'राधानगरी'
'राधानगरी'
मुंबापुरीमधल्या बोरीवलीच्या 'श्रीगणेश' मधून त्र्यांणव साली पूण्यनागरीत आम्ही राहायला आलो, मॉडेल कॉलनीत, मस्त हिरवागार परिसर! प्रसिद्ध चित्रकार रवी परांजप्यांच्या घरा समोर पोस्ट ऑफिस आणि त्या पोस्ट ऑफिसच्या लगतचीच 'राधानगरी' नावाची तीन मजली इमारत, त्यातच आम्ही श्री.भगवान रबडेंकडून एक वन बीएचके विकत घेतला आणि आमचे 'पुणेरी' जीवन सुरु झाले.
खिडकी उघडली की गुलमोहराची थंडगार हिरवी सावली आणि त्यात त्याची लाल फुले आणि शेंगा डोकावत! त्या हिरव्या गर्दीत समोरच्या पोस्ट ऑफिस आणि बैडमिंटन कोर्टचा १०-२०% भाग दिसत असे, पावसाळ्यात तर हा सगळा परिसर इतका 'कूल' दिसायचा... आपलं यूरोपच ते!
काही गमतीदार क्षण आठवतायत त्यातला एक ठळक पणे आठवतो तो हा.. एक भंगारवाला आणि एक केळीवाली रोज दुपारी त्याचा 'बिझनेस' करायला यायचे, त्यांची जाहिरात ते स्वतःच्या 'सिग्नेचर' शैलीत करीत, भंगारवाला इमारतीच्या एका बाजूला आणि केळीवाली दुसऱ्या, पण भिन्न रास्त्यावर असूनही त्यांची ती ओरडण्याची अचूक वेळ असा काहीसा 'रीझल्ट' देऊन जाई --- 'भंगार~केळीय' - 'केळीय~भंगारे' --- हे ऐकून मला जी काही मजा यायची!.. आणि ते ही रोज!
शाळा जवळच होती म्हणजे चालत अर्धा तासावर, जंगली माहाराज रोड वरची मॉडर्न हायस्कूल (मराठी माध्यम) सकाळी बाबा सोडायचे स्कूटर वरून, येताना मात्र चालत, कैनल रोडचा शॉर्टकट मारत घरी आल्यावर दुपारच्या जेवाणानंतर अक्ख पुणं जेव्हा गुडुप व्हायचं, तेव्हा आम्ही मुलं अंगात उत/भूत/शैतान आल्यासारखे बाहेर पडायचो, फ्रिजच्या चावीचा गैरवापर करून 'चल मेरी लूना' करायचो आणि ते नाही जमलं तर जवळच्या बागेत, चित्तरंजन वाटिका मध्ये हुंदडायचो नाहीतर पालक नसलेल्यांच्या घरांत धुमाकूळ!
संध्याकाळी कॉलोनीतल्या प्रत्येक दादाच्या सायकल/बाइक/मोपेड वरून एक राउंडचा हफ्ता/हक्क सोडायचो नाही, मग रास्त्यावरचं एक टप्पा आऊट क्रिकेट... कधी कधी चेंडू परांजप्यांच्या घरात जायचा, पण मिळायचाही परत, खुद्द रवी परांजपे आणून द्यायचे, कधी त्यांचा नोकर, तेव्हाच कळलेकी त्यांचा मुलगा अधू आहे! वाईट वाटायचे, पण तेव्हा तीतकी गांभीर्यता नव्हती!
असो... बैक टू 'राधानगरी'... आमचा ३रा मजला होता, २ऱ्या मजल्यावर ढोबळे, १ल्यावर देशमुख... वगैरे वगैरे, तळ मजल्यावर एक ओफ्फिस होतं कॉम्पुटर असेम्बली-दुरुस्तीे, पार्किंग मध्ये ४ गाड्या आणि १० दुचाक्या, पुण्यात तेव्हा दुचाकीच जास्त, आता सारखं प्रत्येकाकडे गाडी हा प्रकार क्वचित होता तेव्हा!
