दही पूरी...

दही पूरी...

 























नव्या सांगवीत राहायचो तेव्हा सांगवी फाट्यावर ४-५ गाड्या असायच्या...गाड्या म्हणजे, एक चायनीज, २भेळवाले.. वडापाव भजीपाव वगैरे, अश्या गाड्या, पुण्यातुन बसनी आलो की, किंवा संध्याकाळी सायकल वरुन घरी येताना 'अनअव्होईडेबल' अश्या त्या गाड्यांमधल्या त्या भेळवाल्याकडे माझे पाय जाऊन थांबायचे स्टूलापाशी... गम्मत म्हणजे त्या स्टूलावर कधी बसलेल्या भेळवाल्याला मी कधी पाहिलच नाही, बघावं तेव्हा हातात मोठा चमचा, मसाला पूड, पुऱ्या वगैरे वगैरे, अखंड भेळ-पूरी-पुराण चालूच!

२ भाऊ होते, राजस्थानी असावेत, एक गायब असला की विचारायचो कुठे गेलाय!? उत्तर असायचं 'गाँव गया है, आजाएगा अगले हफ्ते', दोघांच्या हातात जादू होती...त्या जादूसाठीच गर्दी असायची, एक पाणी पूरी खाल्ली की २री खायच्चच पब्लिक! मला भेळ आवडायची नाही इतकी, कधी भेळ खायची इच्छा झालीच तर मुठभर खारे दाणे टाकायला सांगायचो, पण पूरी रिलेटेड सगळं खायचो, रगडापूरी, शेवपुरी, शेवबटाटादहीपूरी वगैरे... हे सर्व लिहायचा खटाटोप इतक्या साठी की त्याच्याकडे दहीपूरी असली भन्नाट चवीष्ठ लागायची की बस! विचारुच् नका, असं मस्त सरसरीत दही, ना घट्ट ना सैल... मस्त टमटमीत पुऱ्यांमध्ये हिरव्या वटाण्याचा अर्धा चमचा रगडा, त्यात ते दही... वर तिखट, मीठ, न मसाला आणि शेवेचे आवरण! ५रूपयात तोंडात खळबळ, ते दही जिभेला टेकलं की शेवटच्या बॉलवर षटकार बसावा तसा जल्लोष व्हायचा तोंडात! अक्खी पूरी तोंडात घालताना नकळत डोळे बंद व्हायचे, इतका मोठा 'आ'करून जो काय आनंद यायचा... 'कमाल' बाकी काही शब्दच नाही!

पण इतका ही विशेष नव्हता तो प्रकार, म्हणजे आपण म्हणतो ना 'आउट ऑफ़ धिस वर्ल्ड' वगैरे, तस्लं काही नाही... एकच ईनग्रेडीअंट इतका जबरा होतं...ते म्हणजे ते वापरायचे ते दही, जान होती जान, हे आज कळालं लिहिता लिहिता... कारण त्यानंतर जेवाढ्या जेवाढ्या ठिकाणी चाट ट्राय केले, तिथे तिथे घट्ट दही गोड चटण्या आणि हल्ली 'सोफेस्टिकेटेड' बिसलरी पाणी पूरी वगैरे! 

आता ते बंधू परिहारचौकाच्या अलीकडे एका भेळवाल्याकडे काम करतात, काही वर्षांपूर्वी गेलेलो तेव्हा भेट झाली, एकमेकांकडे बघुन मी जूना प्रश्न विचारला... तोच... कुठे गेलाय भाऊ, दिसत नाही!? उत्तर होतं 'गाँव गया है, आजाएगा अगले हफ्ते'

#सशुश्रीके । ५ ऑक्टोबर २०१५



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!