आक्षी!

आक्षी!

ती तुम्हाला वाटते ती आक्षी नव्हे!
नको तेव्हा येणारी किंव्वा पाहिजे तेव्हा न येणारी! ती नव्हे,
अलिबाग आणि नागाव या दोघांच्या मध्ये असलेलं छोटसं गाव म्हणजे आमचं 'आक्षी'

एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर जशी खळी पडावी ना अगदी तशीच खाली म्हणजे वळणावरच्या रस्त्यावरचा  - आक्षी चा स्तंभ, आणि त्याच वळणावर यायची ती सुंदर लाल-पिवळी साडी नेसलेली एसटी, सुंदरच ती! सौन्दर्य मनात असतं, बाह्यरूप किती ही कळकट्ट असलं तरी! असो, एसटी थांबली की पु.लं.च्या त्या यस्ट्यी सारख्या सर्व घटना पार पाडून झाल्या आणि एकदाचं त्या स्तंभावर ब्यागी ठेवल्या की सुरू व्हायची शर्यंत त्या मे महिन्याच्या सुट्टीच्या आखुड वाटणाऱ्या सुट्टीशी, माझी!

उतरल्या उतरल्या आधी दिसायचा स्तंभ, पण माझं लक्ष्य असायचं ते एका हातगाडीवर, ती असली की माझ्या खिश्यात्ल्या एका रुपयाला जणू हजार रुपयांची किंमत यायची, एक रुपया वडा पाव, कुंठेकर काकांचा! पोटात कितीही ऐवज असला तरी तो वडा-पाव खाल्ल्याशिवाय माझी गाडी पुढे जायची नाही, गेले कित्त्येक वर्ष ते वडा-पाव एक रुपयालाच विकतात म्हणजे दर वर्षी वडयाचा आकार कमी व्हायचा, मग काय ३ वडे आणि १ पाव, अहो हाय काय न नाय काय, पण काय असायचा तो, जगात काहीच गोष्टी अगदी मनाला हव्या तश्या असतात त्यापैकी पहिल्या पंक्तीत बसायचा हा वडापाव! २-३ फ़स्त करत करत पाय तुडवीत मी पुढे आणि आई मागे, मध्येच १० जण माझ्याकडे बघत डोळे लहान मोठे करत, "अरे आप्पांचा नातू ना तू? अरे शुभदाचा पोर ना तू?" अणि मी म(अ)तीमंद हास्य देऊन आई कडे बोट दाखवायचो! मध्येच चिंचा उचल, झाडाची फांदीच तोड, त्या तुटलेल्या फांदीचा (सदु)उपयोग करत येणा-जाणाऱ्या वाहनांना अडथळा कसा होइल त्याची योजना आखत... मध्येच बांधकाम चालू असलेल्या घराच्या विटांच्या डोंगरावर शिवाजींची पोज देऊन त्या तोडलेल्या फांदीची तलवार घुमवत, आईचा मार खात, तो रस्ता अक्षरशः गाजवायचो ! आता मोठेपणी उमगतंय किती (नको इतकी) मस्ती होती माझ्या अंगात! असो.

मुख्य रस्त्याच्या बाजूलाच एक शाँर्टकट होता, ३-४वाडीन्मधून एक छोटी पायवाट, तशी अगदी छोटी नाही पण रीक्षा जाऊ शकणार नाही इतपत छोटी, पूर्वी २ वाड्यांमधून तारा असायच्या सीमारेष म्हणून, आता पैसा आला, माज आला, आता मात्र मोठ-मोठ्या भिंती असतात, आणि त्या भिंतीवरती फोडलेल्या बाटल्यांच्या काचा सुद्धा!

