सरप्राइज

सरप्राइज
आता पर्यन्त नीरनीराळे सरप्राइज मिळाले...
लहानपणी खेळणी...साईकल...
कधी कधी चांगले मार्क्स!!!
कधी परदेशातुन अचानक वडील घरी यायचे,
अमृता 'हो' म्हणाली... लग्न झाले...
मुलगी झाली... असे खुप प्रसंग...
अगदी पैंटच्या खिश्यात ५ची नोट जरी मिळाली,
तरी ते सरप्राइजच की हो!

छोट्या मोठ्या प्रमाणात असतं
पण सरप्राइज हे सरप्राइज असतं,
मोजण्या मापण्या इतकं सोपं नसतं...
तुमचं न आमचं कधीच सेम नसतं...
सरप्राइज हे सरप्राइज असतं!

ह्यावेळचं सरप्राइज हे दुतर्फी होतं!
मला मिळालेल्या सरप्राइजवरती मारलेला सिक्सर म्हणा!
म्हणजे मला सुट्टी नको असताना सुट्टी घे...
"यू डिज़र्व इट म्यान!" असं म्हणणारा बॉस मिळणं!!!
हा पण एक सरप्राइजच...
तडीक स्पाइसजेट विमान संकेतस्थळ गाठले,
आरक्षण पाहिले, स्वस्त आणि मिळण्याइतपत जागा ही होत्या...
आमच्या अंतिम निर्णय देणाऱ्या अधिकार्यास विनंती पाठवली,
त्याने हरी झंडी दाखवल्यावर आता फ़क्त मोठ्या सहेबांचा अडथळा उरलेला...
तो ही सुरळीत पार पडला! असं सगळं जुळून आलं हो!!!
आता मात्र -महा-पूण्यवान मी- असं म्हणायला हरकत नाही.

माझी अन्वया दिसणार दोन दिवसांनी..
आठवडा कसा काढला मलाच माहीत...
हातात आरक्षण आल्यावर खुप खुश झालो!
शारजा हून फ्लाइट होती,
आणि नेमका खुप ट्राफीक असलेली वेळ त्याचे टेंशन,
कधी आलं नाही आधी इतकं टेंशन,
कारण आलेली सुवर्ण संधी मला ट्राफ्फिकच्या कारणासाठी वाया घालवायची नव्हती,
त्यात ऑड़-डे त्यामुळे ऑफिस ट्राफ्फिक लागणार ह्याची खात्री होती...
पण मित्रानी सांगितले की ९पर्यन्त नीघ १चं उड्डाण आहे, काळजी नको...
साडे नउला पोहोचलो...
टैक्सी वाला होता पेशावर चा...
जगभरात काय चाललय आणि इतर छोट्या गोष्टी
मग माझं सरप्राइज ऐकून त्याला गम्मतच वाटली,
म्हणाला... "आप जैसा आदमी पहली बार देखा... "
मी म्हणालो आप भी ट्राय करो...बड़ा मजा आएगा!
बिचारे दोन-दोन वर्ष घरच्यांची तोंड बघत नाहित हे लोक!
असो...

फ्लाइट वेळेत निघाली...
अखंड प्रवासात डोळा लागला नाही...
आधीच सरप्राइजची उत्सुकता,
मग काय गाणी ऐकत बाहेरचे छोटे छोटे बघत बसलो दिवे,
मग बोर झालं म्हणून लिहायला घेतलं...
आधीच प्लान केलेलं काय लिहायचं...
अगदी उलटं...
कारण नेहमीचे लेख लिहिताना मला काहीच ठराववं लागत नाही,
घडलेल्या किश्श्यांवर माझी खर्डेघाशी असते,
पहिल्यांदाच फिक्शन लिहायचं म्हणजे जरा नवीनच माझ्यासाठी,
लिहित गेलो... लिहित गेलो... तेवढ्यात पुणे आलं,
झोपेची चाहूल लागायला लागलेली आणि आता उतरायची वेळ झाली.

