संगीताचा राजा (A.R. Rahman in Dubai)

संगीताचा राजा, भाग १


महिन्यांपूर्वीच कळालं होतं, साहेब येणारेत दुबईत, तेव्हा पासूनच डोक्यात विचार घोळत होता.
जायला मिळेल का? जायला मिळालं तर भेटायला मिळेल का? भेटायला मिळालं तर फोटो काढायला मिळेल का / बोलायला मिळेल का! आणि सर्वात महत्वाचं सुफी संगीत… साहेबांचा हातखंडा असलेला विषय!

जायला मिळेल का? असं का म्हणतोय मी असा कदाचित प्रश्न पडला असेलच!? सांगतो, सांगतो...
दोन गोष्टी > पहिली... मी एडव्हर्टाइजिंग मध्ये 'राबतो' त्यामुळे, कधी काय काम 'उतू' येऊ पाहिल सांगता येत नाही! > दुसरी अशी की आमचे साले साहेब, चैतन्य गोगटे सहकुटुंब येणारेत, हे माहित असल्यानी जरा काळजी होतीच जायला मिळेल का नाही ह्याची!

असो, दिवस जस जसे जवळ येत होते तसतसे आमच्या दुबई रेहमान ग्रुप वर त्याला भेटण्याच्या संधीचे निकष लागत होते, उदय आणि आनंद आणि मी सतत संपर्कात होतोच!
आणि मग तो दिवस उजाडला… मुख्य कार्यक्रमाच्या आधिची रीहल्सल! आणि मी अजून ही तिकीट काढलेलं नव्हतं आनंद व्होट्सेप्प वर म्हणाला आपण आज संध्याकाळी जमतोय ७ वाजता... वर्ल्ड ट्रेड सेंटरला शेख सईद हॉल मध्ये!

काम खुप असूनही जेवढे होईल तेवढे पटकन उडवून निघालो... हो सहजा उडवत नाहीच पण आज 'उडायचं' होतं म्हणून उडवलेच!

मित्राला घरी सोडून परत शेख सईद हॉलला पोहचे पर्यंत ८ वाजलेले, मी रहमैनीएक मित्राला - आनंदला फोन लावत होतो मध्ये मध्ये… तो म्हणाला हॉल पाशी आलास की कॉल कर, हॉल पाशी अपेक्षे प्रमाणे सेक्युरीटी गार्ड होताच! त्यानी काही विचारण्या आधीच मी फोन काढला आणि आनंदला विचारायला सुरुवात केली… तो म्हणाला त्याला सांग म्हणाव 'विजय नी आत बोलावलय' (विजय रहमानचा पी.ए.)

हे ऐकताच त्यानी विचारलं, 'विजय तुला घ्यायला येणार आहे का इथे!' मी म्हणालो, नाही तो 'बीजी' आहे… (नंतर कळाले की अजुन विजय अजुन आलाच नाहिये) मग माझ्याकडे हसून म्हणाला… 'जा'... तो 'जा' म्हणायचाच अवकाश…

माझे पाउल हॉल मध्ये… सुफी संगीताचा आवाज येत होता… आणि साहेबांचा आवाजही येत होता! मला काही अजून कळायच्या आधीच साहेब दिसले स्टेज वर! सुन्न झालो क्षण भर! २०११ला झालेल्या दुबैतल्या कार्यक्रमानंतर आज पाहत होतो रेहमान ला प्रत्यक्ष... तेवढ्यात आनंद आला माझ्या जवळ, त्यांनी विचारलं काही प्रोब्लेम तर नाही आला ना!? मी झालेला प्रकार सांगितला, तेवढ्यात उदय आला, त्याच्याबद्दल ऐकलच होता फक्त, आज भेटला, अजून २ पंखे होते आमच्या सारखे! त्यांनाही भेटलो, आणि प्लाटीनम सीट्स वरती आम्ही सर्व जाउन विराजमान झालो! (त्या सीट्सचे टिकिट होते २५००... म्हणजे जवळ जवळ ३५०००ते ४००० रुपये!) ह्या सर्व प्रक्रियेत माझे सर्व लक्ष मात्र रहमान कडे होते! राखाडी रंगाचा फुल बाह्यांचा पोशाख, खांद्यावर लेदरचा भाग असलेला तो शर्ट
काय दिसत होता रहमान… अगदी शांत आणि त्याहुन मग्न!

क़ौटीअंम फिंगर बोर्ड वरती राजे, बोटं अगदी थंड रेतीवरून हात फिरवावा अशी फिरवत होते, आणि ते अती मोहक सुंदर लयबद्ध संगीत, त्या 'सुफी' महालात जणू कोपरा न कोपरा उजळवत होते! डावीकडे राजा आणि त्याची प्रजा बसलेली मध्ये, प्रधान (शिवमणी) उभे होते दरबारात, नेहमीप्रमाणे उत्साही साईबाबा टोपी आणि हातात जादू!

मध्ये मध्ये मागे त्या महालात टेक्नोलोजीक महाविश्कार पण घडत होते थ्रीडी मैपिंग की कायतरी म्हणतात त्याला...'महाल' 'अंतराळ' 'सुफी' 'अल्लाह' अशी थीम असलेली ग्राफिक्स त्या प्रचंड मोठ्या स्क्रीन्स वर सेट होत होती!