नारळ, जाम, चिंचा, आंबे, चिकू, पेरू... झालच तर चाफा, सोनचाफा.. सारख्या श्रीमंत फुलापानांनी नटलेल्या  मैफिलीतुन समोर परत पक्का रस्ता दिसायचा, बाजुलाच शाळा, हो त्याच शाळेत मी कधी एके काळी रात्री पडद्यावर सिनेमे पाहिलेले, त्या शाळेच्या समोरच देवीचं देऊळ दिसलं की आता २ मिनिटांनी घर, माझा वेग अजुन वाढायचा, “अरे समीर हळु, जरा... ” (पुढचं बोलण ऐकू येई पर्यन्त मी अजुन पुढे तडमडलेलो असायचो) शेणात पाय काय, हातात काठी काय, अश्या निरनिराळ्या असंबद्ध गोष्टींच्या शर्यतीतुन मी घराच्या फाटका पाशी यायचो, संपली संपली… शर्यत संपली! आजी दिसली! काय सुन्दर होता तीचा चेहरा! मला नाक आधी दिसतं व्यक्तीचं, अतिशयोक्ती अजिबात नाही, तिच्या नाका सारखं छान नाक मी कोणाचच नाही पाहिलं आता पर्यंत! काम करून करून तीच्या पदराला जो काही घामाचा वास यायचा, अहो काय सांगू! नाही नाही, आता डोळेच भरून आलेत हे सगळं लिहिताना, टीशर्ट, बोटं, डोळे ओले झालेत, आजीला बघितल्याच्या आनंदापाई पायर्‍या चुकायच्या, तिथुनच मेली परत धडपड सुरू, तीला मिठी मारून झाल्यावर मागच्या अंगणात जायचो का तर, आंबे किती लागलेत बघायला, त्याची शहानिशा झाली की परत धडपडत पडवीत, बांबुच्या काठ्यांचा च्विक च्विक आवाज करणारा दणकट पण म्हातारा झोपाळा दिसला की माझ्या अंगात जो काही शम्मी कपूर यायचा! फक्त आक्षीतच झोपाळ्याची मजा घेता यायची ना!, गदी कधीही, केव्हाही, किती ही वेळ, उभा राहून, बसून, झोपून सर्व प्रकारे झोपाळ्याचा मनसोक्त आनंद घ्यायचो!

आक्षीत माझ्या मस्तीला कधी ओहोटी आलीच नाही, अखंड भरतीच! त्या झोपाळ्या वरूनच आजीला ऑर्डर, "आजी भूक लागल्ये!" दडपे पोहे / घावन / जेवण जशी वेळ असे तसे ओरपायला मोकळा, आजोबा वाडीत / गोठ्यात / विहीरीपाशी असायचे, कायम २ एमएम दाढी, धोतर आणि बाटाची झिजलेली सैंडेक चप्पल, पावसात चालता यावं म्हणून जमीनीवर ५-६ इंचाचे अंतर सोडून फरश्या असायच्या.. त्यातला विषम फरश्या सोडून मी विहिरीच्या दिशेनी धडपडायचो. थंड विहीरीचे पाणी तसेच बेडकांनी समृद्ध अश्या त्या दगडी विहीरीच्या पाण्यात बादलीचा धप्प आवाज आला की काय आनंद मिळायचा की बस!
आप्पा, माझे आजोबा, 'आप्पा' म्हणायचो आम्ही सगळे, भयंकर तापट! माझ्यासकट सगळे घाबरायचे आप्पांना! २-३ कोकणस्थी शिव्या असायच्याच त्यांच्या तोंडात फोडणीला, त्यांच्या बरोबर चिमीला, 'चिमी' आमची म्हैस, पु.लं.च्या म्हशी सारखीच, जास्त दूध नं देणारी आणि जाम लाडावलेली! तिच्या नाकात तिची लांब जीभ गेली की असली मजा यायची बघायला, तिच्या पोटावर काठी लावली की मस्त हलवायची तीची काळी केसाळ चामड़ी! गुदगुल्या, लहान भूकंप व्हायचा अंगावर तिच्या!

