उनाड दुपार



उनाड दुपार - भाग १

झोप... छे! 
झोप वगौर म्हातारे लोक्स घेतात! झोपेची वेळ तर फार महत्वाची वेळ, अक्ख गाव झोपलेलं आणि तुम्ही मस्त जेवण जिरवायला मोकळे, ताकाची चूळ भरून... दातात अडकलेले लोणी दातांच्या फटीतून खेचत उनाडगिरीला सुरुवात! पहिली भेट विहिरीला.. त्या अर्धमेल्या छोट्या बादलीला पायाने ढकलून बळजबरी 'आत्महत्या' करायला लावत माझे स्वार्थी दोन हात तिला जीवदान देण्यासाठी परत वर खेचत, का तर तांब्यातले पाणी पुरले नाही म्हणून! आणि अश्या ताज्या थंड पाण्याला कोण सोडणार, त्यातच ते पाणी अर्ध अंगावर, मग ते सुखवण्यासाठी उन्हात काठी आणि टायर घेऊन सुसाट ह्या वाडीतून त्या वाडीत. घाबरायचो नाही कोणालाच भीती मात्र वाटायची त्या भल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक खांबाची, किर्रर्रर्रर्रर्र असा अखंड आवाज, आणि त्यावर वायरांच ते जंजाळ! तिथे आलो की माझा वेग कमी असेल तर वाढायचा आणि जास्त असेल तर कमी व्हायचा! कायतरी विचित्र जागा होती ती... कोकणातलं सूक्ष्म बर्मुडा ट्रायांगल म्हणा ना!

असो, रस्त्यावर पडलेल्या आणि गाड्यांच्या चाकांमुळे चिरडल्या गेलेल्या शहीद चिंचा आणि जांभळं पाहून मन कसं जड व्हायचं, वेग तिथेही कमी व्हायचा, कधी कधी तर तंद्री लागायची त्या चिंचा, जांभळांकडे पाहून. मग रस्त्यावर येणारे जाणारे मला बघत हसायचे, मग मी जसा त्या ठिकाणी नव्हतोच अश्या आवेशाने माझी यात्रा परत सुरु करायचो, अनवाणी चालताना सावलीचे महत्व खूप हो... मग झाडांच्या मधून येणारं ऊन जिथे स्थिरावेल तो भाग ही कमालीचा तापलेला असायचा, मग तो ही एक खेळच, उन्हाचा भाग चुकवत जायची मजा! त्यात ते गावाचं डांबर, थंड दुधाच्या साईवर पाय पडल्यावर जसं वाटेल त्याच्या नेमका उलटा अनुभव, जिथे जिथे ऊन अखंड तिथे तिथे ते डाम्बर अमिबा सारखे वागायचे, आपली जागा सोडून इथे तिथे त्यावर अनवाणी पाय पडला की संपलच! त्यावर गाड्यांचे टायर, बैलगाडीची चाके अशी ठळक उठायची की पोस्टांच्या तिकिटावरचे स्टँपच जणू!

क्रमशः

#सशुश्रीके १९ मे २०१६










उनाड दुपार - भाग २

रस्ता कधी नागमोडी होत 'लांब' जायचा कळायचच नाही, मग पुढे कोळी वस्ती... मला तिथला वास नाही जमायचा, त्या मासे पकडण्यासाठीच्या निळ्या जाळ्या सुखवाय्ला ठेवलेल्या असायच्या... अंगणात पसरवून ठेवलेली मासळी वगैरे, ते जामायचंच नाही, अजून ही जमत नाही, असो तिथून उलटी वाट घेत, कुठल्याही मधल्या गल्लीत वळायचो… तिथल्या सर्वच गल्ल्या समुद्राकडे जायच्या म्हणा! मी जिथे थांबायचो ती गल्ली जणू फक्त माझ्यासाठी त्या दिवशी समुद्राकडे जाणार अश्या श्रीमंत विचाराने मी माझी पावलं समुद्राकडे न्यायचो... तो सुखलेला पाला, लाल-काळी माती, मध्येच जमलं तर रस्ता, त्यावरचं दिलखुलास शेण, चिरडलेली फळं-फूलं ह्यांचावर माझ्या पावलांचा स्टॅम्प मारत समुद्राच्या अलीकडचा भयानक परिसर यायचा... हो हो... भयानकच!

अजगरासारखे ते हिरवे मोठे मोठे खांब त्याला लांब लांब पानं, त्यातून जावं लागायचं ती दहा सेकंद नकोशी व्हायची! त्यात कुठून काय अंगावर येईल ह्याची अजून एक भीती! कसाबसा त्या हिरव्या राक्षसी प्रकारातून बाहेर आलो की समोर दिसायचं सुरूच बन! तेल लावून कंगव्यानी सेट करावेत तसे ते वृक्ष कधी डावी कधी उजवीकडे जशी हवा असेल तसे झुकलेले असायचे, मध्ये वीस फुटी जागा, गाड्यांना यायला जायला, सुरुच्या छोट्या छोट्या फांद्या पानं आणि वाळूचा तो रस्ता, त्यावर काचा, रसवाल्या गोळ्याच्या कांड्या, प्लास्टिक पिशव्याचा श्रापही असायचा!

पण ह्यासर्व गोष्टींमधून दिसायचा तो अक्षीचा समुद्र! फेसाळ, मनमोकळा, स्वतः तुमच्याकडे येऊन गप्पा मारणारा, नाहीतर उदास होऊन लांब जाणार. सुरुच्या बनानंतरचे काळे दगड आणि नंतरची सुखी वाळू सोडली की ती थंड ओली वाळू लागायची, अह्हा काय मस्त! पृथ्वी वरची गादीच हो ती... त्यात शंख शिंपले... नुसता खजानाच, भरती असो ओहोटी असो, समुद्राचं आकर्षक काय भलतंच! कितेही दमलो असलो तरी त्या लाटा पाहून असा काही उत्साह यायचा अंगात.. तो देह जणू त्या समुद्राला भिडून हरवणार अश्या जोशात धडक देत असू! एका क्षणात समीर खारट... समुद्राचं ते पाणी डोळ्यात कानात नाकात आणि जखमेवर आलं की जो काही झटका बसायचा, तोडच नाही त्या 'फीलिंग'ला!

क्रमश:

#सशुश्रीके | २८ मे २०१६


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!