भयाण Corona

काय ना... २०२० वर्ष असलं उलथापालथ करणारं असेल असं वाटलं नव्हतं... वर्षाचा ३राच महिना! वर्क फ्रॉम होम करून ११ दिवस होतील आज, फक्त २दा बाहेर पडलो आहे ह्या दिवसात, आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मनुष्य मनुष्याला इतका घाबरायला लागेल! 

१० काय १०मिनिटे जरी एकटा असलो की कसं तरी व्हायचं, चुकल्या चुकल्या सारखं, आता सवय होत चालली आहे! 

किती वाईट ना, जग बदललं काही महिन्यांत, आता आपण बदलत आहोत, घरी रहा... सुरक्षित रहा च्या नावाखाली सगळे स्वखुशीने काही नाईलाजाने दबले गेले आहेत.

वर्क फ्रॉम होम आहेच पण ज्यांना शक्य नाहीत त्यांचे हाल, घरी बसून ज्यांना पगार हा पर्याय नाहीये त्यांचे! सकाळी संध्याकाळी त्यांसाठी प्रार्थना करतोय, निदान एवढं तरी नक्कीच करू शकतोय, ज्या संस्था अश्या लोकांना मदत करत आहेत त्याचे शतशः आभार.

उगाच / अत्यावश्यक कारण नसताना लोकं बाहेर पडतायत त्यांना हे कळत नाहीये की ते ह्या विषाणूच्या संपर्कात आले आणि त्यांच्या संपर्कात त्यांचे मित्र / नातेवाईक... अहो ते सोडा पत्नी-मुले ही येऊ शकतात आणि पुढे सांगायची गरज नाही, सगळ्यात वाईट गोष्ट अशी की लक्षणे उशीरा कळतात आणि तो पर्यंत उशीर झालेला असतो! लागण झालेल्या लोकांकडून इतर लोकांना आणि असं पुढे सुरूच! हे थांबायला हवं ना!!!

आता स्वतःची काळजी महत्वाची आहेच, पण इतरांची काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे, लोकांना कळवत रहा... घरात बसून जितके राहता येईल तेव्हढे रहा, स्वच्छता राखा, नियमित व्यायाम करा, थंड पिऊ नका, आजारी पडून स्वतःला कमकुवत करून ह्या विषाणूला प्रतिकार करण्याची क्षमता कमी करवून घेऊ नका.

अफवा पसरत आहेत आणि पसरतील ही, व्हाट्सएप फॉरवर्ड्स वर विश्वास ठेऊ नका. खूप सामान घरी आणून साठा करून ठेऊ नका, इतरांना ही त्याच सामानाची गरज असते हे विसरू नका. 'काही ही होत नाही...' असं म्हणणाऱ्या लोकांपासून दूर रहा. 

असो, 

काय करा काय करू नका ह्याचे डोस बंद करतो. 

काय आहे ना... काळजी वाटते, आपलं कुटुंब बरं न आपण बरे असा विचार ही येतो, पण जर जगच राहीलं नाही आजू बाजूचं तर काय ना? हे लिहितोय, लिहायचं होतं, काही वेगळच पण दुसरा विषयच नाहीये काही मिळत, सकाळ पासून रात्री पर्यंत आणि नंतर झोप नाही लागली तर रात्रभर हाच विचार घुटमळत असतो.

ह्याचा अंत लवकरात लवकर व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

चिंतातूर... पण घरात स्वखुशीने अडकलेला #सशुश्रीके | २९ मार्च २०२०

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!