सर्व खोल्यांचे, तिथल्या सामानाचे, काय नवीन काय जुने ह्याची शहानिशा झाली की मित्र आठवायचे, मित्र! नावं पण लक्षात आहेत अजुन! सूर्यकांत, साकेत वगैरे, मुंबईत असल्यामुळे उगाच भाव खात काही पण  अट्ट्या मारत खेळ सूर, जाम, शपेरू, आंबे, जांभळं, करवंद, आवळे अखंड आणि प्रचंड चरचर, मध्येच रस्त्यात भैया दिसायचा, राजू भैया! युपी बिहार वाला पिळदार मिवफलकवश्याब आणि भटजी शेंडी वाला, गोला ले लो गोला, गोळा शरबत गोलाsssss, घरी असलो की हातातला उद्योग टाकून रस्त्यावर धावत जायचो, आजी-आजोबा जाम रागवायचे.. घसा खराब होइल, आई रागवेल! मी कसला ऐकतोय!!! जीभ लाल काळी नीळी, दोनेक गोळे संपवल्या शिवाय जाऊ द्यायचो नाही त्याला! काही नतद्रष्ट कोळी पोरं खुप त्रास द्यायची बिचार्‍याला! उगाच गोळे खात एक्स्ट्रा सरबत वगैरे, मला खुप राग यायचा त्यांचा! पण काय करु शकलो नाही कधी, त्या भैयाला पैसे देऊन परत घरी यायचो!

मुंबईत रोज टीव्ही बघायची सवय, पण आक्षीच्या घरी टीव्ही असूनही पहायला मजा यायची नाही कारण तो होता बाबांनी आणलेला एक पोर्टेबल टीव्ही, ३इंची, आजूबाजूला जोशी, चिटणीस, भिडे ह्यांची घरं होती पण एकट्या दातारांकडेच मस्त मोठा रंगीत टीव्ही होता! तेव्हा २ वाहिन्यांची(च) चंगळ होती! १ दूरदर्शन आणि डीडी मेट्रो! असेल तर क्रिकेट, नाहीतर रविवार चा चित्रपट, रोजच्या ७ च्या बातम्या वगैरे सगळे कार्यक्रम निर्लज्जा सारखे जाऊन बघायचो! त्यात अजुन एक गालबोट म्हणजे दातारांनी प्रेमानी सारवलेले शेण कुडतरत बसायचो!, त्यांना हमखास कळायचं, आज समीर इथे बसला असेल असा खवट लूक द्यायला दातार काकू पुढे मागे बघायच्या नाहीत, आणि अजुन एक, त्यांच्याकडे फ्रीजही होता! पाहुणे आले की बर्फा साठी पब्लिक दातारांकड़े!, मजा नुसती! दातार काकू सिनेमास्कोप डोळ्यांनी पहात हे सर्व सहन करायच्या! कोकम, लिंबू, पन्हे आणि ह्या सार्वांसाठी दातारांचे बर्फ असणे म्हणजे कमाल कॉम्बो! कधी कधी पाहुणे येणार ह्याची कल्पना असल्यावर मीच कितीदा दातारांकडे पाणी घेऊन गेलेलो आठवत आहे बर्फासाठी!

दातारांच्या बरोबर समोरची वाडी म्हणजे चिटणिसांची वाडी, साँलिड प्रकार! अंगणात जंगी गाड्या! कोंटेसा पासून मर्सीडीज पर्यंत! अर्थातच मोठे वकील होते मुंबईतले, त्यांची जागा, खुप मोठी वाडी अगदी समुद्रापर्यंत लांब! खुप नारळांची टापटीप रंगवलेली झाडे, झोपाळे, खेळायला सुंदर परिसर, साथीला घोड़े, गाई, म्हशी आणि हो हरीण पण होतं! फुल आँन लक्झरी बंगला, पार्ट्या वगैरे असायच्या कधी कधी, खेड़ेगावत असलं काही असतं ह्याचं उत्तम उदाहरण! रेश्मा नावाची मुलगी होती त्यांना, प्रचंड लाड असायचे तीचे! त्यांच्या इथे काम करणारी मुलं माझे सवंगडी, त्यामुळे मस्त एंट्री असायची मला प्रत्येक कार्यक्रमाला!

