनी पाहिलं... मी हात केला, त्यांनीही हात केला आणि हसले. मग जेवणाच्या सुट्टीची घंटा ऐकताच रामभाऊंना भेटायचंच ह्या हेतूने मी डबा न उघडताच धावलो वर्गाबाहेर, आणि दरवाज्यात पाय अडखळून जो काय आपटलोय पायऱ्यांच्या खांबाला... मी रामभाऊंकडे जाण्या आधी तेच माझी भेट घ्यायला आलेले, मस्त टेंगूळ आलेलं कपाळावर, त्यांनी मला हात दिला, उचललं... नक्की काय बोलले आठवत नाही पण काळजी, दिलासा आणि आपुलकीची भेळ असलेले भाव होते चेहऱ्यावर! माझा हात खिशात गेला, त्यांचा साठी आणलेले चॉकोलेट नव्हतेच खिशात, परीक्षेला नेमका नको तो प्रश्न येतो जो आपण नेमका सोडून दिलेला असतो अभ्यास करताना हे कळाल्यावर जो चेहरा होतो तसाच चेहरा झालेला माझा तेव्हा. त्यांना बहुतेक कळालं असावं, की मी काहीतरी शोधतोय! त्यांनी हळूच ते चॉकोलेट माझ्या शर्टाच्या खिशात टाकलं, (मी पडल्यावर कदाचित जमिनीवर पडलेलं असणार) तेवढ्यात माझे सगळे मित्र माझ्या जवळ येऊन टेंगळाची शहानिशा करू लागले, आता माझं डोकं ठणकायला लागलेलं, डोळ्यात पाणी... दुसऱ्याच कुठल्या तरी शिपायाने बर्फ आणलेला, आजूबाजूला पाहिलं तर रामभाऊ नव्हते, शेवटचा दिवस होता तो परीक्षेचा... त्यामुळे आता बहुतेक पुढच्या वर्गातच भेट होणार अश्या जड विचारांनी पेपर सोडवला!

त्या वर्षी आम्ही पुण्याहून सांगावीत राहायला गेलो, त्यामुळे शाळा बदलली, त्यानंतर आज पर्यंत त्यांचा चेहरा परत पाहिला नाही, रामभाऊ असतील का नाही माहीत नाही आता, मध्ये काही वर्षापूर्वी एकदा बाईक वरून जाताना खिडक्यांकडे लक्ष गेलं, जुनी आठवण हात दाखवून हसली, मी ही हसलो.

असे रामभाऊ सगळ्या शाळांना मिळोत!

#सशुश्रेके | १४ मे २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!