प्लॅटफॉर्म

'प्लॅटफॉर्म'

इसी 'प्लॅटफॉर्म' पे...
अमीर देखें,
देखे हमने गरीबभी.
यहां देखी सुबह सुरजसे पेहले,
यहां देखी रात चांदके साथ,
यही रुकती थी जिंदगी हर तीन मिनट के बाद.
यही दिखते थे लोग अंजाने,
कोई घबराए, कोई मुस्कुराते,
कोई मेरे जैसे,
जाने अंजाने,
इसी 'प्लॅटफॉर्म' पे...

मस्त नाव आहे नई? मला तर जाम आवडतं, (प्लॅटफॉर्म म्हणजे... रेल्वे प्लॅटफॉर्म बद्दल बोलतोय, इतर ही प्लॅटफॉर्म असतात म्हणा पण मुंबईत राहिलेल्या माणसाला एकच प्लॅटफॉर्म माहीत असतो त्यातलाच मी एक, असो...)
त्यावर सगळी मंडळी (वाट बघत) असतात! अगदी न जन्मलेल्या जीवापासून ते अंतिम श्वास घेणाऱ्या जीवापर्यंत.
तिकीट खिडकीमधले काका/काकू निष्कामकर्मयोगाने तिकिटे देत असतात, आता तर काय, स्वयंचलित यंत्रे पण आहेत... पैसे घाला तिकिट बाहेर... मनात गाणं सुरु, "गाडी बुला राही है, प्लॅटफॉर्म  पे आ राही है". ह्या प्लॅटफॉर्म वर आपापल्या 'मंझिल' साठी लोकलची वाट बघत प्रवासाला सज्ज होतो मुंबईकर, कोणी फर्स्टक्लास मध्ये तर कोणी सेकण्ड तर कोणी थेट टपावर! कोणी पासवाला तर कोणी तिकिट, विना तिकीटवालेपण कमी नाहीत, ज्याची जशी परीस्थिती तसा तसा प्रवास.

ह्याच प्लॅटफॉर्मवर विरंगुळा विभागात प्रथम क्रमांक म्हणजे वजनकाटा, जणू प्लॅटफॉर्म वरचा विदूषकच, काचेच्या जेमतेम २x१फूट खोलीत रंगीबेरंगी गोळे, झगमगाट, माझे डोळे फिरायचे गरागरा... जणू बोलावताय ते मशीन, हिप्नॉटिझम का काय ते - तसलच काहीतरी! रुपया टाकला, उभे राहिले की ते छोट्या पुठ्ठयावर अचूक वजन सोबतीला (अचूक) भविष्य, काय तो सगळा ग्लॅमरस खेळ! हे सर्व एका रुपयात.

बाजूलाच अजुन एक गरगरणारं यंत्र... आरींज आणि लेमन फ्लेवर सरबत वालं, दिवसभर ते चालूच, काय तो उकाडा... थंड हवंच ना मग, त्या सरबताच्या पारदर्शक सिलेंडरचा नळ पलीकडल्या बाजूने उघडला की ते थंडगार पेय ग्लासात, अन् पैसे दिल्यावर थेट घश्यात... नाहीतर चिळकांड्या फोडणाऱ्या थम्सपच्या बाटल्या असायच्याच वाट बघत 'थम्सप'ची तहान लागलेल्या गिऱ्हाईकांसाठी, हो हो पाणी पण मिळायचे हं मागितले की! ते ही फुकट, आमची मुंबई आहे, तेव्हढी माणुसकी टिकून आहे अजून ही (नशीब).

तसं पाहिलं तर इथे मोठे-छोटे बिझनेस डिल्स पण होतात आणि 'बिजनेस डील' चालून येणे म्हणजे नेमके काय... ते बूटपॉलिश वाल्याशिवाय कोणालाच जास्त कळू शकणार नाही बाप जन्मात! त्यात पण खास लोकांचे खास बूटपॉलिशवाले, 'क्या साब आज जुता नही पॉलीश करवाओगे क्या!?' हे ऐकल्यावर प्रतिष्ठा बाळगण्यासाठी पाय पुढे!
पेपर, पुस्तकांचा ढीग असलेला 'बुकस्टॉल' ही असतो आमच्या प्लॅटफॉर्मवर, त्या बुकस्टॉलचा मालक कधीच काही वाचत नसतो, तो असतो रेडिओ किंवा टीव्हीत मश्गुल! आणि नाणी/नोटा मोजून पेपर उचलून 'नेक्स्ट' लोकलची वाट बघत मंडळी कोडं सोडवण्यात मग्न, कोणी मायापुरी फिल्मफेयर कोणी ठकठक न चंपक... जसं वय तसा विरंगुळा.
एक महत्वाचा भाग राहिलाच... एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी पदचारी पूल असतो ना! काही अनुभवी विद्वान ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्म वर येणारे ह्याची पूर्वकल्पना येण्यासाठी तग धरून उभे असतात, घोषणा होताच ज्या त्या प्लॅटफॉर्मवर पोचण्यात पटाईत. 