पण माझा जीव अडकलेला असायचा तो बापट आजोबांकड़े! एकटेच असायचे छोटसं घर होतं, खुप गोष्टी नुसत्या कोंबलेल्या, लहान मुलांची पुस्तकं, रंग रंगोटीची साधनं, हार्डवेअर, योगसाधना संबंधीत गोष्टी, खाकी आखुड प्यांट, जरासा मळकट फुल बाही बनियान आणि हातात काठी. मी नाही आलो की येता जाता आजी-आजोबांकडे माझी चौकशी करायचे, जाम लाड करायचे मला नं कळु देता! म्हातारी मंडळी कितीही कंजुस वाटत असली तरी कसले प्रेमळ असतात! त्यांनी त्यांच्या कडची ५ भाग त्यात मस्त चित्र असलेली छान इंग्लिश डिक्शनरी, मस्त चित्र असलेली मला देऊ केली होती! दिवासातले ४-४ तास मी ते चाळत बसायचो! मग कालांतरानी ती कुठे गायब झाली देवास ठाऊक! आता कुठे असतील ते? असतील का जिवंत? माझे आजी-आजोबा पण नाहीत त्यांची विचारपूस करायला!

बापट हाऊसच्या समोर होतं इंदुताईं कुलकर्णींचे छोटसं दुकान, ४-५ रुपये खिशात असले की तिथे धावायचो मी, मुठ भरून लिमलेटच्या गोळ्या, किसमी, कॉफ्फी बाइट, मेलोडी किंवा पेप्सी कोले घ्यायचो त्यांच्या दुकानातुन. घराला लागुनच रामाचं मंदीर होतं.. तिथले चणेफुटाणे फस्त करत करत रस्त्यावर स्वतःच्याच धुंदीत मी समुद्राच्या दिशेने निघायचो, खुप वेळा असला तर ईतका धुंदीत असायचो की समोरचं वाहन बाजूनी जायचं आणि मी रस्त्याच्या मध्ये!

रस्त्यावर प्रत्येक ३-४ घरांना सोडून एक छोटा रस्ता समुद्राकडे जायचा, तो रस्ता संपला रे संपली की त्या सुरुच्या बनात घुसंण्या आधी जंगली झाडांची जाम भीती वाटायची! भर दिवसा ढवळ्या घाबरायला व्हायचं, घनदाट झाडी, भरतीच्या लाटांचा प्रचंड आवाज, उन सावलीचा खेळ, माझ्या फाटक्या चपलांमधुन टोचणारी वाळु आणि सुकलेल्या सुरुची पानं. कसाबसा वाळूपाशी आलो की हुस्श व्हायचं! तीथेही राजू भैयाची हजेरी असायची, पैसे संपले असले तरी 'बाद मे देता हुँ' ह्या डायलॉगवर  हमखास एक दोन गोळे सरबतं ढोसायचोच. भुट्टावाला पण असायचा कधी कधी, काय मस्त वास यायचा, मस्त हवा, चित्रामध्ये मध्ये लाल रंगाच्या लहान ब्रशनी फराटे मारल्यासारखे ते निखारे! तसाच रंग संध्याकाळी सूर्याला निरोप देताना असायचा, बास रे बास, अवर्णनीय सुंदर प्रकार असायचा, पण त्याचवेळी मुंबई अणि इतर ठिकाणांहुन आलेले विचित्र पब्लिक दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचे गालबोट लावून जायचे, असे विचित्र पब्लिक का जन्म घेतं आणि आक्षी सारख्या स्वर्गाला का भोकं पाडतं हा प्रश्न तेव्हापासून पडतोय मला, असो! तासनतास समुद्रावरचं बागडून झाल्यावर विशेषतः ओहोटी वगैरे असली की शंख शिंपल्यांच्या गुप्तधनासह मी घरी यायचो, प्रचंड भूके सकट!