आख्या बिल्डिंग मध्ये वन बीएचके होते, पण पुंडले, रबडे, काळे आणि अजून २ बिर्हाडं राहायची मात्र ३र्या माळ्यावर, सुरुवात आमच्या वन बीएचकेनी पण आमचा फ्लैट च्या पुढे तो रेल्वे लोकल डब्या सारखा निमुळता भाग जिथे १-१रूमच्या ५ खोल्या होत्या, अजून ही आठवतो अंधार, २ जणं कशीबशी जातील इतकाच पैसेज! ह्या 'राधानगरी' ची जान होती हा मजला!
• पहिली रूम... पाच जण राहायची, रबडे काका, त्यांना २ मुलं, रबडे काकांच्या बहिणीचा घटस्फोट झाल्यानी त्यांच्याकडे राहायचा तो नचिकेत, माझ्या दुपारच्या अपराधांचा बरोबरीचा साथीदार, काकू मात्र खाटेवर... आजारी असायच्या, काय रोग होता माहीत नाही, २ रा मुलगा पोलिओ झाल्यानी बिनकामाचा, एवढं सगळं असूनही रबडेकाका कधी वैतागलेले दिसायचे नाहीत, पहिला मुलगा कुठल्यातरी बिल्डरकडे नोकरी करायचा, असो... एक मात्र होतं, कधी ही गेलो त्यांच्याकडे नचिकेतला बोलवायला, की रबडे काका हातात खाऊ द्यायचे!
• आता पुढे दूसरी खोली... पुंडले, देशस्थ-बेशीस्त असे चिडवायचे बिल्डिंगमधले काही जण त्यांना, सारखी भांडणं, एक मुलगी एक मुलगा आणि पुंडले काका-काकू, त्या छोट्या खोलीत प्रकाशाला खेळायला जागा नव्हती… पण आवाज खूप खेळायचा! कधी रद्दी वरून कधी दुधावरून भांडणं, काहीही कारण चालायचं!
• मग उरल्या पुढच्या ३ खोल्या, काळे कुटुंब तरुण नुकतच एक पोर झालेलं, जास्त कधी संबंध आला नाही. १ खोली आणि राहणार अडीचजणं!
• उरल्या २, दोन्ही कुलूप वाली, १-१ = राहणार शून्य!
२ऱ्या मजल्यावर देशमुख राहायचे, आमच्या घराच्या बरोबर खालचा फ्लैट, आमच्या घरात कधी चुकून नळाचे पाणी चालू राहिले की त्यांच्या घराच्या सीलींगमाधनं पाणी गळायला लागायचं! म्हणजे काय दर्ज्याचं बांधकाम होतं हे सांगायची गरज नाही, असो!
पण खुप धमाल यायची राधानगरीत... पुण्याच्या हा पहिला टप्पा ९६साली संपला, आम्ही औंधच्या पुढे नव्या सांगवीत राहायला गेलो. म्हणजेच चिंचवडच्या बॉर्डरपाशी, जसं मुंबईला ठाणे तसेच पुण्याला चिंचवड, तो भाग पुण्यात जरी नसला तरी पुण्याचा संबंध तुटला नाही... कारण १३ आणि २१ नंबरी बस 'लिंक' होती पूण्यनागरीसाठी!
ती 'राधानगरी' सोडली पण तीथले किस्से, मजले, माणसे अजुनही जसे होते तसेच आठवतात, जणू काही सर्व थांबले तेव्हाच जेंव्हा आम्ही सोडले ते घर, अजुन ही पुण्यात गेलो की मुद्दामुन मोडेल कॉलोनीच्या त्या राधानगरी लगतच्या रोडनी नक्की जातो, जाताना सर्व मित्र 'अप्रत्यक्षरीत्या' भेटतात, त्यांच्याकडे पाहुन ती ३वर्षे एका सेकंदात फास्टफॉरवर्ड होतात!
#सशुश्रीके । ५ सेप्टेंबर २०१५ ३:२०
Comments
Post a Comment