"प्लॅटफॉर्म क्रमांक १/२/३/४... पे आने वाली धीमी/जलद..." ची मराठी/हिंदी/इंग्लिश भविष्यवाणी ऐकू आली की प्लॅटफॉर्म वरची गर्दी अचानक पुढच्या वीस-तीस सेकंदात दुप्पट होते, लोकल ची वाट बघणारा मनुष्य आणि प्रसूतीगृहाच्या दरवाज्या समोरचा 'होऊ घालणारा' बाप ह्याचे चेहऱ्यावरचे हावभाव जवळपास सेमच असतात, ती लोकल आली की त्यात घुसायची घाई, घुसलेल्याला बसायची घाई, उतरणाऱ्याला उतरायची घाई, घाई'मॅक्स' ३० सेकंद झाली की परत ३-४मिनिटांनी 'देजावू'

एकदा तर एक गमतीशीर किस्सा ऐकला, एकाला उतरण्याची घाई म्हणून प्लॅटफॉर्मवर ट्रेन थांबण्या आधीच उतरला (ट्रेनच्या गतीशी मेळ साधून उतरावेही लागते) उतरल्या उतरल्या चढणाऱ्यांच्या गर्दीत अडकला, आणि मागच्या डब्यातील काही अजाण 'मदतखोर' मंडळींनी त्याला आत खेचले... तो 'मला उतरायचे आहे... चढायचे नाही!' हे सांगेपर्यंत परत आत ढकलला गेला आणि (परत) आतच राहिला.
 
मी एकदा कमी गर्दी म्हणून 'चुकून' लेडीज डब्यात गेलो, (अहो मुंबईतला पहिलाच आठवडा, जास्त माहीत नव्हती ट्रेन बद्दल) ट्रेन मध्ये घुसल्या घुसल्या आत बसलेला छोटा भिकारी म्हणाला, "किधर चढ गए... ये तो लेडीज का डिब्बा है!" हे ऐकल्यावर माझा सुपरमॅन झालेला, फरक एकच सुपरमॅन हवेत असतो मी प्लॅटफॉर्म वर! असो असे किस्से रोजच घडत असतील म्हणा, पण किस्से ऐकणे आणि अनुभवणे ह्यातला फरक त्यादिवशी कळाला!
असो, जमदग्नी टीसी मंडळी चोरांना पकडण्यात गोल्ड मेडलिस्ट! बरोबर हेरणार, अन जवळच्याच 'ऑफिसात' सोक्षमोक्ष तिथे दयामाया क्वचितच, "आपलं घ्या काहीतरी चहा पाणी" वगैरे भाषा नाहीच, थेट पावतीच ना!
हे असच असतं आपलं जीवन, प्लँटफॉर्म असतो अगदी त्या तिकीटविक्री खिडकी, वजनकाट्या पासून ते लोकल पर्यंत, तो प्लॅटफॉर्म खूप काही शिकवून गेलाय सगळ्यांना, त्या प्लॅटफॉर्म वर झोप उडते ही आणि लागते ही...

इसी 'प्लॅटफॉर्म' पे...
अमीर देखें,
देखे हमने गरीबभी.
यहां देखी सुबह सुरजसे पेहले,
यहां देखी रात चांदके साथ,
यही रुकती थी जिंदगी हर तीन मिनट के बाद.
यही दिखते थे लोग अंजाने,
कोई घबराए, कोई मुस्कुराते,
कोई मेरे जैसे,
जाने अंजाने,
इसी 'प्लॅटफॉर्म' पे...

#सशुश्रीके | १०/१६ एप्रिल २०१६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!