आप्पा बाहेर असले तर आजी कडून पाहिजे ते गीळायला मिळायचं, पण आप्पा असले की शुभंकरोती आणि भीमरूपी रामरक्षेला शाँर्टकट नाही, एकदा तर मी 'नाही म्हणणार' असं उत्तर दील्यावर (त्यावेळी/त्याकाळी वडीलधा‌र्‍या व्यक्तींना 'नाही' ऐकायची सवय नव्हतीच!) मग काय आजोबांनी धोतर वर करून माझ्या दिशेने जी धाव घेतली, मी पडवीतून - अंगणात - अंगणातून रस्त्यावरत्यांच्या अंगात बैल गाडीचे बळ आल्यासारखे धावले माझ्या दिशेने! आणि मग मी माकडासारखा आहे तिथून उडी मारून धूम ठोकली! माझ्यामागे आजोबा, प्रचंड रागात ३०-४० पावलं झाली मागे वळून पाहिलं, आप्पा आहेतच मागे! तेवढ्यात पोस्टमन काका आले समोरून, सर्व प्रकार बघून आप्पांजवळ थांबले. काहीतरी बोलतायत हे बघून मी थांबलो! त्यानंतर १५-२० मिनिटांनी मी देव्हार्‍यासमोर शुभंकरोती / रामरक्षा म्हणालो पण  ८०% लक्ष स्वयंपाकगृहातल्या आजीकडे ती जे बनवत होती 'दडपे पोहे' त्याच्याकडे. पण भीमरूपी रामरक्षेला शाँर्टकट नाही, हीच मुख्य बातमी! मगच सातच्या ठळक बातम्या!

बाकी खेडेगावच ते! लाईट आहे काय नाही काय, नो टायमिंग! गुरुवारी तर जवळपास अक्खा दिवस 'लाईटी' जायची, रेडीओ वाजता वाजता बंद! आणि चालू झाला की 'लाईटी' आली! झोपाळा होताच गरमीची ऐशी तैशी करायला! नाही तर हौद! आणि भर दुपारी तासोनतास डुंबायला काय मजा यायची! ते नाही जमलं तर सारवलेल्या अंगणावर लोटाभरून पाणी शिंपडुन ताणून द्यायची! रात्र मात्र 'लाईटी' गेल्यावर भुतं दिसतात आणि ती असतात का नसतात ह्या प्रश्नांच्या रंगमंचावर माझ्या सावलीसकट मी पावलं टाकायचो! त्यात मित्र आणि आजी/आजोबा उगाच भीती दाखवणार, भीती म्हणजे भूतांची वगैरे नव्हे! दरोडेखोरांची!  खर्‍या-खर्‍या लुटालुटी म्हणे! पण 'लाईटी' आली की आपण वाघ ना परत!

दिवाळीत आक्षीत तर काय मज्जाच! उटणं, पहाटे पहाटे सनई, रडीओ वर बिस्मिल्ला साहेबांची, चिरांटे अंघोळीच्या वेळी पायांनी चिरडून अंघोळ वगैरे! हे सर्व झालं की मस्त आजीच्या हातचे दडपे पोहे, फराळ, मग फटाके, फुल टू धम्माल! सुट्टी अर्धी संपायला यायची तशी चेहर्‍यावर उदासिनता यायची, कॅलेंडर बघुन बघुन उगाच उदासिनता अजुन उग्र करून आजीच्या कुशीत शिरायचो, अजुनही ती मीठी इतकी घट्ट लक्षात आहे, आयुष्यात असले क्षण परत येत नाहीत याची जाणीव तेव्हा नसते! असो, जस जसे परत जायचे दिवस येतात तसेच पुन्हा कधी येणार याचं गणित सुरु, हो हो ते गणित भारी परफेक्ट जमायचं! काठावर पास होणाऱ्या ह्या जीवाला ते भारीच जमायचं!बघता बघता सुट्टी संपायला यायची,१ आठवडा, ४ दिवस, उद्या जाणार हे पाहून आजीच्या डोळ्यात माझ्या आधीच पाणी, सकाळी सकाळी तो रिक्शावाला आला की अगदी नको तो सीन जसा आपण फॉरवर्ड करतो तसं तसं करावसं वाटायचं! मग कायपुढच्या सुट्टीची स्वप्न रंगवत प्रवास घडायचा! आक्षी हे गाव नव्हे, एक स्वप्ननगरी होती माझ्यासाठी! एक महिन्यात वर्षभर जगुन यायचो! आता कोणीच नाही तिथे, आजी-आजोबा नंतर पडून होतं घर, आता ते पण नाही, उरल्यात आठवणी. कधी जमलं तर नक्की भेट द्या आक्षीला, आणि हो, लाल डब्यानीच जा! नारळी-पोफळीनी वेढलेले आक्षी, अलिबाग आणि नागाव या दोघांच्या मध्ये असलेलं छोटसं गाव!


#सशुश्रीके 

















Comments

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!