नशीबवान मी...
काही वर्षांपूर्वी आक्षीला गेलेलो, जुनं घर पहायची इतकी सवय होती... त्याच ठिकाणी आता आलिशान बंगला दिसला, पूर्ण नव्हता झाला, पण शेवटच्या टप्प्यात, मी गाडीतून उतरलो... कामगार येत जात होते, मी जणू काही मालकच असा शिरलो जागेत, बंगल्याच्या उजव्या बाजूने मागच्या बाजूला गेलो.
आनंद आणि दुःखाचे असे काही तरी विचित्र कॉम्बिनेशन मनात खेळ करू लागले, जुन्या घरावरची कौलं, लोखंडी मोरपिशी रंगाचे खिडकितले गंज, काही लाकडं... थोडक्यात भंगारा साठी जमवलेल्या पण माझ्यासाठी असलेल्या लहानपणापासूनच्या आठवणी अश्या जमिनीवर एकावर एक रचलेल्या!
डोळ्याचा कैक मेगापिक्सेल असलेला कॅमेरा मॅक्सिमम लेवल च्या अँगल मधून पॅन करत करत विहिरीपाशी आलो, दगडी आणि जेमतेम फूटभर उंची असलेल्या गोल कठड्यावर आता ३फुटी गोल भिंत पण आली होती! रहाट मात्र ठेवलेला आहे तसा होता... नशीबच त्याचं!
असो, आनंद ह्याचा की अश्या अवस्थेत का होईना निदान त्या आठवणी त्या दिवशी पाहायला मिळाल्या, दुःख ह्याचं की त्या कायमच्या जाणार कुठेतरी.
वस्तू काय, वास्तू काय...
जीव असतो त्यांच्यात!
म्हंटल तर निर्जीव,
पटलं तर सजीव!
आणि नाशिवंत,
म्हणजेच अंत आहेच प्रत्येकाला...
आणि डोक्याच्या लायब्ररीत असतच म्हणा सगळं,
आठवतं असं अधून मधून,
मग असं नाशिवंत जिवंत होतं,
डोकं जड होतं, मन हलकं होतं.
त्यातल्या त्यात #नशीबवान मी...
असं रिवाईंडचं बटण सहज सापडतं.
#सशुश्रीके ०३/०३/२०२०
Comments
Post a Comment