'किर्रक्केट'
॥श्री॥
क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती...
कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस!
आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे'... हे असले सु(कु)संवाद टेस्ट असल्यावर ५दिवस/मर्यादीत षटकांत अमर्याद वेळी आदळायचे अणि कानावर नो एंट्री चा बोर्ड फिक्स करून माझ्यासारखी निर्लज्ज मुलं मनसोक्त आनंद घ्यायचे! जिंकले तर सिकंदर हारले तर 'यार...हार जीत तो चलती रहती है' असा माच्युअर कंटेंट मारून पुढच्या मैच साठी कैलेंडरवर नोंद करून हातात बैट आणि स्टूल (स्टम्प) घेऊन 'इमैजिनेशन'युक्त सचिन अंगात आणत जो काही बैट घुमवायला जी मजा यायची! नो कंपेरिजन!!
दांडूका, फळी, प्लास्टिक, लाकडी, सीजन बैट, प्लास्टिक, रबरी, टेनिस बॉल जशी उपलब्धता तसं क्रिकेट, कोणी 'इंजर्ड' असल्यास त्याचे रूपांतर 'हम्पायर' नाही तर 'कॉमेंटेटर' मध्ये व्हायचं, आजुबाजूच्या 'जोशी काका/काकू'च्या दुपारच्या साखर झोपेचे विर्जण लावत त्रास द्यायला सर्व टाळकी अखंड अप्रत्यक्ष रीत्या तत्पर असायची, विलीन असायचे 'वाघमारे/जाधव/मुरकुटे'आजोबा, डायरेक्ट पालकांच्या घरात घुसून खटला भरायचे! मग त्याचा बदला त्यांच्या घराच्या/वाहनांच्या वर निघायचा!
शाळेत असताना मैच चालू असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष्य स्कोर किती झाला असेल, सचिन आउट तर झाला नसेल ना!? अश्या प्रश्नांची उत्तरे जास्त महत्वाची वाटायची खऱ्याखुऱ्या उत्तरांपेक्षा!
रस्त्यावर टीव्हीच्या शोरूम समोर असलेल्या गर्दीत इंचभर फटीतून दिसणारा स्कोर 70mm स्क्रीनही भरून काढणार नाही इतका आनंद द्यायचा! अनोळखी लोकांना टाळ्या द्यायला, त्यांच्याकडून गेलेल्या विकेट्स केलेल्या रन्सचे शाब्दीक हायलाइट्स ऐकायला कमाल मजा यायची!
ओफ्फिस मधून निघताना शेवटच्या काही ओवर्स बाकी असतील तर तेवढ्या संपे पर्यंत दिवसभर नको नको असलेल्या बॉस बरोबर उगाच गप्पा मारत बसणे, दुसऱ्या इनिंग चालू होण्या आत घरी पोचलो तर ठीक नाहीतर टैक्सी/रिक्षा मधला रेडियो ऐकत दातओठ खात जो काही उत्कण्ठावर्धक प्रवास घाडायचा, जॉय राइडच!
पायाला घाम येणे, उश्या/तक्ये आपटणे, रिमोटला भिरकाउन देणे, देवासमोर जाऊन उदबत्ती लावणे हे असले प्रकार व्हायचे शेवटच्या टप्प्यात... म्हणजे ~टेन बॉल्स ट्वेन्टी टू विन वन विकेट इन हैंड~ असलं गणित असलं की!
कोणी क्रिकेट बघायचे सोडु शकेल पण आमच्या सारख्या क्रिकेटवेड्या लोकांमुळे दुर्लक्ष करणं अशक्यच! एकूणच 'किर्रक्केट' नावाच्या आमच्या मित्राला खरखुरा जगन्मित्र म्हणायला काहीच हरकत नाही.
#सशुश्रीके | २१/०३/१५
Comments
Post a Comment