रेहमान मध्येच उठला… आमच्यात कुजबुज… बॉस बघ! आनंद रेहमानला बॉस असे संबोधतो! मग काय... आम्ही पण बॉस म्हणायला लागलो! बॉस आमच्या जवळच्या टेबलावरून मुसिक कंट्रोलर सेटअप पाशी गेला,तिथे जाउन खुर्चीत बसून महालाकडे पहात बसला, कधी मध्येच उठे, कधी डोळे बंद करून बसे, आम्ही सर्व मध्येच त्याच्या कडे बघत बघत चालू असलेल्या रियाजाचा आनंद घेत होतो! तेवढ्यात महलात आमच्या राजाची राणी आणि राजकन्या आली!, तो मात्र मग्न होता, तेवढाच शांत आणि मग्न, पण जारावेळानी का होईना २-३ शब्द बोलून परत सुरु. त्याला काय आवडत नव्हते, काय 'मिसिंग' आहे, ह्याची नेमकी माहिती कमीतकमी शब्दात तो प्रजेला कळवत होता, आम्हाला कमालीचा आनंद मिळत होता त्याची वाणी ऐकून…

दम मस्त कलंदर सारखी पारंपारिक सुफी गीते, प्रजा अगदी सहजपणे सादर करत होती, आता बॉस परत आला स्टेज वर… आणि सोबत आला मुस्तफा ब्रदर्स आणि त्यांचा मुलगा, डोक्यावर टोपी आणि साधे काळे ज्याकेट, आणि गळ्यात २४क्यारेट सोनं, साखळी नाही, आवाजाबद्दल बोलतोय! काय गायलाय पट्ठ्या! गाणे संपले, आनंदने शिटीच मारली उत्साहच्या भरात... मी त्याला म्हणालो सूफी आहे रॉकसंगीत नव्हे!...असो तेवढ्यात बॉस नी 'ग्रेट' असा एकशब्दी, पण प्रशंसेचा कळस असलेला शब्द त्याच्या दिशेनी सोडला!आम्ही फक्त तोंड O करून हा सर्व प्रकार साठवत होतो आमच्या काळजात.

आता रात्रीचे १०.३० झालेले... महाल भलताच तल्लीन झालेला...रिहल्सल सुरु होऊन अडीच तास झाला, अचानक सर्व थांबवले गेले!
क्रमश:

#साशुश्रीके | १८ डीसेंबर २०१४

संगीताचा राजा - भाग २

ऐन रंगात आलेली सभा अचानक बरखास्त केल्या सारखी...सर्व वादक आपआपली वाद्य आणि गायक आपआपले गळे सांभाळत महलाला सोडून जाउ लागले... अमच्या चेहऱ्या वर निराशेची लाट स्पष्ट दिसत होती... काही न बोलता एकमेकांकडे प्रश्नचिन्हांचे बाण सोडत असतानाच राजे परत महालवर आलेले दिसले, आता कोइन्टिअम फिंगरबोर्डही सुरक्षालेटीत जाताना पहिल्यावर आता महाल बरखास्त होणार ह्यावर आमचं शिक्कामोर्तब झालं!

आनंद म्हणाला... आत्ताच वेळ आहे... राजे निघतायत, आता काहीकरून भेटायला हवच, जसाजसा राजा महाल सोडून बाहेर जायला निघाला तसा तसा आमच्या सर्वांच्या पायला वेग आला... आता रेहमान अगदी जवळ... आजुबाजुला आमच्या सारख्याच वेड्यांची गर्दी...
त्यात काहीजण 'सेल्फ़ी' साठी तडमडत होते, ज्यांना त्याच्याबद्दल माहीत काही विशेष माहीत नव्हते (ड्राइवर्स आणि इतर साफसफाई कामगार... काही फिलिपिनो काही एजिप्शिअन, पाकी, अफगाणी) ते ही फ़ोटो काढण्यासाठी पुढे मागे...
माझ्या मनात फक्त इतकेच की 'त्याला काही त्रास होउ नये ह्या गोष्टीचा, आज नाही तर नंतर कधी तरी भेटेल' असं करता करता शेवटी गाडी पाशी हा प्रचंड गोंधळ येऊन ठेपला... राजे वहनात बसे पर्यंत तो जनसमुदाय साखराला मुंगी लागल्या प्रमाणे त्या प्रसंगाला चिकटला होता!

गाडी सुटली... आशेचा किरण संपला... तेवढ्यात राशिद अली दीसला, आनंदनी त्याच्यापाशी जाउन हाय हेल्लो करत 'परत येणार आहात का... रीहलसल साठी?' असा महत्वाचा प्रश्न विचारला... त्याला उत्तर मिळाले!

"हा भई... डिनर ब्रेक के बाद मिलते है"

हे ऐकून धोणीने शेवटच्या चेंडू वर सिक्स मारावा आणि आपण सामना जिंकावा असा काही माहौल झालेला!

क्रमश:

#सशुश्रीके | २२ डीसेंबर २०१४ रात्रीचे १२.२४

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!