पुण्याच्या 'लग्नाच्या हॉल' एवढ्या एअरपोर्ट वरुन
बाहेर पडायला अक्षरशः तीस मिनटं पुरली..
पुढचा अर्धा तास रिक्शा...
सुरश्रीच्या आइकडे गेलो, टब्बी
(आमचा आठ वर्षाचा म्हातारा कुत्रा) ला भेटलो,
लाल भड़क आयटेन घेतली नी सिंहगड रोड ला मित्राकडे गेलो...
कारण नंतर त्याच्याकडे जाणे जमले नसते,
मस्त फ्रेश होऊन जराशी डुलकी मारून, पोहे चोपुन...
निघालो कार्यालयात..लग्न कार्यालय!
आणि नेमकं मला माहीत नव्हतं की कुठाय लग्न...
आई बायको ला विचारलं तर सरप्राइज फुटायची भीती...
कसा बसा ह्याला त्याला विचार करत करत...
समजलं की गूडलक चौकतुंन सरळ आत जाणारी गल्लीत आहे,
नाव नाही कळालं,
आणि सुट्टीची तारीख पण असली सॉलिड की त्यात दोन लग्न!
ज्या साठी पॉगी अन बायको आलेत, असो...
मी सरप्राइज द्यायला तयार होतो...
एरवी सदानकदा फ़ोटो काढणारा मी,
त्या दिवशी डोळ्यात सरप्राइज साठवण्यासाठी रेडी होतो.
हातात काही नाही... ना फोन ना कैमेरा...
कार्यालयाच्या मागच्या बाजूने एंट्री मारली
त्यामुळे नक्की हेच का ते कळेना...
कारण सजावट वगैरे दिसलीच नाही,
मग लक्षात आलं जेव्हा जरा पुढे आलो
मग रांगोळी आणि लोकांची रेलचेल दिसली...
लग्न कार्याची पाटी ही होती! निःश्वास टाकला.

हॉल मध्ये जाताच माझी नजर ओळखीच्या लोकांवर पडायला सुरुवात झाली,
तांदुळातून दगड वेचतो त्याच्या नेमके उलटे चालले होते..
आणि तेही विद्युत गतीने,
अमृता आणि अन्वया दीसली...
त्यांचे लक्ष्य नव्हते...
नजर उजवीकड़े फीरवताच आई दिसली...
दोन तीन बायकांशी बोलत होती...
बघितलं माझ्या कडे आणि बघुन न बघितल्या सारखं
पण तीला कळेना की मी नक्कीच समीर आहे!?
की माझ्या सरखा कोणी दूसरा!
पण दोन सेकंदातच तीचा शिक्कामोर्बत झालं
की मीच तो... तो मीच
आणि जी काय तीची मुद्रा बदलली!!!
"अरे समीर!!! इथे कसा काय..."
आणि अजुबाजुला आईला बघुन माझ्या दिशेने पाच सहा तोंडे वळाली...
त्यांचं पण असच काहीसं झालेलं...
"अरे समीर!!! इथे कसा काय..."
ह्या सारख्या वाक्यांचा पूर यायला सुरुवात झाली
माझं कोणाशी बोलू कोणाला बघू असं झालेलं,
त्यात मला मला अन्वया दिसली...
तो दहा किलोचा नाजुक जीव अमृताच्या कडेवर पाहुन
जे काही डोळे चमकलेत माझे!
अमृताला कोणी तरी सांगितले की मी आलोय...
ती म्हणाली "अहो नाही हो... तो दुबैत आहे, त्याला अजुन एक वर्ष सुट्टी..."
असं म्हणता म्हणता माझ्या कड़े लक्ष्य गेलं,
अन्वयानी जी काही मिठी मारल्ये!

दिवसाढवळया भूत दिसावं असच काहीसा प्रकार अनुभवत होते सर्व!
माझं सरप्राइज सफल झालेलं!
तोंडात तीळ भिजत नाही,
आणि अश्या तत्सम सर्व म्हणींना मी क्लीन बोल्ड केलेलं!!!
आयुष्यात पहिल्यांदा असा पराक्रम केलेला...
त्याचं गोल्ड मैडल ही मिळालं...
मी स्वतःलाच सरप्राइज दिलेलं!

सरप्राइज!!!

#‎सशुश्रीके‬ | २ डिसेंबर २०१४

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!