लिफ्ट

'लिफ्ट'

जाम पाऊस पडत होता, रात्रीचे ११वाजत आलेले, एक रिक्षा थांबायला तयार नाही, शंभर टक्के भीजलेलो, तेव्हढ्यात एक स्कूटरवाले काका थांबले, हेल्मेटवरची फुटलेली काच वर करत 'कुठे जायचय' ची खूण केली, मी म्हणालो... 'डेक्कन' मागे बसायची खूण केली, मी पटकन जाऊन सवई प्रमाणे उगाच सीट हातानी झटकुन बसलो, अर्धा तास भिजल्यानी थंडीने कुडकूडत होतो, त्यात लांब पाय टाकून स्कूटर वर 'आई आई ग्ग'करत कसाबसा बसलो... क्रैंम्प आलेला बेक्कार! काका मागे न वळताच, काय झालं रे?ची 'खुण करत' तोच हात झटकनी गीयरवर टाकून जोरात पिकअप घेतला, मला काहीच उत्तर देता येई ना, ओठ-दात चावत अभाळाकडे पाहत... पाय तसाच सरळ ठेवत बसलेलो अपंगा सारखा, मधले खड्डे वगैरे न चुकवत काका भरधाव निघाले. रस्त्यावर कोणी गाडी चालवताना दीसे ना मला, सगळे झाडांखाली, कोणी दुकानाच्या आडोशी, जिथे पाऊस कमी लागेल असे थांबलेले.
शिवाजी नगर आले, सिग्नल वगैरे बंदच होते, तिथे एक मझ्यासारखाच मुलगा थांबलेला, त्याच्या समोर जाऊन स्कूटर थांबवली, मी लगेच उतरलो, अखडलेला पाय झटकत, हे सगळे चालू होते तेव्हा त्या मुलाकडे पाहत काका तशीच 'मागे बसायची खुण' करत गीयर टाकायच्या तयारीत! 

बरं, त्यांची स्कूटर पण काही मोठी नव्हती, चेतक किंवा वेस्पा कश्या बऱ्यापैकी मोठ्या असतात, त्यांची होती 'प्रिया', पण ते होते अडदांड! मीच कसाबसा मावलेलो त्यात आता ट्रिपल सीट म्हणजे, मी म्हणालो 'काका, तुम्ही दोघे निघा... डेक्कन जवळ आलेच आहे, मी जाईन चालत' हे सगळे त्यांना ऐकू आलं नसेल बहुतेक मला परत 'मागे बसायची खुण' करत गीयर बदलायला परत सज्ज!

मी गपगुमान जागा अड्जस्ट करत कसाबसा बसलो, तो मुलगा मध्ये आणि मी स्कूटरच्या मागच्या स्टेपनीला न बघताच घट्ट पकडून न पडण्याच्या प्रयत्नात! पावसानी अजुनच जोर पकडलेला...अक्षरशहा काही दिसत नव्हतं, इतका पाऊस! कधी एकदा डेक्कन येतय आणि मी उतरतोय असं झालेलं.
गुडलक चौका पाशी आल्यावर मी म्हणालो 'काका थांबवा, इथे उतरतो मी', स्कूटर काय थांबेना! मग त्या मुलानी त्यांच्या खांद्यावर जरा हात लावत सेम मी जे बोललो तेच बोलला, स्कूटर थांबली. गुडलक ओलांडून आम्ही ऑलमोस्ट गरवारे ब्रिजपलीकडे आलेलो.

दोघे उतरलो, मग ते काका पण उतरले. हेल्मेट काढलं आमच्या कडे हसत हसत बघत स्वतःच्या काना आणि तोंडाकडे बोट दाखवत दुसऱ्या हाताचा अंगठा हलवत परत बसले स्कूटरवर, सिग्नलला यू टर्न मारून गायब!
आम्हाला काही बोलायचं सुचलच नाही, तो मुलगा त्याच्या वाटेला आणि मी माझ्या वाटेला लागलो.
त्यारात्री नंतर मी कोणाच व्यक्तीला 'लिफ्ट'साठी नाकारले नाही.





#सशुश्रीके | १३ ऑक्टोबर २०१५

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!